ETV Bharat / state

मुंबईत 400 इमारतींच्या गच्चीवर होर्डिंग; पालिकेनं दहा दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे दिले आदेश - Mumbai Hoarding News

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 18, 2024, 8:25 PM IST

Mumbai Hoarding News : घाटकोपर येथे होर्डिंग (Hoarding) कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर बेकायदा होर्डिंगचा मुद्दा चर्चेत आलाय. तर आता मुंबईत सुमारे 400 सोसायट्यांच्या गच्चीवर होर्डिंग असल्याची बाब समोर आलीय.

Hoarding Collapse News
मुंबईत 400 इमारतींच्या गच्चीवर होर्डिंग (Mumbai Reporter)

मुंबई Mumbai Hoarding News : 13 मे हा मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरला. भारतीय हवामान विभागानं आधीच वादळीवाऱ्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, हे वादळ सोळा मुंबईकरांचा जीव घेईल याचा कोणी विचारही केला नव्हता. 13 मे रोजी हवामान विभागाच्या अंदाजानुसार संध्याकाळी वादळीवाऱ्यांना सुरुवात झाली आणि घाटकोपर येथे एक मोठं होर्डिंग (Hoarding) कोसळलं. या होर्डिंगखाली दबून तब्बल 16 जणांचा मृत्यू झाला. या मृत्यू तांडवावरून नेतेमंडळींमध्ये आणि प्रशासकीय पातळीवर सध्या राजकारण सुरू आहे. त्यातच आता इमारतींवरील होर्डिंगचा मुद्दा चर्चेला आला आहे.


तीन दिवसात होर्डिंग काढा : या दुर्घटनेनंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने रेल्वे प्रशासनाला नोटीस बजावली आहे. दादर पूर्वेला रेल्वेच्या हद्दीत तब्बल आठ होर्डिंग लावण्यात आले आहेत. हे होर्डिंग पालिकेनं घालून दिलेल्या नियमांना धरून नसल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. त्यामुळं संबंधित आठ होर्डिंग रेल्वे प्रशासनाने पुढील तीन दिवसात हटवावीत असं पालिकेने नोटीसमध्ये म्हटलंय. या संदर्भात पालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी रेल्वे प्रशासनाला संबंधित होर्डिंग तीन दिवसात हटवावीत असं सांगितलं. अन्यथा ही होर्डिंग महानगरपालिका काढेल आणि या होर्डिंगवरील कारवाईत जो काही खर्च येईल तो खर्च रेल्वेकडून वसूल केला जाईल, असा इशाराच गगराणी यांनी दिलाय.


इमारतींवरील होर्डिंगकडं पालिका लक्ष देणार का? : मुंबईत बहुतांश होर्डिंग हे रस्त्याच्या कडेला किंवा रेल्वेच्या आजूबाजूच्या परिसरात आहेत. मात्र, मुंबईत अनेक होर्डिंग अशीही आहेत जी रहिवासी इमारतींच्या गच्चीवर आहेत. मुंबईत तब्बल 400 इमारती अशा आहेत ज्यांच्या गच्चीवर मोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत. घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर पालिका प्रशासन सतर्क झालं असून, पालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी सध्या 'कोणत्याही नव्या जाहिरातीला परवानगी देऊ नका' असे आदेशच संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळं आता पुढचा काही काळ मुंबईत नवे होर्डिंग उभे राहणार नसले तरी, जुन्या होर्डिंगचं काय? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. सोबतच त्यात इमारतींवरील होर्डिंगकडं पालिका लक्ष देणार का? हा प्रश्न उभा राहतो.

सोसायटीतील सदस्यांची परवानगी : या संदर्भात मुंबईतील ओम शांती अपार्टमेंट या निवासी इमारतीचे सेक्रेटरी विशाल कनोजिया यांनी सांगितलं की, इमारतीवर होर्डिंग लावायची असल्यास आम्ही सोसायटीची एक मीटिंग घेतो. सोसायटीतील सर्व सदस्यांची परवानगी असेल तरच आम्ही परवानगी देतो. यात सोसायटीतील सदस्यांच्या ज्या काही सूचना असतील त्यावर देखील विचार केला जातो. यावर प्रशासकीय परवानगी देखील घेतली जाते. या बदल्यात संबंधित जाहिरातदार त्याचा मोबदला आम्हा सोसायटी धारकांना देतात.



सोसायटींवरील होर्डिंगवर बंदी : प्राप्त आकडेवारीनुसार, मुंबईत एकूण 400 निवासी इमारती अशा आहेत ज्यांच्या टेरेसवर मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत. यात काही जुन्या इमारती देखील आहेत. या इमारतींची संख्या किती? याची आकडेवारी जरी समोर आली नसली तरी, या इमारती मोठ्या होर्डिंगचा भार झेलण्यासाठी खरंच सक्षम आहेत का?, या जुन्या इमारती किती जुन्या आहेत? याचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं आहे. पालिकेच्या लायसन्स विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी सांगितलं की, सोसायटीमधील होर्डिंगमुळं अनेकदा टेरेस गळणे, इमारतीची मजबूतता कमी होणे अशा घटना घडतात. यावर उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने सोसायटींवरील होर्डिंगवर बंदी घातली.


स्ट्रक्चरल ऑडिट होणार : पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही इमारतींवर होर्डिंग उभारण्यास परवानगी देणं बंद केलं आहे. तुम्हाला जर इमारतीच्या संरक्षक भिंतीवर होर्डिंग उभारायचं असेल किंवा इमारतीच्या आसपास एखादे होर्डिंग उभारण्याचं असेल तरच पालिका परवानगी देते. लायसेन्स विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी सांगितलं की, सध्या मुंबई महानगरपालिकेच्या अख्यारीत 1 हजार 25 होर्डिंग आहेत. यात ज्या इमारतींवर होर्डिंग लावण्यात आली आहेत त्यांना आम्ही नोटीस बजावली आहे. या गृहनिर्माण संस्थांनी स्वतःहून आपल्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करायचं आहे. त्याचा अहवाल दहा दिवसात महानगरपालिकेला सादर करायचा आहे. यासंबंधीतले आदेश आम्ही सदर गृहनिर्माण सोसायटीना पाठवले आहे. दरम्यान, आता या गृहनिर्माण संस्थांच्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालातून नेमकी काय माहिती पुढे येते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

हेही वाचा -

  1. मुंबईनंतर पिंपरी चिंचवडमध्ये कोसळले लोखंडी होर्डिंग...; वाहनांचं झालं नुकसान, पाहा व्हिडिओ - Pune Hoarding Collapse
  2. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांची संख्या 16 वर पोहोचली, बड्या अधिकाऱ्याचा पत्नीसह मृतदेह कारमधून काढला बाहेर - Ghatkopar hoarding collapse News
  3. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांची संख्या 16 वर पोहोचली, बड्या अधिकाऱ्याचा पत्नीसह मृतदेह कारमधून काढला बाहेर - Ghatkopar hoarding collapse News
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.