ETV Bharat / politics

'निवडणुकीत उभं राहिल्या शिवाय पर्याय नाही'; प्रकाश आंबेडकरांचा जरांगे पाटलांना प्रेमाचा सल्ला

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 10:22 AM IST

Prakash Ambedkar On Manoj Jarange Patil
प्रकाश आंबेडकर आणि जरांगे पाटील

Prakash Ambedkar On Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता राजकीय वळण लागल्यानं त्यांच्यावर आता टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांना एक प्रेमाचा सल्ला दिलाय.

पुणे Prakash Ambedkar On Manoj Jarange : पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सत्ता परिवर्तन महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांना एक सल्ला दिलाय. ते म्हणाले की, "आम्ही आण्णा पाटील यांचं आंदोलन बघितलं आहे. आण्णा पाटील यांचं आंदोलन जिरवण्यात आलं आहे. आता मराठा आरक्षणाचा लढा देण्यासाठी राज्यात उभं राहिलेलं आंदोलन जिरवायचं नसेल, तर जरांगे पाटील यांना निवडणूक लढण्याशिवाय पर्याय नाही. सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू आहे. जर तुम्ही निवडणुकीत उभे राहिले नाही, तर येथील निजामी मराठे तुम्हाला कधी संपवतील हे तुम्हाला देखील कळणार नाही. येथल्या गरिबांच्या चळवळी कधीच उभ्या राहिल्या नाहीत. कारण ते उभे राहू दिले नाहीत. त्यामुळं उपेक्षितांच्या चळवळीत एकजूट होणं गरजेचं आहे."

वंचित-मुस्लिम भेद मिटवा : "जरांगे पाटील यांना नवीन मित्र शोधावं लागणार आहे. नवीन मित्र हा येथल्या मुसलमानांशिवाय दुसरा कोणीही नाही. आज मुस्लिम समाज देखील स्वतःची सुरक्षा वेगवेगळ्या राजकीय पक्षात शोधत आहे. मी आज मुस्लिम समाजाला सांगतो की, राजकीय पक्ष तुम्हाला सुरक्षितता देणार नाही. आज मुस्लिमांना अलिप्तपणातून मुक्त व्हावं लागणार आहे. तो ज्या दिवशी बाहेर पडेल आणि येथल्या वंचितांच्या बरोबर फिरेल, तेव्हा समूह त्यांना सुरक्षितता दिल्या शिवाय राहणार नाही. आपल्याला 48 पैकी 48 जागा जिंकायच्या असतील तर वंचित मुस्लिम हा भेद मिटवावा लागणार आहे. मगच आपण 48 पैकी 48 जागा जिंकू," असं यावेळी आंबेडकर यांनी म्हटलंय.

सत्ता परिवर्तन महासभेत अशी होती व्यवस्था : वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता परिवर्तन महासभेत प्रत्येक खुर्चीमागे क्यूआर कोड असलेले स्टिकर्स चिटकविण्यात आल्यानं बसल्याजागी मदत करण्याची व्यवस्था सभेमध्ये करण्यात आली होती. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे फोटो या स्टिकरवर होते. दलित, वंचित, शोषीत समाजाच्या उन्नतीसाठी अहोरात्र संघर्ष करणारे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल हा जन्मदिन आहे. या संकल्पनेवर आधारित १४ तारीख आणि चौथा महिना म्हणजे १४.४ या प्रमाणे १४४, १४४०, १४४००, १४४००० या पद्धतीने नागरिक आपली मदत करत असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी सत्ता परिवर्तन महासभेला सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते. ओबीसी, मराठा, मुस्लिम, धनगर आणि वडार समाजाच्या नेत्यांचाही यात सहभाग होता. यामध्ये ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे, टी. पी. मुंडे, डाॅ. किसन चव्हाण, अरुंधती शिरसाट, नीलेश विश्वकर्मा, प्रियदर्शी तेलंग, अनिल जाधव, इम्तियाज नदाफ, सोमनाथ साळुंखे आदी उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. मनोज जरांगे पाटलांनी कुणाची मागितली माफी? नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडिओ
  2. मनोज जरांगे पाटलांचा बोलविता धनी शोधून काढणार; देवेंद्र फडणवीस आक्रमक
  3. जरांगे पाटलांसारखा मुस्लिमांनी आरक्षणासाठी लढा दिला असता तर कब्रस्तान भरले असते- अबू आझमी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.