ETV Bharat / state

अमरावतीत 'जंग ऐ मैदान'; अमित शाहांच्या सभेवरुन बच्चू कडू आक्रमक; भाजपावर हल्लाबोल - Amravati Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 23, 2024, 5:25 PM IST

Updated : Apr 23, 2024, 6:00 PM IST

Ravi Rana Bachchu Kadu
सायन्सकोर मैदानाच्या आरक्षणावरून मोठा वाद

Amravati Lok Sabha Election 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघात येत्या 26 एप्रिलला मतदान होत आहे. प्रचार अंतिम टप्प्यात असताना एका सभेच्या मैदानावरून आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) एकमेकांसमोर उभे ठाकले. आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अमरावतीच्या सायन्सकोर मैदानाच्या (Science Score Ground) आरक्षणावरून मोठा वाद निर्माण झालाय.

सायन्सकोर मैदानाचा वाद चिघळला

अमरावती Amravati Lok Sabha Election 2024 : अमरावती जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha Election) वातावरण तापलं असून, शेवटच्या दोन दिवसात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. अमरावती शहरातील बस स्थानकाजवळील 'सायन्स कोर' या (Science Score Ground) मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या सभेसाठी मोठा मंडप उभारण्यात येतोय. भाजपाच्या वतीनं याच मैदानावर सभा घेण्यात येणार असून, त्यासाठी कोणत्याही पद्धतीची परवानगी घेतली गेलेली नाही, असा दावा आमदार बच्चू कडू यांनी केलाय.

'प्रहार'कडं परवानगी : 'सायन्स कोर' मैदानासाठी बच्चू कडू यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचार सभेसाठी 23 आणि 24 एप्रिल रोजी हे मैदान आधीच आरक्षित केलं होतं. त्याबाबतची रीतसर परवानगी त्यांच्याकडं आहे. त्यामुळं आपल्याकडं परवानगी असताना भाजपाचा कार्यक्रम इथं कसा होतो आणि त्यासाठी परवानगी कोणी दिली? असा प्रश्न करत बच्चू कडू यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. जोपर्यंत आपल्याला हे मैदान दिलं जात नाही आणि भाजपाचा हा मंडप हटवला जात नाही, तोपर्यंत आपण इथून उठणार नाही, असा पवित्रा बच्चू कडू यांनी घेतला.

परवानगीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश : या मैदानासाठी बच्चू कडू यांना देण्यात आलेल्या परवानगीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, 23 आणि 24 तारखेला साडेचार वाजेपर्यंत हे मैदान दिनेश बुब यांना देण्यात येत आहे. तोपर्यंत या मैदानावर अन्य कुठल्याही पक्षाचा अथवा अन्य कुणाचा प्रवेश होता कामा नये. परंतु, असं असतानाही या मैदानात भाजपा कशा पद्धतीनं मंडप उभारू शकतं आणि पोलीस त्यांना का उभारू देतात? असा सवाल कडू यांनी उपस्थित केला. सरकारी यंत्रणेचा गैरवापर आणि तानाशाही सत्ताधारी पक्ष करत आहे आणि हे आम्ही बिलकुल खपवून घेणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

आमदार बच्चू कडू संतापले : अमरावतीमधील सभेच्या मैदानाचा वाद आता तापला असून, त्यामुळं आमदार बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाल्याचं दिसून आलं. पहिली आम्हाला परवानगी दिली आणि नंतर ती रद्द करून त्याच ठिकाणी अमित शाहांच्या सभेला परवानगी देण्यात आल्यामुळं आमदार बच्चू कडू संतापले. कायदा राखण्याचं काम करणाऱ्या पोलिसांनीच आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला.

हेही वाचा -

  1. खऱ्या भाजपावाल्यांनी फक्त सतरंज्याच टाकायच्या का? बच्चू कडूंचा सवाल; बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्यानं बच्चू कडू संतापले - LOK SABHA ELECTION 2024
  2. "प्रचाराच्या पोस्टरवरुन माझा फोटो काढा अन्यथा...", नवनीत राणांविरोधात महायुतीतील अजून एक नेता आक्रमक - Amravati Lok Sabha Constituency
  3. अमरावतीचं पोस्टमार्टम झालंय, नवनीत राणांच्या उमेदवारीवरून बच्चू कडू यांची टीका - Bachu Kadu criticizes Navneet Rana
Last Updated :Apr 23, 2024, 6:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.