ETV Bharat / politics

"...हे शहाणपणाचं लक्षण नाही", शरद पवारांची जोरदार पंतप्रधान मोदींवर टीका - Sharad Pawar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 1:59 PM IST

Sharad Pawar On PM Modi Road Show : भाजपा उमेदावारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मुंबईतील घाटकोपर परिसरात रोड शो केला. या रोड शोवरुन शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी जोरदार टीका केली आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.

Sharad Pawar criticized PM Narendra Modi over Ghatkopar road show
शरद पवार आणि नरेंद्र मोदी (reporter)

शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन टीका केली (reporter)

नाशिक Sharad Pawar On PM Modi Road Show : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा उमेदवारांच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (15 मे) संध्याकाळी मुंबईतील घाटकोपर परिसरात मोठा रोड शो केला. या रोड शो दरम्यान मेट्रो प्रशासनानं जागृती नगर आणि घाटकोपर स्थानकांदरम्यानची सेवा काही काळासाठी स्थगित केली होती. त्यामुळं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. यावरुन आता शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय.



मोदींचं विधान मूर्खपणाचं : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 15 जून रोजी नाशिकमध्ये प्रचारसभा संपन्न झाली, यात मोदींनी अर्थसंकल्पाचं विभाजन करून 15 टक्के अर्थसंकल्प मुस्लीम समाजासाठी राखीव ठेवायचा, असा काँग्रेसचा डाव असल्याचा दावा केला होता. या प्रश्नावर बोलत असताना शरद पवार म्हणाले की, "मोदींचं हे विधान मुर्खपणाचं आहे. संसेदत मांडला जाणारा अर्थसंकल्प देशाचा असतो. अर्थसंकल्प कधीही एका जातीधर्माचा असू शकत नाही. पंतप्रधान मोदींकडं प्रचारात सांगण्यासारखं दुसरं काहीही नसल्यामुळं ते लक्ष वळविण्याचा प्रयत्न करतात. मोदी सध्या जे बोलत आहेत, त्यातील एक टक्काही सत्य नाही. देश चालविताना जाती-धर्माचा विचार करून चालत नाही", असं शरद पवार म्हणाले.

मुंबईच्या गुजराती भागात मोदींचा रोड शो : "मी प्रचार दौऱ्यासाठी राज्यभरात फिरतोय. लोक बदलासाठी तयार आहेत. भाजपा आणि तत्सम शक्ती यांना बाजूला ठेवावं, हे मत विशेषत: शेतकरी वर्गाचं आहे. आता जनमत भाजपासोबत नाही. तसंच मुंबईसारख्या शहरात रोड शो करणं. शहाणपणाचं लक्षण नाही. लोकांना काही तास थांबाव लागतं. वाहतूक कोंडी होते. मोदींनी रोड शो घेतलेला भाग प्रामुख्यानं गुजराती आहे. मोदींना रोड शो करायचाच होता, तर मुंबईत मोठे रस्ते असलेला भाग होता. पण मोदींचं लक्ष्य विशिष्ट वर्गाकडं होतं. त्यामुळं लोकांना त्रास झाला", अशी टीका पवारांनी केली.

कांद्याच्या प्रश्नावर प्रश्न विचारणारच : पुढं ते म्हणाले की, "नाशिकच नाही तर पुणे, धुळे, सातारा अशा जिल्ह्यांमध्ये कांद्याचा प्रश्न उग्र बनलाय. या भागातील शेतकरी अस्वस्थ आहेत. पंतप्रधान मोदी या जिल्ह्यांमध्ये येऊन जर महत्त्वाच्या प्रश्नांना हात घालत नसतील तर साहजिकच कुणीतरी प्रश्न विचारणारच! नाशिकमध्ये हे पहिल्यांदा घडलेलं नाही. याआधी तर लोकांनी त्यांच्यावर कांदे फेकलेत."

राज ठाकरेंवरही साधला निशाणा : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात बोलतांना शरद पवार यांनी पूर्वीच्या काळात अनेक राजकीय पक्ष फोडले. त्यामुळं आता शरद पवारांचा पक्ष फुटलाय,अशी टीका केली होती. यावर शरद पवार यांनी उत्तर दिले. " महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज ठाकरे यांचं नक्की स्थान काय? हे माहिती नाही. मी ऐकलंय की, नाशिक हा त्यांचा बालेकिल्ला आहे. पण हल्ली ते नाशिकमध्ये दिसत नाहीत," असा टोलाही पवारांनी राज ठाकरेंना लगावला.

हेही वाचा -

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवारांना ऑफर; राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया - lok sabha election
  2. एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या पंतप्रधानांच्या ऑफरवर शरद पवार म्हणाले," आम्ही गांधी आणि नेहरुंच्या..." - Sharad Pawar
  3. पक्ष विलिन न करता एनडीएत सहभागी व्हावं; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांना ऑफर - Pm Modi Offered To Sharad Pawar
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.