ETV Bharat / state

Buldhana Crime :  ४ लाखांची लाच मागणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याला रंगेहात पकडले

author img

By

Published : Feb 1, 2023, 4:21 PM IST

Updated : Feb 1, 2023, 4:54 PM IST

Buldhana Crime
४ लाखांची लाच मागणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याला रंगेहात पकडले

विवाह नोंदणीच्या कागदपत्राची माहिती देण्यासाठी ४ लाख रुपये व १ साखरेचे पोते मागणाऱ्या मोताळा तालुक्यातील बोरखेडी येथील ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला १ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ३१ जानेवारीला हा सापळा रचण्यात आला. रामचंद्र गुलाबराव पवार (५४) ग्रामपंचायत बोराखेडी ता. मोताळा जि. बुलडाणा असे या लाचखोराचे नाव आहे.

बुलढाणा : सरकारी कार्यालयांना लागलेली लाचखोरीची कीड कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. गलेगठ्ठ पगार असतानाही लाचेच्या माध्यमातून सरकारी कर्मचारी 'वरकमाई' करत असल्याचे दिसून येत आहे. भ्रष्टाचाराने गंभीर स्वरूप धारण केले आहे. तक्रारदार मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथील असून तडजोडी अंती लाचेची रक्कम दोन लाख रुपयांवर आली. तक्रारदाराने सदर बाब अँटीकरप्शन ब्युरोमध्ये कळवली .

रंगेहात पकडले : बुलढाणा येथील चिखली रोडवर नागरे ठेकेदार यांच्या बंगल्यासमोर गाळा क्रमांक आठमध्ये लाच देण्याचे ठरले. लाचखोर आरोपी रामचंद्र पवार नियोजित वेळेवर पोहोचले. त्या ठिकाणी तक्रारदाराने एक लाख रुपयांची रक्कम रामचंद्र पवार यांना सुपूर्द केली. दबा धरून बसलेल्या अँटी करप्शनच्या पथक याने दुसऱ्याच क्षणाला लाचखोर ग्राम विकास अधिकारी रामचंद्र पवार यांच्यावर झडप घातली. रामचंद्र पवारला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

साखरेचे पोतेही मागितले: शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात सामान्य नागरिकांची कामे लाच दिल्याशिवाय होत नसल्याचे प्रकार नेहमीच उघडकीस येतात. आता तर रोख रकमेसह थेट साखरेचे पोते ही मागितल्याचे समोर आले आहे. बक्कळ पगार असूनही, कर्मचारी,अधिकारी लाच मागत असल्याचे दुर्दैव आहे. मोताळा तालुक्यातील बोराखेडी ग्रामपंचायत येथे ग्राम विकास अधिकारी रामचंद्र गुलाबराव पवार यांच्याकडे एका तक्रारदाराने २००८ या वर्षातील विवाह नोंदणीच्या कागदपत्रांची माहिती मागितली होती. या संदर्भातील अर्ज देखील देण्यात आला होता.


सापळा रचून अटक : मात्र अर्जावरून माहिती देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी रामचंद्र पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष ४ लाख रुपये व १ साखरेचे पोते अशी लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर पवार यांनी २ लाख १ हजार रुपयांची मागणी रेठली. या रकमेपैकी १ हजार रुपये तात्काळ फोन पे द्वारे रामचंद्र पवार यांनी स्वीकारले. उर्वरित रकमेपैकी १ लाख रुपये तात्काळ घेऊन येण्यास रामचंद्र पवार यांनी सांगितले. तक्रारदाराने प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली होती. त्यामुळे बुलडाणा ते चिखली मार्गावरील नागरे ठेकेदार यांच्या बंगल्यासमोरील गाळा क्रमांक ८, सुंदरखेड येथे सापळा रचण्यात आला.

अखेर गुन्हा दाखल : सापळा कारवाईत ग्रामविकास अधिकारी रामचंद्र पवार रंगहाथ अडकले. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनात श्याम भांगे, विलास साखरे, मोहम्मद रिजवान, प्रवीण बैरागी, जगदीश पवार,विनोद लोखंडे, सुनील राऊत,रवींद्र दळवी, स्वाती वाणी यांनी केली.

हेही वाचा : Budget 2023 : 3 लाख रुपयांपर्यंत अजिबात टॅक्स नाही, करपात्र उत्पन्नाची मर्यादा 5 लाखांवरुन 7 लाखावर

Last Updated :Feb 1, 2023, 4:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.