ETV Bharat / sukhibhava

'दिशादर्शक आवाज, भविष्यासाठी एक दृष्टी' : आंतरराष्ट्रीय नर्स दिवस २०२१

author img

By

Published : May 12, 2021, 6:45 PM IST

international nurses day 2021
"वॉइस टू लीड, अ विज़न फॉर फ्यूचर": आंतरराष्ट्रीय नर्स दिवस 2021

नर्स म्हणजेच परिचारिकेच्या कामाकडे सेवा भाव आणि समर्पण या नजरेनेच पाहिले जाते. रुग्णालयांमध्ये डाॅक्टरांपेक्षा नर्सेसच रुग्णांच्या जवळ जास्त वेळ असतात. रुग्णांची काळजी घेणे, देखभाल करणे तसेच प्रसंगी त्यांना शारीरिक आणि मानसिक आधार देणे ही कामे परिचारिकेची असतात. एकूणच नर्स आरोग्य यंत्रणेचा कणा आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी दर वर्षी १२ मे हा आंतरराष्ट्रीय नर्स दिवस म्हणून साजरा केला जातो.

'दिशादर्शक आवाज, भविष्यासाठी एक दृष्टी' आंतरराष्ट्रीय नर्स दिवस २०२१

जगभरातल्या नर्सिंगशी जोडलेल्या लोकांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी, तसेच त्यांच्या प्रगतीच्या संधी निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी 'द लेडी विथ द लँप' नावाने लोकप्रिय असलेल्या फ्लोरेंस नाइटिंगेल यांचा जन्म झाला. म्हणूनच या दिवशी आंतरराष्ट्रीय नर्स दिवसाचे आयोजन केले जाते. या वर्षी हा खास दिवस 'वॉइस टू लीड, अ विजन फॉर फ्युचर' म्हणजेच 'दिशादर्शक आवाज, भविष्यासाठी एक दृष्टी' या संकल्पनेवर साजरा होत आहे. याचा अर्थ असा आहे की परिचारिका आता जागतिक स्तरावर आरोग्य प्रणालीचे प्रतिनिधित्व करू शकतात.

१९९५ मध्ये इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेसद्वारे हा दिवस दर वर्षी साजरा करण्याचा संकल्प केला होता. या क्षेत्रात नवीन विषयांची शैक्षणिक व सार्वजनिक माहिती आणि संबंधित साहित्य तयार करणे, ते वितरित करणे, या उद्देशाने आणि परिचारिकांच्या कामाचे कौतुक करण्याच्या उद्देशाने दर वर्षी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा खास दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम अमेरिकेच्या आरोग्य शिक्षण व कल्याण विभागातील अधिकारी डोरोथी सदरलँड यांनी मांडला होता. त्याला अमेरिकेचे अध्यक्ष डी आइसनहॉवर यांनी मान्यता दिली होती. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 'नॅशनल फ्लॉरेन्स नाईटिंगेल' पुरस्कार प्रत्येक वर्षी परिचारिकांच्या गुणवंत सेवेस मान्यता देण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या कुटुंब आणि कल्याण मंत्रालयामार्फत दिला जातो.

आंतरराष्ट्रीय नर्स दिवस साजरा करण्यामागचे उद्दीष्ट नर्सिंगची गणना जगभरातील आरोग्य देखभालीशी संबंधित सर्वात मोठ्या आणि सन्मानित व्यवसायांमध्ये केली जाते. जगभरातील आरोग्य सेवांमध्ये परिचारिकांच्या योगदानाची ओळख करून, त्यांचे कौतुक करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या दिवसाच्या निमित्ताने नर्सेसच्या हितासाठी कार्यक्रम राबवले जातात. रुग्णांच्या हितासाठी परिचारिकांना सामाजिक, वैद्यकीय आणि मानसिकदृष्ट्या प्रशिक्षित आणि शिक्षित करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. याशिवाय नर्सिंग व्यवसायाशी संबंधित लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाशी संबंधित विषयांवर चर्चा करणे आणि त्यासाठी विविध योजना तयार करणे, त्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे हे देखील हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दीष्ट आहे.

नॅशनल फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार हा भारत सरकारच्या कुटुंब आणि कल्याण मंत्रालयाने १९७३ मध्ये सुरू केला होता. वैद्यकीय क्षेत्रातील परिचारिकांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी निवड झालेल्या परिचारिकांना सन्मानपत्र व पदक, तसेच ५०,००० रुपयांचे रोख बक्षीस देऊन हा पुरस्कार प्रदान केला जातो. विशेष म्हणजे आतापर्यंत २५० हून अधिक परिचारिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

जगभरात प्रशिक्षित परिचारिकांची कमतरता आहे. आकडेवारीनुसार, जगभरात हा व्यवसाय नोबल समजला जात असला तरीही चांगला पगार आणि इतर सुविधा नसल्यामुळे लोक नर्सिंगचा प्रथम विचार करत नाहीच. तसेच हा व्यवसाय म्हणून अवलंबण्यास सर्वसाधारणपणे नाखूष दिसतात. विकसनशील देशांमध्ये ही परिस्थिती अधिक दिसून येते. विशेष म्हणजे या व्यवसायाशी संबंधित बरेच जण चांगला पगार आणि सुविधांसाठी दुसऱ्या देशांमध्ये जात असत. ट्रेंड नर्सस असोसिएशन ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार नर्सिंगच्या क्षेत्रात सुविधा वाढवण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नामुळे स्थलांतरित नर्सेसची संख्या कमी झाली आहे. तरी अजूनही सरकारी आणि बिगर-सरकारी क्षेत्रातील नर्सिंगशी संबंधित मोठ्या संख्येने लोकांना आर्थिक आणि इतर स्तरांवर बऱ्याच समस्या भेडसावत आहेत.

कोविड-१९च्या महामारीत नर्सेसची भूमिका कोविड-१९ साथीच्या रोगाची पहिली लाट आली तेव्हा स्थिती भयावह होती. पण आता दुसऱ्या लाटेत ती युद्धजन्य झाली आहे. या साथीच्या रोगात परिचारिका डाॅक्टरांच्या खांद्याला खांदा लावून अतुलनीय योगदान देत आहेत. कोरोनाच्या परिस्थितीत तपासणी, उपचार आणि काळजी घेण्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन करून या परिचारिका डॉक्टरांच्या पूरक म्हणून काम करत आहेत. कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसापासूनच नर्सेस रुग्णालयांमध्ये जास्तीत जास्त वेळ देऊन रुग्णांची काळजी घेत आहेत. आपले कर्तव्य करत आहेत. एवढेच नाही तर जगभरात मोठ्या संख्येने परिचारिकांनी कोरोना काळात लढताना प्राणाची आहुती दिली आहे. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेसद्वारे सादर केलेल्या आकडेवारीनुसार जगभरातल्या १५०० परिचारिकांनी कोरोना संक्रमणामुळे आपला प्राण गमावला आहे. भारतात ही संख्या २०० च्या वर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.