महाराष्ट्र

maharashtra

थकीत वेतनासाठी कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By

Published : Nov 9, 2020, 4:28 PM IST

गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. त्यामुळे थकीत वेतन लवकर मिळावे, यासाठी सोमवारी कर्मचाऱ्यांकडून कोल्हापूरमध्ये आंदोलन करण्यात आले. दरम्यान वेतन तातडीने न मिळाल्यास, रस्त्यावर उतरू असा इशाराही यावेळी देण्यात आला.

ST workers' agitation in Kolhapur
थकीत वेतनासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

कोल्हापूर -गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे दैनंदिन खर्च कसा भागवायचा असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना पडला आहे. शेजाऱ्यांच्या घरात दिवाळी साजरी होते. मात्र आम्हाला तीन महिन्यांपासून वेतनच न मिळाल्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची अशा व्यथा एसटी कर्मचाऱ्यांनी मांडल्या आहेत. आज थकीत वेतनासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने कोल्हापूरमध्ये आंदोलन करण्यात आले. वेतन न मिळाल्यास रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा या आंदोलनात देण्यात आला.

थकीत वेतनासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सरकारने तीन महिन्यांचे थकीत वेतन तात्काळ जमा करून, दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा कर्मचारी रस्त्यावर उतरून मूकमोर्चा काढतील, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटननेचे विभागीय अध्यक्ष उत्तम पाटील यांनी दिला आहे. ते सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांनकडून वेतनासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात बोलत होते.

वेतनासाठी जागा गहाण ठेवणे दुर्दैवी

थकीत वेतनासाठी एसटी महामंडळाच्या जागा गहाण ठेवणे हे दुर्दैवी आहे. महामंडळाकडे पैसे नाहीत का? असा सवाल करत, शासनाने बँकेला हमीपत्र देऊन कर्ज काढावे. अशी प्रतिक्रिया देखील यावेळी उत्तम पाटील यांनी दिली आहे. दरम्यान राज्यात २८८ आमदार आहेत. पण एकही आमदार एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावला नाही. कर्मचाऱ्यांची प्रत्येक दिवाळी गोड करण्यासाठी आंदोलन करावे लागते. हे कटू सत्य असल्याचेही त्यांनी म्हटले.

या आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

● कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना ५० लाखांची मदत द्यावी
● सक्तीची वीस दिवसांची रजा रद्द करण्यात यावी
● शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता व वेतन उचल द्यावी
● वाढीव महागाई भत्त्याचा फरक द्यावा
● सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची करार फरक रक्कम व शिल्लक रजेचा थकीत पगार द्यावा
● दोन वर्षाची थकीत वैद्यकीय बिले द्यावीत
● एसटी महामंडळ शासनात विलीन करावे

हेही वाचा -एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; ठाकरे सरकारला धरले जबाबदार

हेही वाचा -एसटी आक्रोश आंदोलन LIVE : जळगावात एका कर्मचाऱ्याची आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details