ETV Bharat / state

मुंबईकरांना पुरेसे पाणी नाही, श्वेतपत्रिका काढा- आशिष शेलार यांची मागणी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 6:12 PM IST

Ashish Shelar On Uddhav Thackeray : गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर एकाच कुटुंबाची सत्ता असल्याचा टोला मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. उद्धव ठाकरेंची महापालिकेवर सत्ता असून त्यांना मुंबईकरांना पिण्याचं पाणी पुरवता आलं नसल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला. त्यामुळं याबाबत राज्य सरकारनं श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

Ashish Shelar On Uddhav Thackeray
Ashish Shelar On Uddhav Thackeray

मुंबई Ashish Shelar On Uddhav Thackeray : महायुती सरकारनं केलेल्या कामांबद्दल मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या शहरांच्या विकासाचा प्रस्ताव आज विधानसभेत मांडण्यात आलाय. जलद विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही विधानसभेत आभार मानले. यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, मुंबई शहर आणि उपनगरात असमान पाणीपुरवठा होत आहे.

आशिष शेलार म्हणाले, " मुंबईत पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई जाणवत आहे. या पाणीपुरवठ्यासाठी मुंबई महापालिकेनं गेल्या 25 वर्षात मुंबईकरांकडून 30 हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. या महापालिकेत एकच कुटुंब सत्तेत आहे. त्यांनी निर्णय घेऊनही ते मुंबईकरांना पिण्याचं पाणी देऊ शकले नाहीत. त्यामुळं येत्या महिनाभरात या सर्वाचा लेखाजोखा मांडणारी श्वेतपत्रिका सरकारनं काढावी," अशी मागणी शेलारांनी करत ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

सल्लागाराला कोट्यवधी रुपये : "मुंबई महापालिकेतर्फे मुलुंड, वांद्रे पश्चिम या दोन प्रभागांमध्ये प्रायोगिक तत्वावर 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. त्यासाठी 400 कोटी रुपये केवळ सल्लागाराला देण्यात आलं. ही योजना पूर्णपणे अपयशी ठरली असून तत्कालीन ठाकरे सरकार याला जबाबदार आहेत, टीका शेलारांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. तसंच या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीदेखील आमदार शेलारांनी विधानसभेत केलीय.

मेट्रोच्या खर्चाची श्वेतपत्रिका काढा : "महाविकास आघाडीचं सरकार असताना मेट्रोचं काम आरे कारशेडच्या नावावर दोन वर्ष रोखण्यात आलं. मात्र, आता मेट्रो सुरू झाल्यानंतर आठ कोटी लोकांनी प्रवास केला. रोज दोन लाख 35 हजार प्रवासी मेट्रोतून प्रवास करतात. त्यावेळी ठाकरे सरकारनं सगळ्या मुंबईकरांची अडवणूक करून ठेवली होती. केवळ अहंकारापोटी आरे कारशेडचं काम अडवण्यात आलं. त्यामुळं मेट्रोचा खर्च 10 हजार कोटींनी वाढला. याप्रकरणी श्वेतपत्रिका काढून सरकारनं खर्च किती हजार कोटींनी वाढवला? या काळात किती कार्बन उत्सर्जित झाला? प्रदूषण किती वाढले? याची माहिती मुंबईकरांना द्यावी," अशी मागणी शेलार यांनी केली.

मुंबईत खासगी वाहनांची संख्या : "मुंबईत सुमारे 20 लाख वाहनं असून दररोज नोंदणी केलेल्या खासगी गाड्यांची संख्या 110 आहे. यात खासगी बसची संख्या 3 हजार 500 आहे. यात 1 हजार 700 शालेय बसचा समावेश आहे. तसंच राज्यात खासगी बसची संख्या 8 हजार आहे. त्यात मुंबईत 300 व्होल्वो बस आहेत. तर, महामंडळाच्या 18 हजार असून बेस्ट बसेसची संख्या 4 हजार आहे. त्यामुळं मुंबईत ये-जा करणाऱ्या वाहनांच्या पार्किंगचा विचार मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केला नाही, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला आहे.


कोळी बांधवांच्या नुकसानभरपाईतील तफावत दूर करा : सागरी सेतूचं काम एमएसआरडीसी करत आहे. कोस्टल रोडचं निम्मं काम मुंबई महापालिकेकडून केलं जात आहे. या कामामुळं कोळी बांधवांचं झालेलं नुकसान मोजण्यासाठी दोन्ही प्राधिकरणांचे निकष वेगवेगळी आहेत. त्यामुळं कोळी बांधवांना मुंबई महापालिकेच्या निकषानुसार नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली.

हे वाचलंत का :

  1. पंतप्रधान मोदींची आज यवतमाळमध्ये सभा; मात्र सभास्थळी खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स
  2. लोकसभेच्या उमेदवारीवरुन शाहू महाराजांचं मोठ वक्तव्य; म्हणाले,...
  3. 'निवडणुकीत उभं राहिल्या शिवाय पर्याय नाही'; प्रकाश आंबेडकरांचा जरांगे पाटलांना प्रेमाचा सल्ला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.