महाराष्ट्र

maharashtra

संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचा गुंडांबरोबरचा आणखी एक फोटो पोस्ट; म्हणाले 'पैचान कौन?'

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2024, 11:49 AM IST

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोज एका गुंडाबरोबरचा फोटो शेअर करणार असल्याची धमकी दिली होती. त्याप्रमाणं त्यांनी आज (11 फेब्रुवारी) मुख्यमंत्र्यांचा आणखी एक फोटो शेअर केलाय.

Sanjay Raut
खासदार संजय राऊत

मुंबई Sanjay Raut :सध्या राज्यभरात अनेक गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तसंच, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सातत्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका करतायेत. अनेक गुंडांचे मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो आहेत आणि ते आम्ही समोर आणणार आहोत, असंही राऊत म्हणाले होते. त्यानुसार 5 फेब्रुवारीला संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा गुंड हेमंत दाभेकरबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर ते रोज एक फोटो शेयर करत आहेत.

काय आहे आजची पोस्ट? :" पैचान कौन? मा. गृहमंत्री महोदय, हे लाल सिंग महोदय आहेत. खंडणी.. अपहरण..अशा सध्या किरकोळ ठरवल्या गेलेल्या गुन्ह्यातील आरोपी. टीम मिंधेंचे खास मेंबर.. काय करणार तुम्ही? गुंडांनी गुंडासाठी चालवलेले राज्य!" अशी पोस्ट खासदार संजय राऊत यांनी 'एक्स'वर शेयर केलीय.

रोज फोटो होतोय पोस्ट : 10 फेब्रुवारीला संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामध्ये एक व्यक्ती मुख्यमंत्र्यांबरोबर सेल्फी घेताना दिसतोय. त्यामध्ये ''ही व्यक्ती नाशिकमधील गुंड 'वेंकट मोरे' असून तिच्यावर हत्या, अपहरण, दरोडे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत''. असा उल्लेख संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्र भाजपालाही टॅग केलं होतं.

गुंडांना सलाम करण्यात गुंतले : महाराष्ट्र राज्य 'गांx'च्या हातात गेल्यानं गुंड फोफावलेत. जेव्हा त्यांचं राज्य येतं तेव्हा गुंडांचं राज्य सुरू होतं. सध्या राज्यात गुंड हावी झालेत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी नुकतीच भाजपावर टीका केली होती. तसंच, "जा तुम्हाला हवं ते करा, मी बोललोय" असा दमही राऊतांनी भरला होता. तसंच, राज्यातील पोलीस खातं सध्या गुंडांना सलाम करण्यात गुंतलंय, ज्या गुंडांची धिंड पोलिसांनी काढली त्यांना जर शिवसेना-भाजपामध्ये प्रवेश मिळत असेल तर या राज्यात दुसरं काय घडणार? असा थेट प्रश्नही राऊत यांनी यावेळी उपस्थित केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details