ETV Bharat / state

राम मंदिर लोकार्पण सोहळ्या निमित्त प्रभू श्रीरामाच्या चरणी ५५१ किलो बुंदीचा लाडू अर्पण

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2024, 7:16 PM IST

Ram Mandir Pranapratistha : अयोध्येत राममंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्तानं देशभर उत्साह आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील अविष्कार कॉलनीतील प्रकाश तवर नामक व्यावसायिकाने 551 किलोचा बुंदीचा लाडू किराडपुरा येथील राम मंदिरात अर्पण केला. तत्पूर्वी याची आज शोभायात्रा काढण्यात आली. मंदिरातील पूजेनंतर लाडवाचा प्रसाद भाविकांना वाटण्यात आला.

Ram Mandir Pranapratistha
लाडू अर्पण कार्यक्रम

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Ram Mandir Pranapratistha : प्रभू श्रीराम मंदिरात आज (22 जानेवारी) प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. त्याच वेळी शहरात अनेक ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला गेला. अविष्कार कॉलनी येथील एका व्यवसायकाने प्रभू रामचंद्राच्या चरणी ५५१ किलोचा महालाडूचा प्रसाद अर्पण केला. अविष्कार कॉलनी ते किराडपुरा राम मंदिर यादरम्यान भव्य शोभायात्रा यावेळी काढण्यात आली. वाजत गाजत आनंदोत्सव साजरा करत हा लाडू प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्यात आला आणि नंतर प्रसाद म्हणून भक्तांना तो वाटण्यात आला.

व्यावसायिकाने तयार केला लाडू : सिडको येथील अविष्कार कॉलनी येथील व्यावसायिक प्रकाश तवर यांनी प्रभू श्रीरामाच्या चरणी ५५१ किलोच्या लाडूचा प्रसाद तयार केला. शहरात त्यांचे फरसाण पर्सन मार्टचे दुकान आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई ते नेहमी बनवत असतात. आज अयोध्येत राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्याचे औचित्य साधून महाप्रसाद देवाला अर्पण करावा म्हणून 551 किलोचा बुंदीचा लाडू त्यांनी तयार करून प्रभू श्रीरामाला अर्पण केला गेला.

एवढ्या वजनाच्या साहित्याची भर : लाडू बनविण्यासाठी सहा दिवस रोज वीस कारागीर काम करत होते. या लाडूमध्ये दीडशे किलो शुद्ध तूप, अडीचशे किलो बेसन, सव्वाशे किलो साखर तर 25 किलो सुकामेवा टाकण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होतो. यासाठी आपणही काही वेगळं करावं असा मानस मुलीनं व्यक्त केला. त्यामुळेच मोठा लाडू तयार केल्याचं व्यावसायिक प्रकाश तवर यांनी सांगितलं.


शहरात लाडूची शोभा यात्रा : ५५१ किलो बुंदीचा लाडू शहराचं विशेष आकर्षण राहिलं. गेल्या आठवड्याभरात या लाडूची संपूर्ण शहरात चर्चा पाहायला मिळाली. रविवारी संध्याकाळी हा लाडू पूर्णतः तयार झाला. सोमवारी सकाळी एका ट्रॅक्टरवर या लाडूला ठेवण्यात आले. अयोध्येत सोहळ्याला सुरुवात होताच लाडूची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी संगीताच्या तालावर ठेका धरत, वाजत गाजत हा लाडू किराडपुरा येथील राम मंदिराकडे नेला. रस्त्यात अनेक ठिकाणी उत्सव साजरा केला गेला. किराडपुरातील राम मंदिरात महाआरती सोहळा संपन्न झाल्यानंतर, हा लाडू प्रसाद म्हणून भाविकांना वाटण्यात आला. ५५१ किलोचा भव्य लाडू तयार करून प्रभू रामचंद्राला तो अर्पण केल्यावर सर्वाधिक आनंद होत असल्याचं मत व्यावसायिक प्रकाश तवर यांनी व्यक्त केलं.


हेही वाचा:

  1. श्रीरामाचा तंबूतला 500 वर्षाचा वनवास संपला, भव्यदिव्य मंदिरात विराजमान : पंतप्रधान नरेंद्र मोदी
  2. राम मंदिर उद्घाटन सोहळा संपन्न, सोनू आणि शंकर यांनी गायली भजन
  3. राम लल्ला हे शांती, संयम, समन्वयाचे प्रतीक : पंतप्रधान नरेंद्र मोदी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.