महाराष्ट्र

maharashtra

चिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाची परवानगी

By

Published : Sep 20, 2021, 8:30 PM IST

चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून वाद झाला. अशातच सिंधुदुर्गमध्ये चिपी विमानतळ सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळत वचनपूर्ती केल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

उदय सामंत
उदय सामंत

मुंबई - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू करण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने परवानगी दिली आहे. ही माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी कोकण दौऱ्यावर असताना चिपी विमानतळ सुरू करण्याचा शब्द कोकणवासियांना दिला होता. कोरोनाकाळातसुद्धा विकास कामाला गती देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली आहे. सिंधुदुर्गवासीयांचे अनेक वर्षांचे स्वप्न या सरकारने प्रत्यक्षात उतरवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या प्रमुख उपस्थितीत 9 ऑक्टोबर 2021 रोजी चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा होणार आहे, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा-अज्ञाताने रासायनिक खत टाकल्याने 200 क्विंटल कांदा सडला; औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील प्रकार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होणार 500 खाटांचे सुसज्ज रुग्णालय-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी राज्य सरकारने 966 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. 100 विद्यार्थी क्षमतेच्या या महाविद्यालयाशी संलग्नित 500 खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाची 20 एकर जागा वैद्यकीय शिक्षण विभागास देण्यात आली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) नवी दिल्ली यांचेकडून वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष एम. बी. बी. एस. (MBBS) अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याकरिता यावर्षी मान्यता मिळाली आहे. या महाविद्यालयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला नक्कीच चालना मिळेल, असेही सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा-2021 वर्षाच्या बारावीच्या परीक्षा निकालाबाबत विद्यार्थ्यांनी 25 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन!

चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून रंगला होता वाद

  • चिपी विमानतळ आम्‍हीच केले, अशा बढाया शिवसेना आणि भाजपाची नेतेमंडळी मारत आहेत. मात्र या सत्ताधाऱ्यांकडे रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी निधी नाही. राष्‍ट्रीय महामार्गासह ग्रामीण भागातील रस्तेदेखील खड्डेमय झाले आहेत. या खड्डयांचेही श्रेय सत्ताधाऱ्यांनी घ्यावे, अशी टीका मनसे नेते परशुराम उपरकर यांनी 14 सप्टेंबरला केली होती.
  • केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनुसार चिपी विमानतळाच्या उद्धाटनाची तारीख ठरली आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या फुशारक्यांना किंमत नाही. त्यांनी उगाच फुशारक्या मारू नये, अशी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गात माध्यमांशी बोलताना 8 सप्टेंबरला केली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळाची तारीख जाहीर केली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या उद्घाटनासाठी हवेतच असं काही नाही, असेही म्हटलं होतं. त्यावरून विनायक राऊत यांनी राणेंवर टीका केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details