ETV Bharat / state

14 जणांच्या मृत्यूनंतर महापालिका प्रशासनाला जाग; अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरू - illegal hording

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 10:43 PM IST

BMC Notice to Railway : सोमवारी घाटकोपर परिसरात वादळी वाऱ्यामुळं होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं असून प्रशासनानं अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यास सुरुवात केलीय.

अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरु, मध्‍य व पश्चिम रेल्‍वेला पालिकेची नोटीस
अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरु, मध्‍य व पश्चिम रेल्‍वेला पालिकेची नोटीस (ETV Bharat Reporter)

मुंबई BMC Notice to Railway : घाटकोपर मधील छेडानगर परिसरात सोमवारी होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळं खडबडून जागी झालेल्या महानगरपालिकेनं या ठिकाणी परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या अन्य तीन अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करायला सुरुवात केलीय. वाऱ्याच्या वेगामुळं कारवाईत बाधा येत असल्याचं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, आज दोन जाहिरात फलक रात्रीपर्यंत तर एक जाहिरात फलक उद्या 16 मेपर्यंत काढण्यात येणार आहे.

नियमबाह्य जाहिरात फलक रेल्वेनं तातडीनं हटवावे : मध्‍य रेल्‍वे आणि पश्चिम रेल्‍वे हद्दीतील नियमबाह्य आकाराचे म्‍हणजे 40 फूट बाय 40 फूट पेक्षा अधिक आकाराचे सर्व जाहिरात फलक रेल्‍वे प्रशासनानं तातडीनं हटवावेत, या आशयाची नोटीस बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनानं आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 अंतर्गत कलम 30 (2) (व्‍ही) अन्‍वये मुंबई जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष तथा अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त अश्विनी जोशी यांनी बजावलीय. सोबतच छेडानगर परिसरातील आणखी तीन जाहिरात फलक विनापरवाना उभारण्यात आल्याचं आढळून आलं. तीनही जाहिरात फलकांवर कारवाई मोहीम मंगळवारपासून हाती घेण्यात आलीय. वाऱ्याचा वेग, वाहतूक व्यवस्थापन, उपलब्ध मनुष्यबळ यांची सांगड घालून ही कारवाई युद्ध पातळीवर सुरू असल्याचं पालिका प्रशासनानं म्हटलंय.

घटनास्थळ पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर सुरू : दुर्घटनास्थळी सुरू असलेल्या कामात अडथळा न आणता या तीन फलकांवरील कारवाईला वेग दिला जातोय. जाहिरात फलकांचे लोखंडी सांगाडे सुटे करण्याचं आणि ते खाली उतरविण्याचं काम अविरत सुरू आहे. आज रात्रीपर्यंत दोन तर एक जाहिरात फलक उद्या काढण्यात येईल. सुटे झालेले भाग आणि सामान वाहून नेण्यात येत असून घटनास्थळ पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत असल्याचं प्रशासनानं म्हटलंय.


रेल्वेला कायदेशीर नोटीस : मुंबईची भौगोलिक स्थिती तसंच समुद्र किनाऱ्याला लागून असलेला प्रदेश लक्षात घेता हवामान, वाऱ्याची स्थिती पाहता 40 फूट बाय 40 फूट पेक्षा अधिक आकाराचे जाहिरात फलक लावण्‍यास महानगरपालिका प्रशासन परवानगी देत नाही, असं असताना रेल्‍वे प्रशासनाच्‍या हद्दीत महानगरपालिकेच्या रस्‍ते, खासगी जागा, बांधकामांच्‍या लगतच्‍या ठिकाणी नियमबाह्य आकाराचे जाहिरात फलक उभारल्‍याचं आढळून आलंय. हे पाहता घाटकोपरमध्‍ये घडलेल्‍या दुर्घटनेसारखा प्रसंग पुन्‍हा ओढावू नये यासाठी रेल्‍वे प्रशासनाच्‍या हद्दीतील 40 फूट बाय 40 फूट पेक्षा अधिक आकाराचे सर्व जाहिरात फलक तातडीनं काढण्‍याचे निर्देश अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त अश्विनी जोशी यांच्‍या स्‍वाक्षरीनिशी या नोटीसीतून देण्‍यात आल्याचं पालिकेनं म्हटलंय.

हेही वाचा :

  1. अवैध होर्डिंग हटवा, अधिकृत होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करा, आपत्ती व्यवस्थापन विभागाचं फर्मान - Remove illegal hoardings in Nashik
  2. ठाण्याला पावसानं झोडपलं; ठाणे-मुलुंड दरम्यान सिंग्नल यंत्रणा ठप्प; मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली - Weather Update
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.