महाराष्ट्र

maharashtra

Devendra Kumar Upadhyay Oath : न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

By

Published : Jul 29, 2023, 8:16 PM IST

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रमेश धनुका हे ३० मे रोजी निवृत्त झाले. त्यांच्या जागेवर आज अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली.

Devendra Kumar Upadhyay Oath
मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई:अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज (शनिवारी) मुंबईत राजभवन येथे झालेल्या छोटेखानी शपथविधी कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राज्यपाल रमेश बैस यांनी न्यायाधीश उपाध्याय यांना पदाची शपथ दिली.

राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब:मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रमेश धनुका हे यावर्षी ३० मे रोजी निवृत्त झाले. त्यानंतर न्यायालयाचे प्रभारी न्यायमूर्ती नितीन जामदार यांची मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय कौल आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या न्यायवृंदाने ६ जुलै रोजी न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्ये यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्राकडे पाठवली होती. त्यावर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केले.



न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांचा परिचय:न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांचा जन्म दिनांक १६ जून १९६५ रोजी झाला. त्यांनी १९९१ मध्ये लखनौ विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आणि ११ मे १९९१ रोजी वकील म्हणून नोंदणी केली. त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात नागरी आणि घटनात्मक बाजूने कामकाज पाहिले. 21 नोव्हेंबर २०११ रोजी त्यांना अतिरिक्त न्यायाधीश पदावर बढती मिळाली आणि ६ ऑगस्ट २०१३ रोजी त्यांची न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली. आज राजभवनमध्ये झालेल्या शपथविधी कार्यक्रमादरम्यान सुरुवातीला राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी न्यायाधीश उपाध्याय यांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखवली. राष्ट्रगीत व राज्यगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात झाली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

मान्यवरांची उपस्थिती:शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, न्या. उपाध्याय यांचे कुटुंबीय, लोकायुक्त विद्यासागर कानडे, राज्य मानवाधिकार आयुक्त न्या. के के तातेड, राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान, मुंबई व अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश व वकील उपस्थित होते.

हेही वाचा:

  1. Mumbai High Court : आमदारांचा विकास निधी रोखू नका - उच्च न्यायालय
  2. Mumbai High Court : पुणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने झोपडपट्टीवासीयांना बजावलेल्या नोटीसला उच्च न्यायालयाची स्थगिती
  3. Petition For Tree In HC: झाडांच्या बुंध्याला असलेल्या सिमेंट आवरणामुळे झाड कोलमडून पडते आणि...; न्यायालयात याचिका दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details