ETV Bharat / state

निवडणूक आयोग पाच वर्षे झोपा काढतं का? राज ठाकरेंनी सुनावलं, मराठा आरक्षणावरही दिली प्रतिक्रिया

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 1:25 PM IST

Updated : Feb 19, 2024, 1:55 PM IST

Raj Thackrey on Election Commission : सध्या देशासह राज्यात निवडणुकांचा काळ सुरू आहे. लोकसभा निवडणुका सध्या तोंडावर आल्यानं प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. निवडणुकांच्या कामासाठी शाळेतील शिक्षकांना ड्युटी लावली जाते. हाच मुद्दा धरत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निवडणूक आयोगाला चांगलंच झापलंय. तसंच मराठा आरक्षणासाठी उद्या घेण्यात येणाऱ्या विशेष अधिवेेशनावरही राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय.

राज ठाकरे
राज ठाकरे

मुंबई Raj Thackrey on Election Commission : निवडणूक आयोगानं राज्यातील शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपल्याबाबत राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली आहे. दर पाच वर्षांनी निवडणुका येतात हे माहिती असताना निवडणूक आयोग का तयारी करत नाही? निवडणूक आयोग झोपा काढतं का? शिक्षकांना या कामाला लावून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, असा इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलाय.

पालकांनी घेतली राज ठाकरेंची भेट : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज निवडणूक आयोगावर जोरदार टीका केलीय. निवडणुका आल्या की सर्वात आधी शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात येतं. यामुळं राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचं नुकसान होतं की नाही याकडं निवडणूक आयोग आणि राज्य सरकारही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना केलाय. मुंबईतील काही शाळातील पालकांनी याबाबत राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीबाबत दखल घेण्याची विनंती करून निवेदन दिलंय. यानंतर राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना परखड मत व्यक्त केलंय.

निवडणूक आयोग झोपा काढतं का? : पहिली ते चौथीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात आलंय. किती कालावधीसाठी या शिक्षकांना हे काम देण्यात आलंय याची माहिती देण्यात आलेली नाही. तसेच या काळात शाळेतील मुलांना कोण शिकवणार? त्यांची काय पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे का? याबाबतही माहिती देण्यात आलेली नाही. राज्यात विविध निवडणुका येत असतात. या निवडणुकांची तयारी करायची असते हे निवडणूक आयोगाला माहिती नाही का? शिक्षक निवडणुकीची कामे करण्यासाठी भरती झाले आहेत का? असं म्हणत निवडणूक आयोग पाच वर्ष झोपा काढत असते का? त्यासाठी यंत्रणा उभी करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची नाही का? असे सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.

शिस्तभंगाची कारवाई करू देणार नाही : मुंबई महानगरपालिका हद्दीतील 4136 शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी नेमण्यात आलंय. एवढे शिक्षक बाहेर काढल्यावर शिकवणार कोण हा प्रश्न निर्माण होतो. तसेच जर या शिक्षकांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपस्थिती दर्शवली नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे आदेश देण्यात आले आहेत. मग निवडणूक आयोगावर का शिस्तभंगाची कारवाई करू नये? निवडणूक आयोगाने नवीन लोक नियुक्त करावेत आणि त्यांना प्रशिक्षित करावे, या शिक्षकांवर कोण शिस्तभंगाची कारवाई करते ते मी पाहतोच, अशा शब्दात राज ठाकरे यांनी इशारा दिलाय. तसेच न्यायालयाने फक्त तीन दिवस प्रशिक्षणासाठी आणि दोन दिवस निवडणुकीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे या संदर्भात आता मनसे पदाधिकाऱ्यांची उद्या एक बैठक घेणार आहोत आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाला आम्ही यासंदर्भात भेटणार आहोत, असेही राज ठाकरे यांनी सांगितलं.

विशेष अधिवेशनाचा उपयोग नाही : मराठा आरक्षणाचा विषय हा केंद्राच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यामुळं मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं मंगळवारी विशेष अधिवेशन बोलावलं असलं तरी या अधिवेशनाचा काहीही उपयोग होणार नाही, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार आणि आपली भेट झाली आहे का? आपण महायुतीत सामील होणार का? असं विचारलं असता राज ठाकरे म्हणाले की, याबाबत जेव्हा निवडणुका येतील, तेव्हा मी बोलेन. सध्या या विषयाबाबत काहीही बोलणार नाही.

हेही वाचा :

  1. चंदीगड महापौर निवडणूक : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वीच मोठा उलटफेर; भाजपाच्या महापौरांचा राजीनामा तर आपचे तीन नगरसेवक भाजपात
  2. शिवनेरीवरून मराठा आरक्षणाबाबत मोठं अपडेट, जाणून घ्या काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
Last Updated :Feb 19, 2024, 1:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.