महाराष्ट्र

maharashtra

कधी काळी होती बारा गावांची जहागिरी... आता 'राजा चंदनसिंहा'चे वंशज करत आहेत मजुरी - king Chandansingh Kachwa Story

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 10:37 PM IST

king Chandansingh Kachwa Story : अमरावतीत 'चंदनसिंह कछवा' (Chandansingh Kachwa) या राजपूत राजाचा मोठा इतिहास आहे. कधी काळी ऐश्वर्य संपन्न असलेल्या राजपूत राज घराण्यातील वंशजांवर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आलीय. राजाचे वंशज आज कुठं आहेत? ते काय करतात? त्यांची परिस्थिती कशी आहे?, याचा आढावा घेण्याचा 'ईटीव्ही भारत'नं प्रयत्न केलाय.

Amravati king Story
अमरावती राजा (ETV BHARAT)

अमरावतीत होता चंदनसिंह कछवा राजाचा थाट (Amravati Reporter)

अमरावती king Chandansingh KachwaStory : बारा गावांची जहागिरी, राहण्यासाठी भव्य राजवाडा. अंगात परिधान करायला हिरे आणि मोत्यांचे बटन असणारा कोट, अवतीभवती दास-दासी एकूणच मोठा थाट असणारा राजा आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी साध्या झोपडीत राहायला आला. त्याचे सारे वैभव लयाला गेले. त्याच्या निधनानंतर त्याच्याकडं असणारी शेत जमीन देखील शासनानं ताब्यात घेतली. आपण राजाचे वारसदार आहोत, असं अभिमानानं त्यांची मुलं आणि नातवंड सांगत असले तरी, आज त्यांच्यावर मजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची वेळ आलीय.




वाघडोह येथे चंदनसिंह राजाचे होते राज्य : मेळघाटात आज अचलपूर तालुक्यात असणाऱ्या वाघडोह या गावात कधीकाळी 'चंदन सिंह कछवा' (Chandansingh Kachwa) या राजपूत राजाचे राज्य होते. 1927 मध्ये जन्मलेले 'चंदन सिंह कछवा' हे अगदी सुरुवातीला इंग्रज सरकारमध्ये सैनिक होते. सहा फूट उंच, धिपाड अशी शरीरयष्टी असणाऱ्या चंदन सिंह यांच्याकडं इंग्रज सरकारनं मेळघाटाच्या पायथ्यालगत असणाऱ्या वाघडोह या गावासह लगतच्या 15 गावांची जमीनदारी सोपविली होती. यामध्ये वाघडोहसह गोंडवाघोली, वाघोली, रायपूर, मलकापूर, जानपूर, चिरामल, काकलदरी, गरजदरी, धाडी, सावरपाणी, खीरपाणी दहिगाव, वडाळी, खेडगाव या गावांचा समावेश होता. चंदन सिंह हे या भागाचे राजा म्हणूनच ओळखले जायचे.



वाघडोह गावात होता राजवाडा: वाघडोह या गावात चंदनसिंह राजाचा भला मोठा राजवाडा होता. याच ठिकाणावरुन पंधराही गावाचा कारभार ते चालवत होते. या परिसरात त्यांची फार मोठी जमीन होती. या 15 ही गावाचा न्यायनिवाडा राजा म्हणून चंदन सिंह हेच करायचे. त्यांची राणी कमलाबाई यांचा देखील मोठा थाट होता. अनेक दासी त्यांच्या सेवेत होत्या. राजाला वाघडोह या ठिकाणी गढीच्या मातीनं उभारलेला चंदन सिंह राजाचा भव्य वाडा होता. राजा संपूर्ण परिसरात घोड्यावरुन फिरायचा. राजाचा वाडा म्हणजे 70-80 वर्षांपूर्वी या परिसरातील मोठे वैभव म्हणून ओळखले जायचे. आज मात्र, वाड्याच्या ठिकाणी एक भली मोठी भिंत तेवढी उरली आहे.



राजाला झालीत तीन मुलं: चंदन सिंह राजा आणि राणी कमलाबाई या दांपत्याला एकूण तीन मुलं झालीत. प्रतापसिंह, दत्तूसिंह आणि बेनीसिंह अशी या मुलांची नावे आहेत. मोठा मुलगा प्रतापसिंह यांचा जन्म 1952 मध्ये झाला होता. त्यांच्यापेक्षा सर्वात लहान असणाऱ्या बेनीसिंह कछवा हे त्यांच्यापेक्षा वीस वर्षांनी लहान आहे. प्रतापसिंह यांचे निधन झाले असून दत्तूसिंह आणि बेनीसिंह हे दोन भाऊ सध्या हयात आहेत. प्रतापसिंह यांची मुलं गोलू सिंह आणि रणजीत सिंह, दत्तू सिंहाची मुलं धरम सिंह आणि अजित सिंह तसेच बेनी सिंहाचा मुलगा करण सिंह हे आहेत. आज राजाची दोन मुलं आणि पाच नातवंड अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जगत असून गावात ते मजुरी करत आहेत.



राजाचा असा झाला मृत्यू : 15 गावाचा जमीनदार असणारा 'चंदन सिंह राजा' जो कोट घालायचा त्या कोटाचे बटन हिरे आणि मोती जडित होते. राजाचा आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा मोठा थाट होता. देश स्वतंत्र झाल्यावर काही वर्षांनी राजाची जमीनदारी गेली. अशा परिस्थितीत दहिगाव या ठिकाणी शेताच्या वादातून मोठे भांडण झाले. या भांडणात राजानं चक्क आपल्या बंदुकीतून गोळी झाडून एकाला ठार मारले. राजाला पोलिसांनी अटक केली. यानंतर राजाच्या थाटाला उतरती कळा लागली. न्यायालयात चाललेल्या खटल्यामध्ये मोठा पैसा लागला, यासाठी राजाला आपली जमीन विकावी लागली. पैशांची आवक आता बंद झाल्यामुळं आपल्याकडं जे आहे ते विकून उदरनिर्वाह करण्याची वेळ राजावर आली. हिरे आणि मोती जडीत कोट राजाने अंजनगाव सुर्जी येथील एका सावकाराकडं गहाण ठेवावा लागला. तो कोट अखेरपर्यंत राजाला सोडून आणता आला नाही. वाघडोह येथे आपल्या राजवाड्यात थाटात जगणाऱ्या राजाला परिस्थितीमुळं राजवाडा सोडून जनुना या गावात एका छोट्याशा घरात राहण्याची वेळ आली. 1967-68 दरम्यान राजाचा अत्यंत गरिबीत मृत्यू झाला.



राजाच्या जमिनीवर धरण : अमरावती जिल्ह्यातील खारपान पट्ट्यात येणाऱ्या अंजनगाव आणि दर्यापूर तालुक्याला पाणीपुरवठा करण्यासाठी 1990 मध्ये शहानुर धरण उभारण्यात आलं. 1 हजार 150 चौरस मैल असणाऱ्या या धरणासाठी चंदनसिंह राजाची शेत जमीन सरकारनं घेतली. या जमिनीचा अतिशय तुटपुंजा मोबदला सरकारकडून मिळत असल्यामुळं राजाच्या मुलांनी हा तुटपुंजा मोबदला न घेता अधिक मोबदला मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली. आजपर्यंत आम्हाला धरणात गेलेल्या जमिनीचा कुठलाही मोबदला मिळाला नाही. आता मोबदला मिळण्यासाठी न्यायालयात लढण्यासाठी आर्थिक क्षमता देखील नाही. आजोबा चंदनसिंह यांना देश स्वतंत्र झाल्यानंतर पेन्शन मिळायची. ते गेल्यावर देखील आमच्या कुटुंबाला बाराशे ते पंधराशे रुपये वर्षाला पेन्शन मिळते. मात्र, आमच्या इतक्या मोठ्या कुटुंबासाठी ही पेन्शन अपुरीच असल्याची माहिती, राजाचा नातू रणजीतसिंह कछवा यांनी दिली.



राजाच्या कुटुंबाचं पडक्या घरांमध्ये वास्तव्य : कधीकाळी वाघडोह या गावात असणाऱ्या भल्यामोठ्या राजवाड्यात राहणारे चंदन सिंह राजाचे मुलं आणि नातवंड सध्या जनुना गावात पडक्या तुटक्या घरांमध्ये राहत आहेत. वास्तवात राजाच्या कुटुंबापेक्षा जनुना गावातील इतर कुटुंब बऱ्यापैकी सधन आहेत. राजाची मुलं आणि नातवंड हे फारसे शिकले देखील नाहीत. त्यांच्याकडं पाहून ते खरंच एखाद्या राजाचे वंशज आहेत, असा विश्वास कोणालाही बसणार नाही, दुर्दैवानं अशीच त्यांची अवस्था झाली आहे.

हेही वाचा -

  1. जीवन वाचविणारे पाणीच ठरतेय मृत्यूला आमंत्रण: मेळघाटातील गामस्थांना मूत्रपिंडाचे आजार, अनेकांचे मृत्यू - Amravati water issue
  2. मेळघाटात व्याघ्र दर्शन; कोलकास- सेमाडोह परिसरात पर्यटकांनी अनुभवला थरार
  3. काय सांगता! मेळघाटात चक्क आंब्याच्या झाडाला दाढी; दाढीवाला आंबा अशी खास ओळख

ABOUT THE AUTHOR

...view details