ETV Bharat / state

महाराष्ट्र राज्य 'गांx' च्या हातात गेल्यानं गुंड फोफावले; संजय राऊतांची भाजपावर जहरी टीका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 2:02 PM IST

Updated : Feb 10, 2024, 3:18 PM IST

Sanjay Raut : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर शुक्रवार (9 फेब्रुवारी) सायंकाळी भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी वागळे ज्या गाडीत बसले होते, त्या गाडीच्या काचा फोडल्या. शुक्रवारी सायंकाळी वागळे ''निर्भय बनो'' या कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. तेव्हा हा हल्ला करण्यात आलाय. दरम्यान, राज्यात होणारा गोळीबार आणि जीवघेणे हल्ले याबाब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार प्रहार केलाय.

sanjay raut
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद

मुंबई Sanjay Raut : महाराष्ट्र राज्य 'गांx'च्या हातात गेल्यानं गुंड फोफावलेत. जेव्हा त्यांचं राज्य येतं तेव्हा गुंडांचं राज्य सुरू होतं. सध्या राज्यात गुंड हावी झालेत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपावर घणाघात केलाय. तसंच, "जा तुम्हाला हवं ते करा, मी बोललोय" असा दमही राऊतांनी भरलाय. ते मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते. राज्यातील पोलीस खातं सध्या गुंडांना सलाम करण्यात गुंतलंय, ज्या गुंडांची धिंड पोलिसांनी काढली त्यांना जर शिवसेना-भाजपामध्ये प्रवेश मिळत असेल तर या राज्यात दुसरं काय घडणार? असा थेट प्रश्नही राऊत यांनी यावेळी उपस्थित केलाय.

विरोधकांचीही भाजपावर जोरदार टीका : शुक्रवारी पुण्यातील डेक्कन भागात सभागृहात 'निर्भय बनो' सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, वागळे या कार्यक्रमाला जात असताना पुण्यातील काही भाजपाच्या लोकांनी वागळे यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला केला. येथील खंडुजीबाबा चौकात हा पहिला हल्ला झाला. त्यानंतरही काही ठिकाणी त्यांनी असाच हल्ला केला. यामध्ये हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडल्या, गाडीवर शाई फेकली, अंडे फेकले, काठ्यांनीही गाडीची तोडफोड केली. या घटनेनंतर पुण्यासह राज्यभरात एक संतापाचं वातावरण आहे. तसंच, विरोधकांनीही भाजपावर जोरदार टीका केलीय.

वारंवार गोळीबार : सध्या राज्यात गोळीबाराच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपुर्वी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केला. ते प्रकरण ताजं असतानाच ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांना फेसबूक लाईव्ह सुरू असताना गोळ्या घालण्यात आल्या. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. हे सगळ होत असतानाच पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, ऍड. असीम सरोदे यांच्यावर हा हल्ला करण्यात आलाय.

गृहमंत्री कुठं आहेत? : राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अस्थिर परिस्थितीबाबत खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, "मी सांगतोय मला सर्व माहिती आहे. महाराष्ट्रात काय चालू आहे? ते मला माहिती नसेलं तर कोणाला माहिती असणार? महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री कुठं आहेत? ते शोधण्यासाठी आम्ही गृहमंत्री बेपत्ता अशा आशयाची जाहिरात देत आहोत. मुख्यमंत्र्यांचा शुक्रवारी वाढदिवस झाला असं मला कळालं. सेल्फी वगैरे घेतले आहेत गुंडांबरोबर. काल मला असं कळलं की त्यांनी कोणाला फोटो काढू दिले नाहीत. फोटो आणि व्हिडिओ काल सक्त मनाई होते. तरीसुद्धा त्यातील काही फोटो, व्हिडिओ आमच्याकडे आले आहेत."

निष्क्रिय गृहमंत्री लादले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवस सेलिब्रेशनबाबत पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "शुक्रवारच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात कोण-कोण भेटलं? डॉन कोण होते? माफिया कोण होते? मर्डर कोण होते? याची सर्व माहिती फोटो आणि व्हिडिओसह आमच्याकडं आली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था हा सध्या अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. त्याहून चिंतेची बाब म्हणजे या महाराष्ट्रावर लादण्यात आलेले निष्क्रिय गृहमंत्री. शुक्रवारी पुण्यात जिथे अजित पवार पालकमंत्री आहेत तिथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ऍड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी या सामाजिक चळवळीतले तीन प्रमुख वक्त्यांवर हल्ला झाला."

भाडोत्री गुंडांना सुपारी देऊन हल्ले : "पत्रकार, वकील आणि सामाजिक कार्यकर्ते या राज्यात ''निर्भय बनो'' या मोहिमेच्या माध्यमातून ठिकठिकाणी सभा घेत आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न केला. धमक्या देण्यात आल्या. पण, काल लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांच्या पुण्यात निर्भय बनो आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या लोकांवर झालेला निर्घृण हल्ला, त्यांना जीवे मारण्याचा झालेला प्रयत्न याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे," असंही राऊत म्हणाले. भारतीय जनता पक्ष आता शेवटच्या घटका मोजत आहे. त्यामुळे त्यांनी भाडोत्री गुंडांना सुपारी देऊन अशा प्रकारे हल्ले करायला सुरुवात केली आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा :

1 सीबीआयनंतर समीर वानखेडे यांच्यावर ईडीची कारवाई, मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

2 नाशिकमधील गुंडाबरोबरचा मुख्यमंत्र्यांचा फोटो आला समोर; संजय राऊतांनी पोस्ट करत केली 'ही' मागणी

3 अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरण : देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा; विरोधकांची मागणी

Last Updated : Feb 10, 2024, 3:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.