ETV Bharat / state

एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; ठाकरे सरकारला धरले जबाबदार

author img

By

Published : Nov 9, 2020, 12:09 PM IST

मनोज चौधरी हे राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव आगारात वाहक म्हणून सेवारत होते. आर्थिक विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ST employee suicide
एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

जळगाव - थकीत वेतन आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याच दरम्यान, जळगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव आगारात वाहक म्हणून सेवारत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आर्थिक विवंचनेतून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याला त्यांनी ठाकरे सरकारला जबाबदार धरले. ही घटना आज सकाळी समोर आली आहे. मनोज अनिल चौधरी (वय 30) असे आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील रहिवासी होते.

एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन-

दिवाळीसारखा महत्त्वाचा सण दोन दिवसांनी सुरू होत आहे. सणापूर्वी एसटी कामगारांना मागील तीन महिन्याचे थकीत वेतन, माहे ऑक्टोबरचे देय झालेले वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळावी, या मागण्यांसाठी आज राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे.

कोरोनाच्या कालावधीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कामगार काम करीत असूनही त्यांनी केलेल्या कामाचे वेतन त्यांना मिळत नसल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष वाढलेला आहे. एकीकडे राज्यभर आंदोलन सुरू असताना जळगावात एसटी कर्मचाऱ्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

आर्थिक विवंचनेतून उचलले टोकाचे पाऊल-

मनोज चौधरी हे राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव आगारात वाहक म्हणून सेवारत होते. आर्थिक विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी उघडीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी मनोज चौधरी यांनी एसटी महामंडळ आणि राज्य शासनाला जबाबदार धरत एक सुसाईड नोटही लिहिली आहे.

काय लिहिले सुसाईड नोट मध्ये?

"एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार (शिवसेना) आहे. माझ्या घरच्यांचा यात काही संबंध नाही. एसटी संघटनांनी माझा पीएफ व एलआयसी माझ्या परिवारास मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, ही विनंती" असा मजकूर मनोज चौधरी यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिला आहे.

दरम्यान, घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांनी धाव घेतली असून, मृत मनोज चौधरी यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्याची प्रक्रिया सुरू आहे. एसटी कामगार संघटनांचे पदाधिकारी देखील जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.

हेही वाचा- एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनासाठी आक्रोश आंदोलन

हेही वाचा- दिवाळी गिफ्ट! पश्चिम बंगालमध्ये 11 नोव्हेंबरपासून उपनगरीय रेल्वे सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.