ETV Bharat / sports

'किंग' कोहलीने रचला नवा इतिहास; ठरला आयपीएलमध्ये ८००० धावा करणारा पहिला फलंदाज - Virat Kohli Record

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 12:44 PM IST

विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात ८००० धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. जाणून घेऊ त्याची आयपीएल कारकीर्द.

Virat Kohli
Virat Kohli completes 8000 runs (SOURCE - IANS)

Virat Kohli Record : आयपीएल २०२४ चा एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात विराट कोहली ८००० धावा पूर्ण करणारा आयपीएल इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्यानं राजस्थानविरुद्ध २४ चेंडूत ३३ धावा करत हा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. कोहलीनं आपल्या २५२व्या आयपीएल सामन्यात ८००० धावांचा पल्ला पूर्ण केला आहे. ८००० धावा पूर्ण करताना कोहलीनं ८ शतके आणि ५५ अर्धशतकेही झळकावली आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा : विराट कोहलीच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. तसंच तो ८ हजार धावा करणारा एकमेव खेळाडू आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत शिखर धवन दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याच्या सध्या २२२ सामन्यांमध्ये ६७६९ धावा आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या कोहली आणि धवन यांच्यात १२३५ धावांचा फरक आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रोहित शर्मानं आतापर्यंत २५७ सामन्यांमध्ये ६६२८ धावा केल्या आहेत. या यादीत महेंद्रसिंह धोनी (५२४३ धावा) सहाव्या, एबी डिव्हिलियर्स (५१६२ धावा) सातव्या, ख्रिस गेल (४९६५ धावा) आठव्या, रॉबिन उथप्पा (४९५२ धावा) नवव्या आणि दिनेश कार्तिक (४८३१ धावा) दहाव्या स्थानावर आहे. सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत अन्य कोणताही खेळाडू कोहलीच्या जवळपासही नाही हे या आकडेवारीवरून दिसून येतं.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • विराट कोहली: ८००४ धावा
  • शिखर धवन : ६७६९ धावा
  • रोहित शर्मा : ६६२८ धावा
  • डेव्हिड वॉर्नर : ६५६५ धावा
  • सुरेश रैना : ५५२८ धावा

आयपीएलच्या एका मोसमात दुसऱ्यांदा ७०० धावा : आयपीएल २०२४ च्या सुरुवातीपासूनच ऑरेंज कॅप विराट कोहलीकडे आहे. कोहलीने या मोसमात आतापर्यंत १५ सामन्यात ७४१ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये विराट कोहलीने एकाच मोसमात ७०० किंवा त्याहून अधिक धावा करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०१६ मध्ये त्याने १६ सामने खेळताना ९७३ धावा केल्या होत्या. आयपीएलच्या कोणत्याही दोन हंगामात ७०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला खेळाडू ख्रिस गेल होता, ज्याने २०१२ आणि २०१३ मध्ये असं केलं होतं.

यंदाच्या मोसमात चांगली फलंदाजी : बंगळुरूकडून सलामी करताना विराटने या मोसमात चांगली फलंदाजी केली आहे. आयपीएल २०२४ मध्ये त्याने १५ सामन्यांच्या १५ डावात १ शतक आणि ५ अर्धशतकांसह ७४१ धावा केल्या. या काळात त्याची सरासरी ६१.७५ आणि स्ट्राइक रेट १५४.६९ होता. या मोसमात कोहलीने आपल्या बॅटने ६२ चौकार आणि ३८ षटकार मारले.

बंगळुरूचा ४ गडी राखून पराभव: आयपीएल २०२४ च्या एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून क्वालिफायर-२ गाठली आहे. राजस्थानने आरसीबीचा ४ गडी राखून पराभव केला. आता क्वालिफायर-२ मध्ये राजस्थानचा सामना २४ मे रोजी सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बंगळुरूने ८ गडी गमावत १७२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघानं १९ षटकांत ६ गडी गमावून लक्ष्य गाठलं. राजस्थानकडून फलंदाजी करताना यशस्वी जैस्वालने सर्वाधिक ४५ धावांची खेळी खेळली. तर रियान परागने ३६ आणि हेटमायरने २६ धावांचं योगदान दिलं. आरसीबीकडून मोहम्मद सिराजनं २ बळी घेतले. तर ग्रीन, लॉकी फर्ग्युसन आणि कर्ण शर्मा यांना १-१ विकेट मिळाली.

हेही वाचा -

  1. आरसीबीच्या पराभवानंतर दिनेश कार्तिकची आयपीएलमधून निवृत्ती, जाणून घ्या त्याची कारकीर्द - Dinesh Karthik Retirement
  2. कोलकाता नाईट रायडर्सनं सामना जिंकल्यानंतर शाहरुख खान झाला खूश, चाहत्यांकरिता दिली सिग्नेचर पोझ - Shah rukh Khan signature pose
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.