कोल्हापूर Chandrababu Naidu On NDA Gov : लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्याचं मतदान 20 मे ला होत आहे. देशातील जनता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार निवडून देईल, असा विश्वास आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केला. आज कोल्हापुरात त्यांनी करवीर निवासिनी आई अंबाबाईचं दर्शन घेतलं, यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
जनतेची सेवा करण्यासाठी मागितले आशीर्वाद : करवीर निवासिनी आई अंबाबाईचं मंदिर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून देशातील प्रार्थना स्थळांपैकी एक महत्त्वाचं मंदिर आहे. आज करवीर निवासिनी आई अंबाबाई चरणी नतमस्तक झालो आणि देशातील जनतेची सेवा करण्यासाठी आशीर्वाद मागितले. नक्कीच मला विश्वास आहे, करवीर निवासिनी आई महालक्ष्मी आम्हा सर्वांना आशीर्वाद देईल, असा विश्वास यावेळी माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केला. सकाळी साडे अकराच्या सुमारास हैदराबादहून विमानानं चंद्राबाबू नायडू हे कोल्हापुरात दाखल झाले. यानंतर त्यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी सुमारे अर्धातास नायडू कुटुंबांनी मंदिरात पूजा आणि आरती केली, यानंतर ते शिर्डीसाठी रवाना झाले.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी 400 पेक्षा अधिक जागा जिंकेल : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशातील वातावरण हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बाजूनं सकारात्मक आहे. आंध्रप्रदेशसह देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सकारात्मक लाट निर्माण झाली. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी देशात 400 लोकसभा जागा जिंकेल, असा विश्वास तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केला.
मंदिर परिसरात 'जय बाबू' च्या घोषणा : आंध्रप्रदेश, गोवा आणि राज्यातील अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात रोजच देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. आज आंध्रप्रदेशातील भाविक ही दाखल झाले. यावेळी चंद्राबाबू नायडू मंदिरातून बाहेर पडताना भक्तांनी 'जय बाबु' च्या घोषणा दिल्या. माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी थांबून घोषणा देणाऱ्या जनतेचं अभिवादन स्वीकारलं.
मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू कोल्हापुरात येणार असल्यानं बुधवारी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. आज चंद्राबाबू नायडू यांचा ताफा जाणाऱ्या मार्गावर कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. मंदिर परिसरातील दुकानंही काही काळ बंद ठेवण्यात आली. यामुळे मंदिर परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं.
हेही वाचा :