ETV Bharat / state

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात कीर्तिकर पिता-पुत्राचा सामना रंगण्याची शक्यता

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 5:06 PM IST

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांनी उमेदवारीसाठी दावा करायला सुरूवात केली आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये बाप विरुद्ध बेटा अशी रंगत होण्याची चिन्ह आहेत. तिथं गजानन कीर्तिकर शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) आहेत तर त्यांचा मुलगा शिवसेना ठाकरे गटात आहे.

kirtikar father and son
किर्तीकर पिता-पुत्र

मुंबई : लोकसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांतच होईल अशी स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीय. एकीकडे भाजपचा 'अबकी बार 400 पार'चा नारा दिला जात आहे. पंतप्रधान स्वत: आपण तिसऱ्यांदा सत्तेत येणार असल्याचा दावा करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना आणि त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झालीत. त्यामुळे अनेक जाग्यांवर उमेदवारीवरून गोंधळ होण्याची शक्यता आहे. आता उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये 'बाप विरुद्ध बेटा' अशी लढत होण्याची चिन्हं आहेत.

पिता फुटला पण पुत्राची निष्ठा कायम : मुंबईतील 6 मतदारसंघांपैकी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ हा अतिशय महत्त्वाचा असा मतदार संघ आहे. या मतदारसंघांमध्ये आतापर्यंत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशाच पद्धतीचा सामना बघायला मिळाला. परंतु, यावेळी मात्र या मतदारसंघात विशेष अशी लढत असणार आहे. याचं कारण या मतदारसंघातील विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे गटात प्रवेश केल्याने येथील चित्र बदलू शकते. गजानन कीर्तिकर हे जरी एकनाथ शिंदे गटात गेले असले तरी त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरे गटातच असल्याने उद्धव ठाकरे गटाकडून या मतदारसंघात त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

आघाडीतील पक्षांना जागा सुटणार नाही : उद्धव ठाकरे आघाडीतील इतर पक्षांना हा मतदारसंघ सोडणार नाहीत, अशी स्थिती आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जो दगाफटका केला आहे, त्याचा वचपा काढण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडूनही पूर्ण तयारी करण्यात आली असून, मागच्या 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झालेल्या खासदारांच्या जागेवर कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवार उभा करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने या मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर विरुद्ध त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर असा सामना पाहायला मिळू शकतो.

शिंदेंकडून ही जागा खेचण्याचा प्रयत्न : 2014 व 2019 असे सलग दोन लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून गजानन कीर्तिकर यांनीच बाजी मारली आहे. 2014 च्या निवडणुकीत गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेसचे उमेदवार गुरुदास कामत यांचा 1 लाख 83 हजार 28 मतांनी पराभव केला होता. तर 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांचा 2 लाख 60 हजार मतांनी पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांना 60.95 टक्के मतं मिळाली होती. तर 2019 च्या निवडणुकीत गजानन कीर्तिकर यांना 56.61 टक्के मतं मिळाली होती. राज्यात एकनाथ शिंदेंपाठोपाठ अजित पवार यांनी सुद्धा सत्तांतर केल्याने राज्यातील राजकीय गणितं बदलली आहेत.

उमेदवारच नसल्याचा दावा : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ तसं पाहिल्यास यावर काँग्रेसचं यापूर्वी वर्चस्व राहिलं आहे. 1999, 2004 या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुनील दत्त या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर त्यांचा मुलगा अभिनेता संजय दत्त ड्रग्स प्रकरणामध्ये अडकल्यानंतर त्यांची या मतदारसंघावरील आपली पकड सैल झाली. परंतु, 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसचेच गुरुदास कामत या मतदारसंघातून विजयी झाले. तसं पाहिलं तर या मतदारसंघावर काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. परंतु 2014 व 2019 च्या निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसची पकड सैल झाल्याने शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर या मतदारसंघातून निवडून आले आहेत. एकंदरीत या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व मोठ्या प्रमाणामध्ये असल्याने व दुसरीकडे गजानन कीर्तिकर यांनी पक्षांतर केल्याने या मतदारसंघावर काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी दावा केला आहे.

अनेकांचा उमेदवारीचा दावा : संजय निरुपम यांनी या मतदारसंघातून लढण्यासाठी काँग्रेसकडे आग्रह धरला आहे. सध्याचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांना रामराम करून शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेकडे या मतदारसंघांमध्ये उमेदवारच नाही, असं सांगत संजय निरुपम यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून या मतदारसंघासाठी गजानन कीर्तिकर यांनाच उमेदवारी दिली जाईल असे संकेत मिळत असताना शिंदे गटातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी त्यांचा मुलगा सिद्धेश कदम याच्यासाठी या मतदारसंघातून उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रह धरला आहे. अशा परिस्थितीमध्ये गजानन कीर्तिकर की सिद्धेश कदम असा वाद रंगला असतानाच माजी आमदार अभिजीत अडसूळ हे सुद्धा या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा सुरू आहे.

भाजप आणि शिवसेनेकडे समसमान विधानसभा : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी जोगेश्वरी पूर्व, आमदार रवींद्र वायकर, अंधेरी पूर्व, आमदार ऋतुजा लटके, दिंडोशी, आमदार सुनील प्रभू हे तीन आमदार उद्धव ठाकरे गटाबरोबर आहेत. तर, गोरेगाव, आमदार विद्या ठाकूर, अंधेरी पश्चिम, आमदार अमित साटम, वर्सोवा, आमदार भारतीय लव्हेकर हे तीन आमदार भाजपाचे आहेत. एकूण 6 विधानसभा आमदारांपैकी 3 उद्धव ठाकरे गटाचे तर 3 भाजपाचे असल्याने या मतदारसंघात भाजपा विरुद्ध उद्धव ठाकरे असाच सामना मोठ्या प्रमाणात रंगण्याची चिन्हं आहेत.

भाजपाकडून अमित साटम यांचं नाव चर्चेत : मुंबईतील लोकसभेच्या 6 पैकी 6 मतदारसंघ काबीज करण्याची भाजपची रणनीती असून भाजपकडून या मतदारसंघात आमदार अमित साटम यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे गटात उमेदवारीवरून रंगलेला वाद पाहता भाजप या वादाचा फायदा घेत या मतदारसंघातून त्यांच्याकडून उमेदवार उभा केला जाण्याची जास्त शक्यता आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मतदारसंघप्रमुख म्हणून भाजपाकडून अमित साटम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा :

1 जिथे औरंगजेबाचा नक्षा उतरवला, तिथे साजरा होतोय शिवजन्मोत्सव सोहळा! आग्र्यातील लाल किल्ल्यात भव्य कार्यक्रमांचं आयोजन

2 निवडणूक आयोग पाच वर्षे झोपा काढतं का? राज ठाकरेंनी सुनावलं, मराठा आरक्षणावरही दिली प्रतिक्रिया

3 मातोश्रीच्या पायऱ्या कोण चढलं होतं?; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांसह अमित शाहांना सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.