ETV Bharat / state

जीवन वाचविणारे पाणीच ठरतेय मृत्यूला आमंत्रण: मेळघाटातील गामस्थांना मूत्रपिंडाचे आजार, अनेकांचे मृत्यू - Amravati water issue

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 11:15 AM IST

Updated : May 7, 2024, 1:33 PM IST

Amravati water issue
मेळघाटात पाण्याची समस्या (Source - ETV Bharat GFX)

मेळघाटातील जनुना गावातील प्रत्येक कुटुंबात रुग्ण आहेत. क्षारयुक्त पाण्यामुळे अनेकांना मुत्रपिंडाचे आजार आहेत. तर काही जणांचे मृत्यू झाले आहेत.

क्षारयुक्त पाण्यामुळे ग्रामस्थांना प्राणघातक आजार (Source - ETV Bharat Reporter)

अमरावती- अचलपूर तालुक्यातील अगदी टोकावर असणारे शेवटचे आणि मेळघाटात दुर्गम भागात वसलेले जनुना हे गाव जेमतेम दोन हजार लोकवस्तीचे आहे. या गावात अनेक वर्षांपासून केवळ क्षारयुक्त पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षात गावातील अनेक जण दगावले आहेत. आजदेखील गावात अनेकजण आजारी आहेत. जनुना गावातील या गंभीर परिस्थिती संदर्भात 'ईटीव्ही भारत' ने प्रत्यक्ष आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता या गावची भीषण परिस्थिती समोर आली.

प्रत्येक घरात आहेत रुग्ण- क्षारयुक्त पाणी पिल्यामुळे जनुना या गावात प्रत्येक घरात रुग्ण आढळतात. गवळी, धनगर समाजासह मोठ्या संख्येने कोरकू जमातीचे कुटुंब जनुना गावात राहतात. आदिवासी प्रदेश आणि शिक्षणाचा अभाव तसेच अंधश्रद्धेमुळे गावातील अनेकांनी आपल्याला होणाऱ्या वेदना आपला आजार या संदर्भात कधी कुठे तपासणीच केली नाही. मात्र वेदनेमुळे घरातच विव्हळणारे अनेक जण या गावात पाहायला मिळतात. डॉक्टरांजवळ जाऊन तपासणी केलेले सात ते आठ रुग्ण गावात आहेत. यापैकी काही रुग्ण अकोल्याच्या डॉक्टरांकडे तर काही ऋण परतवाडा आणि अमरावती येथील डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत.

गावात दवाखानाच नाही- परतवाडा अकोला मार्गावर असणाऱ्या पथ्रोट गावापासून जंगलात आतमध्ये 18 किलोमीटर अंतरावर उंच पहाडावर जनुनाहे गाव वसले आहे. या गावाला जाण्यासाठी खडतर रस्ता आहे. विशेष म्हणजे शहानुर धरणापासून उंचावर सुमारे पाच किलोमीटर अंतरापर्यंत गावात जाण्यासाठी पक्का रस्ताच नाही. गावामध्ये कुठलाही दवाखाना नाही. गावातील रुग्णांना उपचारासाठी 18 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पथ्रोट या गावातच जावं लागतं. स्थानिक लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत गावात शासकीय दवाखान्याचीदेखील व्यवस्था केली नाही. आम्हाला प्यायला चांगले पाणी नाही. आजारी पडलं तर आरोग्य सेवादेखील नाही. अशी वाईट परिस्थिती आमच्या गावची आहे, अशी खंत ग्रामस्थांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.



दोन वर्षात अनेकांचा मृत्यू- गेल्या दोन वर्षात क्षारयुक्त पाण्यामुळे मूत्राक्षयाचा विकार होऊन मारुती बेलसरे, सुनंदा जामकर, चिमा थोरात, शिवराम तोटे, तानाजी महारनार यांच्यासह आणखी सात ते आठ ग्रामस्थांचे निधन झाले. 2021- 22 मध्ये तर महामारी आल्यासारखी गावात परिस्थिती होती. आजदेखील परिस्थिती गंभीरच परिस्थिती आहे, अशी माहिती जनुना येथील रहिवासी साहेबराव थोरात यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.



तरुण डायलिसिसवर- क्षारयुक्त पाण्यामुळे मुत्रपिंडाचा विकार झाल्यामुळे सुरेश महारनार या 28 वर्षीय युवकानं अकोला येथील डॉक्टर भुसारी यांच्याकडे उपचार घेतले. गेल्या सहा महिन्यापासून परतवाडा येथील तालुका रुग्णालयामध्ये त्याच्यावर डायलिसिस केले जात आहे. गावातील पिण्याच्या पाण्यात क्षार असल्यामुळे माझ्यासह अनेकांची अशी अवस्था झाल्याचे सुरेश महारनार याने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. पंढरी मोरे या वृद्ध व्यक्तींसह त्यांच्या पत्नीदेखील मुत्रपिंड विकारानं ग्रस्त आहे. अमरावती येथील डॉक्टर अविनाश चौधरी यांच्या रुग्णालयात पत्नीला उपचाराकरिता सतत न्यावं लागतं. मीदेखील बारा महिन्यापासून आजारी असल्याचे पंढरी मोरे म्हणाले.


गावालगत धरण, गावात मात्र पाणी नाही- जनुना गावातच शहानुर धरण आहे. या धरणातील पाणी दीडशे किलोमीटर लांब अंतरावर असणाऱ्या खारपाणपट्ट्यातील 235 गावांना पुरविले जाते. धरणातील पाणी दर्यापूर भातकुली तालुक्यात जात असताना धरणापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जनुना गावात पोहोचत नाही, ही खरी शोकांतिका आहे. दोन वर्षांपूर्वी गावात प्रत्येक घरात रुग्ण आढळून आल्यावर पिण्याचे शुद्ध पाणी गावात पुरविले जाईल असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. मात्र आज पर्यंत गावात पिण्यायोग्य पाणी पोहोचले नसल्याची खंत ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.



पाण्याच्या टाकीचे संथ गतीनं काम- जनुना या गावात देखील पिण्यासाठी शुद्ध पाणी येईल, यासाठी पाईपलाईन टाकली जात असतानाच गावात पाण्याची टाकीदेखील उभारली जात आहे. खरंतर एप्रिल महिन्यातच पाण्याची टाकी उभी राहील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र या टाकीचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून आणखी सहा महिने तरी ही टाकी पूर्णपणे उभ राहण्यास वेळ लागेल अशी परिस्थिती आहे.



कुणीही बोलायला तयार नाही- जनुना या गावातील परिस्थिती संदर्भात प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांना कुठली माहितीच नाही. लोकप्रतिनिधींना देखील या संदर्भात कधी दखल घ्यावीशी वाटली नाही. गावातील अशिक्षित आदिवासींचा या संदर्भात कुठे काही बोलण्याचे धाडस होत नाही. जनुना या गावासोबतच या परिसरातील अनेक गावात अशीच परिस्थिती आहे. "भविष्यात मोठे संकट येण्यापूर्वीच या परिसरातील सर्व लहान मोठ्या गावांमध्ये पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे," अशीच आमची अपेक्षा असल्याचे जनुनावासीयांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटलं आहे.

हेही वाचा-

  1. एकेकाळी भीषण पाणी टंचाई तर आता पाणीच पाणी, जाणून घ्या मेळघाटातील 'या' गावाची कहाणी - Amravati
  2. पुढील पिढ्यांसाठी शाश्वत जलस्रोत व्यवस्थापन : जाणून घ्या 'लिक्विड लेगसी'चे पालक - Water Resource Management
Last Updated :May 7, 2024, 1:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.