ETV Bharat / state

मेळघाटात व्याघ्र दर्शन; कोलकास- सेमाडोह परिसरात पर्यटकांनी अनुभवला थरार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 4, 2024, 9:30 PM IST

Amravati News
मेळघाटात व्याघ्र दर्शन

Tiger In Melghat : मेळघाटात मोठ्या संख्येने वाघ असल्याचं सांगितलं जातंय. तर रविवारी दुपारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील कोलकास- सेमाडोह जंगल सफारी दरम्यान, पर्यटकांना दोन वाघांचं दर्शन झालं.

मेळघाटात पर्यटकांनी अनुभवले व्याघ्र दर्शन

अमरावती Tiger In Melghat : माकडांची अचानक सुरू झालेली धावपळ आणि आपल्या सोबत्यांसह परिसरातील सर्व शाकाहारी प्राण्यांना सावध करण्यासाठी विशिष्ट कॉलिंग अर्थात परिसरात भीती आहे. असा आवाज काढून वाघ आला आहे अशी सूचना माकडे द्यायला लागलेत. या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणारे माकड अगदी झाडाच्या उंच फांदीवर जाऊन काही वेळातच चिडीचूप झालेत. मेळघाटातील कोलकास या पर्यटन स्थळावर रविवारी दुपारी माकडांच्या हालचाली बदलताच या ठिकाणी आलेले पर्यटक देखील सावध झाले. आता वाघ दिसणार याची प्रतीक्षा पर्यटक करीत असतानाच परिसरात निरव शांतता पसरली. दुपारी तीन वाजताच्या सुमारास हा सारा थरार पर्यटक अनुभवत असताना याच परिसरात दोन वाघांचे दर्शन पर्यटकांना घडले.



परिसरात दोन दिवसांपासून वाघांचा मुक्काम : मेळघाटात वाघांचे दर्शन हे अतिशय दुर्मिळ आहे. असं असलं तरी कोलकास परिसरात गत दोन दिवसांपासून नर आणि मादी असे वाघाचे जोडपे दोन दिवसांपासून दिसत असल्याची माहिती, सफारीमध्ये पर्यटकांना माहिती देणारे अशोक मावसकर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. रविवारी सकाळी पावणे अकरा ते अकरा वाजेच्या दरम्यान अमरावतीवरून आलेले प्राध्यापक हेमंत खडके आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोलकासवरून परत सेमाडोहला आणताना कोलकासजवळ वाघाचे जोडपे दिसले. कोलकास जवळ वाघाने शिकार केली असून त्या ठिकाणी दोन-तीन दिवसांपासून वाघ असल्याचं देखील अशोक मावसकर म्हणाले. वाघ दिसल्यामुळं आमच्यासोबत असणारे पर्यटक अतिशय खुश झालेत. मेळघाटात वाघ नाही असं म्हणणाऱ्या पर्यटकांना वाघ दिसला, त्यामुळं पर्यटकांनी मोठ्या संख्येनं मेळघाटात यायला हवं अशी भावना, अशोक मावसकर यांनी व्यक्त केली.



वीस वर्षात पहिल्यांदाच मेळघाटात दिसला वाघ : सुमारे वीस वर्षांपासून मी मेळघाटात फिरतो आहे. मेळघाटच्या बाहेर प्राणी संग्रहालयात अनेकदा वाघ पाहिला. मेळघाटात मोठ्या संख्येने वाघ असल्याचं सांगितलं जातं. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला यावर्षी 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. रविवारी कुटुंबासह समाडोह ते कोलकास या जंगल सफारीसाठी गेलो असता कोलकास मधून बाहेर पडताना दूर बांबूच्या वनात वाघ बसल्याचा दिसला. आम्ही आमच्या कॅमेरातून त्याला टिपण्याचा प्रयत्न केला. कॅमेराखाली ठेवल्यावर त्या ठिकाणी एक नव्हे तर दोन वाघ असल्याचं दिसलं. पहिल्यांदा दिसलेला नर होता तर नंतर दिसलेली वाघीण असल्याचं वनविभागाचे गाईड अशोक मावसकर यांनी सांगितलं. त्या ठिकाणी वाघांनी शिकार केली होती आणि हाड फोडण्याचा आवाज येत होता. मेळघाटात वाघानं दर्शन दिलं हा अनुभव अतिशय आनंददायी असल्याचा मत प्राध्यापक डॉ. हेमंत खडके आणि त्यांच्या पत्नी संगीता खडके यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.


वाघाचं दर्शन म्हणजे देवाचं दर्शन : मेळघाटातील मोठ्या संख्येने असणाऱ्या कोरकू या आदिवासी जमातीमध्ये जंगलात वाघाचं दर्शन घडणं म्हणजे प्रत्यक्ष देवाचं दर्शन अशी मान्यता आहे. आम्हाला वाघ दिसल्याची माहिती इतरांना कळल्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया आम्हाला येत आहेत. हा अनुभव खरंच अतिशय थरारक आणि आनंददायी होता. यावर काही लिहिता येईल याचा विचार मी करत असल्याचं देखील प्रा. डॉ. हेमंत खडके यांनी सांगितलंय.



मेळघाटात वाघांचं दर्शन हे दुर्लभ : भारतात 1973 मध्ये घोषित झालेल्या 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत वसलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा एकूण 1 लाख 30 हजार 96 चौरस किलोमीटर परिसरात व्याप्त आहे. यामध्ये गुगामल राष्ट्रीय उद्यान, मेळघाट वन्यजीव अभयारण्य, नरनाळा वन्यजीव अभयारण्य, वान वन्यजीव अभयारण्य आणि अंबाबरवा वन्यजीव अभयारण्य असं क्षेत्र आहे. संपूर्ण मेळघाटात एकूण 44 मोठे वाघ आणि बारा बछडे असं सध्या घडीला एकूण 56 वाघ आहेत. उंच डोंगर आणि तितक्याच खोल दऱ्या मेळघाटात असून या भागात वाघ सहजासहजी दिसतच नाही. अतिशय घनदाट जंगलात गेलं तरी वाघांचं दर्शन दुर्लभच आहे. मेळघाटात येणाऱ्या पर्यटकांना अस्वल, रानगवे हे मात्र बऱ्याचदा दिसतात.



या ठिकाणी आढळलेत वाघ : मेळघाटात लगतच्या काळात 16 फेब्रुवारी 2018 आणि 15 नोव्हेंबर 2019 मध्ये अकोट वन्यजीव क्षेत्रात वाघ दिसला आहे. 25 मे 2016 च्या व्याघ्र गणनेत मेळघाटात तीन वाघ आढळून आले होते. 18 नोव्हेंबर 2020 ला धारगड परिसरात पर्यटकांना जंगल सफारी दरम्यान वाघ दिसला आहे. 18 नोव्हेंबर 2020 आणि 17 जुलै 2021 ला वैराटच्या जंगल सफारी दरम्यान देखील पर्यटकांनी वाघ पाहिला. 28 एप्रिल 2023 ला 96 च्या जंगलात वाघ दिसला. 2022 मध्ये धारणी ते परतवाडा या मुख्य मार्गावर कोलकास नजीकच भर रस्त्यात वाघ चालत असल्याचं पर्यटकांना पाहिलं होतं. पर्यटकांना वाघांचं दर्शन हे दुर्मिळ असलं तरी मेळघाटातील दुर्गम गावातील रहिवाशांना नेहमीच वाघ दिसतो.


उन्हाळ्यात वाघ दिसण्याची शक्यता : पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मेघाटातील संपूर्ण जंगल हे हिरवेगार असते. आता फेब्रुवारी महिन्यापासून पान गळतीला सुरुवात झाल्यामुळं मेळघाटातील जंगल उजाड झालेले जाणवते. जमिनीवर पडलेली सागवानाची पानं आणि वाघांचा रंग हा सारखाच भासत असल्यामुळं अनेकदा वाघ समोर असला तरी तो अनेकांना लक्षात येत नाही. मेळघाटातून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी उन्हाळ्यात आटत असल्यामुळं पाण्याच्या शोधात वाघ घनदाट जंगलातून बाहेर येतात. त्यामुळं उन्हाळ्यात पर्यटकांना वाघाचं दर्शन घडण्याची बरीच शक्यता आहे.

हेही वाचा -

  1. चंद्रपुरात वाघांचं मृत्यूसत्र सुरुच; दीड महिन्यात तब्बल सात वाघांचा मृत्यू
  2. चार राज्यांतून 2 हजार किमीचा प्रवास करुन महाराष्ट्राचा 'रॉयल बंगाल वाघ' पोहोचला ओडिशात; वनाधिकारीदेखील पडले कोड्यात!
  3. पिलीभीतमध्ये घराच्या भिंतीवर रात्रभर बसला वाघ, वनविभागाचे पथक दाखल तर शेतकऱ्यांवर दहशत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.