ETV Bharat / politics

पालघर लोकसभा मतदारसंघाची गणितं बदलणार, खासदार राजेंद्र गावित यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता - Rajendra Gavit join BJP

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 1:29 PM IST

Updated : May 7, 2024, 2:59 PM IST

खासदार राजेंद्र गावित यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्ष सोडून 'कमळ' हाती घेतलं आहे. त्यांच्या भाजपामधील पक्षप्रवेशाची काय कारणे आहेत? त्याचा पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती.

MP Rajendra Gavit joined BJP
खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपामध्ये प्रवेश (Source- ETV Bharat Reporter)

पालघरः पालघर लोकसभा मतदारसंघात खासदार राजेंद्र गावित यांना डावलून भारतीय जनता पक्षाने हेमंत सावरा यांना उमेदवारी दिल्यानं काही प्रमाणात नाराजी निर्माण झाली होती. परंतु भारतीय जनता पार्टीने खासदार गावित व त्यांच्या समर्थकांना भाजपात घेऊन ही निवडणुकीतील चित्र बदलवलं आहे. त्याचबरोबर वरिष्ठांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे खासदार गावित यांचे राज्याच्या राजकारणात पुनर्वसन करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची राज्यातल्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली आहे.



पालघर लोकसभा मतदारसंघ शेवटपर्यंत कोणाच्या वाट्याला जाणार, हे महायुतीत निश्चित होत नव्हते. मतदारसंघ कोणाच्याही वाट्याला गेला, तरी खासदार गावित हेच उमेदवार असतील असं सांगितलं जात होतं. उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच खासदार गावित यांना प्रचाराला लागण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे त्यांनी मतदारसंघात एक फेरी पूर्ण केली होती. मात्र ऐनवेळी हा मतदारसंघ भाजपला सुटला. भाजपानं निष्ठावंत असलेल्या हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली.

नाराज; परंतु संयमी- खासदार गावित आणि त्यांच्या समर्थकांना नाराज केलं असतं तर या मतदारसंघात महायुतीला मोठा फटका बसला असता. खासदार गावित यांची पालघर लोकसभा मतदारसंघात मोठी व्होटबँक आहे. आदिवासी समाजात त्यांचे संघटन आहे. कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ त्यांच्यामागे आहे. दुसऱ्या फळीतील नेतेही त्यांच्याबरोबर आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारीत डावल्यानंतर गावित काहीसे नाराज झाले होते. काम करायला सांगूनही ऐनवेळेला उमेदवार बदलण्याचे शल्य त्यांना होतं. सावरा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी खासदार गावित यांची भेट घेतली. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा घडवून आणली होती.



प्राबल्य लक्षात घेऊन भाजपात प्रवेश- भाजपाला जरी पालघर मतदारसंघ मिळाला, तरी शिवसेनेकडून गावित यांनाच उमेदवारी देण्यात येणार होती. परंतु त्यांच्याविषयीचा नकारात्मक अहवाल पुढे करून त्यांना डावलण्यात आलं. तरीही त्यांचे मतदारसंघातील प्राबल्य लक्षात घेता त्यांचं पुनर्वसन करणं आवश्यक होतं. भारतीय जनता पार्टीला त्याची जाणीव होती. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या तीन-चार दिवसांत गावित यांच्यासह त्यांच्या समर्थकांचा भाजपात प्रवेश करून घेण्यात आला.

गावित होते नाराज- खासदार गावित यांच्याविषयीच्या नकारात्मक अहवालाचा वापर करून त्यांची उमेदवारी कापली असली तरी त्यांना नाराज करणे आणि प्रचारापासून ते दूर राहणं महायुतीला परवडणार नव्हतं. त्यामुळे सावरा यांना उमेदवारी देताच पालकमंत्री रवींद्र चव्हाण खासदार गावित यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. राज्याच्या राजकारणात त्यांचे पुनर्वसन करण्याचे संकेत त्यांनी त्यावेळी दिले होते. परंतु तरीही गावित यांना त्यांची नाराजी लपवता आली नव्हती.

भाजपानं केली व्यूहरचना- शिवसेनेच्या शिंदे गट हा भाजपाचा मित्र पक्ष असतानाही राजेंद्र गावित मित्र पक्षात राहण्याऐवजी आपल्याकडे राहणे जास्त फायदेशीर ठरेल, अशी व्यूहरचना भाजपानं तयार केली. त्यांना मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश देण्यात आला. पालघर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. खासदार गावित यांनी यापूर्वीच नाराज असतानाही सावरा यांचे काम करण्याच्या सूचना आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. भाजपाला खासदार गावित यांच्या संयमाची आणि महायुतीशी दगाफटका न करण्याची वृत्ती नक्कीच आवडली असावी, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

खासदार गावित यांना विश्वासात घेऊनच पालघर लोकसभा मतदरसंघात हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली. खसदार गावित यांना केंद्रीय राजकारणापेक्षा राज्याच्या राजकारणात जास्त गरज आहे. मंत्रिमंडळात त्यांनी काम केले. त्यामुळे त्यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वासात घेऊन त्यांना भाजपात घेतलं आहे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


राजकारणात काही तडजोडी कराव्या लागतात. फडणवीस यांच्या शब्दांवर माझा विश्वास आहे. त्यामुळे माझी घरवापसी झाली.
-खासदार, राजेंद्र गावित, खासदार



सावरा यांच्यामागे गावित यांचे बळ- उमेदवारी डावलण्यात आल्यानंतर राजेंद्र गावित यांनी अतिशय संयमानं भूमिका घेतली. एकीकडे नाराजी दाखवताना दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत महायुतीला अडचणीत आणणार नाही, सावरा यांचेच काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली होती. त्यानुसार मतदारसंघात त्यांनी कामही सुरू केले होते. खासदार गावित यांची ही भूमिका लक्षात घेऊन भाजपानं त्यांना तातडीनं पक्षप्रवेश देऊन पालघर लोकसभा मतदारसंघात सावरा यांच्या पाठीमागे बळ उभे केलं आहे.

विधानपरिषदेवर वर्णी लागणार?- पालघर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. महाविकास आघाडीच्या भारती कामडी, बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील आणि महायुतीच्या सावरा यांच्यात तिरंगी लढत होत आहे. या लढतीत आता सावरा यांच्या पाठीमागे खासदार गावित यांची ताकद उभी राहिली. त्यामुळे पालघर लोकसभा मतदारसंघात त्याचे पारडे निश्चित जड झाले आहे. त्याची परतफेड म्हणून गावित यांना आगामी लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मंत्रिमंडळात होणाऱ्या फेरबदलात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लावून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाण्याची शक्यता असल्याची सूत्रानं माहिती दिली.

हेही वाचा-

  1. पालघरमध्ये शिंदेंना धक्का! विद्यमान खासदाराचा पत्ता कट करत भाजपानं 'या' नेत्याला दिलं तिकीट - Palghar Lok Sabha 2024
  2. नादच खुळा! सहा वेळा पराभूत होऊनही लढण्याची उमेद असलेला 'बाप' उमेदवार - lok sabha election 2024
Last Updated : May 7, 2024, 2:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.