ETV Bharat / state

महाराष्ट्रातून दोन छत्रपतींचे वंशज लोकसभा निवडणुकीच्या मैदानात; राजघराण्यांना राजकीय पक्ष का करतात जवळ? - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 9:28 PM IST

Updated : Apr 16, 2024, 9:44 PM IST

Lok Sabha election
Lok Sabha election

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक जशी विकासाच्या मुद्द्यांवर लढली जाते, तशीच ती भावनिक, अस्मितेच्या मुद्द्यांवरही लढली जाते. महाविकास आघाडीनं भावनिक, अस्मितेच्या मुद्द्याला हात घालत पहिल्यांदाच कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवलं. त्यानंतर महायुतीनं देखील उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचं कार्ड खेळत साताऱ्यातून त्यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळं महाराष्ट्रात आता दोन राजे लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून दिसणार आहेत.

मुंबई Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीनं डावपेच आखायला सुरुवात केलीय. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मितेचा मुद्दा आहे. त्यामुळं महायुतीनं साताऱ्यातून विद्यमान खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना उमेदवारी जाहीर केलीय. तसंच यापूर्वी महाविकास आघाडीनं कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळं महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना राज्यात होणार आहे.

एक मत गादीला : राजेशाही संपुष्टात आल्यानंतरही महाराष्ट्रात आजही वतनदार, सरंजामदार, राजांचे वारसदार यांना प्रजा मान देत असल्याचं दिसून येतंय. महाराष्ट्रात होळकर, जाधव, निंबाळकर, शिंदे, भोसले यांच्या घराण्यातील वारसांना राज्यात चांगलाच मान मिळतोय. त्यामुळं या वारसांचा आजही महाराष्ट्रात सन्मान करण्याची परंपरा कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर तसंच सातारा या छत्रपती शिवरायांच्या वंशाच्या गाद्या मानल्या जातात. या दोन्ही गाद्यांना पश्चिम महाराष्ट्रात खूप आदर आहे.

दोन राजे निवडणुकीच्या मैदानात : कोल्हापूर तसंच साताऱ्यात आजही राजांवर जनतेचं विशेष प्रेम दिसतंय. त्यामुळं मालोजीराजे यांना कोल्हापुरातील जनतेनं आमदार म्हणून स्वीकारलंय. साताऱ्यात केवळ जनतेच्या प्रेमामुळं छत्रपती उदयनराजे भोसले सातत्यानं विजयी होतायेत. "छत्रपती संभाजीराजे यांना भाजपानं राज्यसभेवर पाठवलं होतं. त्यामुळं राजघराण्यातील व्यक्ती आपल्यासोबत दाखवण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न असतो," असं कोल्हापुरातील ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विश्वास पाटील यांनी म्हटलंय. जनतेच्या मनातील भावनेचा फायदा घेण्यासाठी महाविकास आघाडीनं प्रथमच शाहू महाराजांना उमेदवारी दिली. सामाजिक, राजकीय जीवनात फारसा वावर नसलेल्या छत्रपतींना जनतेचा प्रतिसाद मिळेल अशी महाविकास आघाडीला खात्री आहे.

साताऱ्यात पुन्हा उदयनराजे : "महाविकास आघाडीनं कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यामुळं भाजपाकडं प्रबळ अन्य दावेदार असतानाही या मतदारसंघातून पुन्हा एकदा उदयनराजे यांना उमेदवारी द्यावी लागली. गेल्या लोकसभा निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा पराभव केला होता. मात्र, तरीही जनतेच्या मनात छत्रपती घराण्याविषयी आदर दाखवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यामुळं भाजपानं पुन्हा एकदा उदयनराजे भोसलेंना उमेदवारी दिली असावी," असंही विश्वास पाटील यांनी म्हटलंय.

छत्रपती शिवरायांचे वंशज : छत्रपती शिवरायांच्या वंशावळीत कोल्हापूरची गादी तसंच साताऱ्याची गादी अशा दोन गादी निर्माण झाल्या. यापैकी साताऱ्याच्या गादीवर छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. कोल्हापूरच्या गादीवर शाहू महाराज छत्रपती निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळं यंदा दोन राजे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

हे वाचलंत का :

  1. ठाकरेंसमोर काँग्रेस चितपट; दोन कळीच्या जागांवर मारली बाजी - Lok Sabha Election 2024
  2. सलमान खानच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची; गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदे सलमानच्या भेटीला - Salman Khan House Firing Case
  3. राज ठाकरेंनी उष्णतेच्या लाटेवरुन हवामान विभागाला झापलं; काय म्हणाले नेमकं? - Raj Thackeray on Weather Department
Last Updated :Apr 16, 2024, 9:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.