ओबीसींच्या हक्काचं संरक्षण करणं आमचं काम, विजय वडेट्टीवारांनी स्पष्टच सुनावलं
छत्रपती संभाजीनगर OBC Vs Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील अंबड इथं ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा होणार आहे. त्यासाठी अनेक नेते दाखल होत आहेत. आज सकाळी ओबीसी नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar Statement On OBC ) संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले. त्यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी व्हिजेएनटी एक मोठा समाज आहे. त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी ही सभा आहे. त्यामुळे मी मुद्दामहून आलोय. कोणाला काय हवंय, कोणाला काय द्यावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. दुसऱ्याच्या हक्काचं मात्र कुणीही हिरावून घेता कामा नये. व्हिजेएनटी, ओबीसी समाज गरीब आहे. त्यांना संविधानाच्या संरक्षणाच्या कवच मिळालेलं आहे. ते तोडण्याचं काम कुणी करू नये, ही भूमिका आमची असणार आहे, असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.