महाराष्ट्र

maharashtra

"तू कायमच आमचा कर्णधार राहशील", मुंबई इंडियन्सची रोहित शर्माला उद्देशून भावनिक पोस्ट

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 8:02 PM IST

Rohit Sharma : मुंबई इंडियन्सनं त्यांचा सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माच्या जागी अष्टपैलू हार्दिक पांड्याला टीमचा कर्णधार बनवलं आहे. यानंतर संघानं सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून रोहितला धन्यवाद म्हटलं.

Rohit Sharma
Rohit Sharma

मुंबई Rohit Sharma : मुंबई इंडियन्सनं आयपीएल २०२४ साठी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलं. संघानं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिली. यासह रोहित शर्माच्या कर्णधार म्हणून १० वर्षांच्या कारकीर्दीला पूर्णविराम मिळाला. मुंबई इंडियन्सनं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहून रोहित शर्माचं आभार व्यक्त केलं आहे.

मुंबई इंडियन्सची भावनिक पोस्ट : मुंबई इंडियन्सनं सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, "रोहित तू २०१३ मध्ये कर्णधार झालास. तू आम्हाला विश्वास ठेवायला शिकवलं. विजय आणि पराभवातही तू आम्हाला हसत राहायला सांगायचा. तू आम्हाला कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याची उर्जा दिली. तू १० वर्षात ६ ट्रॉफी जिंकल्या. तुझा वारसा नेहमीच कायम राहील. तू कायमच आमचा कर्णधार राहशील. थॅन्क्यू कॅप्टन रोहित शर्मा", असं या पोस्टमध्ये म्हटलंय.

टीमचा कायापालट केला : रोहित शर्मा २४ एप्रिल २०१३ ला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनला होता. सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिग यांसारख्य दिग्गज खेळाडूंनी सजलेली ही टीम त्यापूर्वी एकदाही विजेतेपदावर नाव कोरू शकली नव्हती. मात्र रोहितनं कर्णधार बनताच टीमचा कायापालट केला. त्याच्या नेतृत्वात मुंबईनं २०१३ मध्ये आपलं पहिलं आयपीएल विजेतेपद पटकावलं. त्यानंतर २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये टीम चॅम्पियन बनली.

अनेक सुपरस्टार खेळाडू घडवले : रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपेकी एक आहे. त्याच्या कारकीर्दीत मुंबई इंडियन्सनं अनेक सुपरस्टार खेळाडू घडवले. हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ईशान किशन यांसारख्या खेळाडूंनी रोहितच्या नेतृत्वातचं आयपीएलमध्ये आपली छाप सोडली. हे सर्व खेळाडू आज भारतीय संघाचे नियमित सदस्य बनले आहेत.

आता हार्दिक पांड्याकडे धुरा : २०२३ च्या आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. तसेच मागील आयपीएलपासून तो एकही टी २० सामना खेळलेला नाही. त्यामुळे भविष्याचा विचार करत मुंबईनं हार्दिक पांड्याकडे संघाची धुरा दिल्याचं म्हटलं जातंय. हार्दिकचा कर्णधार म्हणून रेकॉर्ड शानदार आहे. त्यानं २०२२ मध्ये कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच हंगामात गुजरातला चॅम्पियन बनवलं होतं. तर २०२३ मध्येही त्यानं आपली टीम अंतिम सामन्यापर्यंत नेली होती. मात्र फायनलमध्ये त्यांना चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्कारावा लागला.

हे वाचलंत का :

  1. मोठी बातमी! मुंबई इंडियन्सची धुरा हार्दिकच्या खांद्यावर, रोहितच्या १० वर्षांच्या कारकिर्दीला विराम

ABOUT THE AUTHOR

...view details