महाराष्ट्र

maharashtra

'माही'च्या झंझावती फलदांजीनंतरही चेन्नईचा पराभव! शिष्याच्या संघानं रोखला 'गुरु'च्या संघाचा विजयरथ - DC vs CSK

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 31, 2024, 7:17 PM IST

Updated : Apr 1, 2024, 7:09 AM IST

IPL 2024 DC vs CSK : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये, चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात रविवारी चुरशीचा सामना रंगला. या सामन्यात दिल्लीनं चेन्नईचा 20 धावांनी पराभव केला.

'माही'नं मारुनही चेन्नईचा पराभव! शिष्याच्या संघानं रोखला गुरुच्या संघाचा विजयरथ
'माही'नं मारुनही चेन्नईचा पराभव! शिष्याच्या संघानं रोखला गुरुच्या संघाचा विजयरथ

विशाखापट्टणम IPL 2024 DC vs CSK : ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सनं (DC) दमदार कामगिरी करुन इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये विजयाचं खातं उघडलंय. विशाखापट्टणम येथील राजेशेखर रेड्डी स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यात दिल्लीनं चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) 20 धावांनी पराभव केला. दिल्लीचा या मोसमातील हा पहिला विजय आहे. तर चेन्नईचा हा पहिला पराभव आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वोत्तम फिनिशरपैकी एक समजल्या जाणाऱ्या एम एस धोनीलादेखील आपल्या संघाचा पराभव टाळता आला नाही.

धोनीही विजय मिळवून देण्यात अपयशी : या सामन्यात दिल्लीनं चेन्नईला 192 धावांचं लक्ष्य दिलं होतं. त्याला प्रत्युत्तरात चेन्नईचा संघ 6 गडी गमावून केवळ 171 धावाच करु शकला आणि 20 धावांनी सामना गमावला. संघाकडून अजिंक्य रहाणेनं सर्वाधिक 45 धावांची आणि डॅरेल मिशेलनं 34 धावांची खेळी खेळली. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या मोसमात पहिल्यांदा फलंदाजीला आला. पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. धोनीनं या सामन्यात आपलं कौशल्य नक्कीच दाखवलं. णि त्याच्या शैलीत षटकार मारले. 16 चेंडूत 37 धावा करुन तो नाबाद राहिला. दिल्ली संघाकडून मुकेश कुमारनं सर्वाधिक 3 बळी घेतले. तर खलील अहमदनं 2 आणि अक्षर पटेलनं 1 बळी घेतला.

दिल्लीचा हंगामातील पहिला विजय : महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईचा संघ यंदाच्या मोसमातील पहिला सामना हरलाय. याआधी दोन्ही सामने या संघानं जिंकले होते. प्रथम रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चा पराभव केला. त्यानंतर गुजरात संघाचा पराभव केला होता. मात्र, चेन्नईला विजयाची हॅट्ट्रिक करता आली नाही. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सनं या मोसमात आपलं विजयाचं खातं उघडलंय. दिल्ली संघाला पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात दिल्लीचा राजस्थान रॉयल्सकडून पराभव झाला होता.

दिल्लीचा दमदार फलंदाजी : या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सनं 5 गडी गमावून 191 धावा केल्या. संघासाठी डेव्हिड वॉर्नरनं 35 चेंडूत 52 धावांची तर कर्णधार ऋषभ पंतनं 32 चेंडूत 51 धावांची खेळी केली. कार अपघातानंतर पुन्हा मैदानावर परतणाऱ्या ऋषभ पंतचं हे पहिलंच अर्धशतक ठरलं. या व्यतिरिक्त या मोसमात पहिला आयपीएल सामना खेळणाऱ्या पृथ्वी शॉनं 43 धावांची खेळी खेळली. दुसरीकडे, चेन्नई संघाकडून वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानानं 3 बळी घेतले. रवींद्र जडेजा आणि मुस्तफिजुर रहमान यांना प्रत्येकी 1 सामन्यात यश मिळालं.

हेही वाचा :

  1. IPL-2024 मध्ये गुजरातचा दुसरा विजय, मिलरनं षटकार ठोकून केला हैदराबादचा 7 विकेटनं पराभव - IPL 2024
  2. पंजाबच्या 'किंग्स' विरुद्ध लखनौ ठरली 'सुपर जायंट्स'; पंजाबनं गमावला हाताशी आलेला विजय - LSG vs PBKS
Last Updated :Apr 1, 2024, 7:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details