ETV Bharat / state

खऱ्या भाजपावाल्यांनी फक्त सतरंज्याच टाकायच्या का? बच्चू कडूंचा सवाल; बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्यानं बच्चू कडू संतापले - LOK SABHA ELECTION 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 6:40 PM IST

Bacchu Kadu Criticizes BJP
बच्चू कडूंचा सवाल

Bacchu Kadu Criticizes BJP : इतर पक्षातून भाजपात आलेल्या नेत्यांना भाजपा उमेदवारी देते; मात्र पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांना भाजपा डावलते. आता खऱ्या भाजपावाल्यांनी फक्त सतरंज्याच टाकायच्या का? असा प्रश्न प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आज अमरावतीत विचारला आहे. वाचा सविस्तर वृत्त.

बच्चू कडू भाजपावर टीका करताना

अमरावती Bacchu Kadu Criticizes BJP : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळचे संबंध असणाऱ्या आमदार श्रीकांत भारतीय यांचे आई-वडील घरात एकटेच असताना त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. श्रीकांत भारतीय यांचे भाऊ तुषार भारतीय भाजपाचे कार्यकर्ते आहेत. ते आमच्या अचलपूर मतदारसंघातले आहेत. आपल्या माणसांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांना भाजपाने उमेदवारी देणं शोभणार नाही. जिल्ह्यात भाजपाच्या पालकमंत्र्याला बालक मंत्री म्हणणारे आणि त्यांना बांगड्या देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. हा सारा प्रकार अतिशय दुर्दैवी आणि न पटणारा आहे. अशा प्रवृत्तींपेक्षा एखादा फाटका उमेदवार जरी उभा केला असता तरी आम्ही भाजपासोबत असतो असं देखील आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेला आमदार बच्चू कडू यांनी संबोधित केलं.

कदाचित जेलची पायरी चढावी लागेल : संपूर्ण देशात दमदाटीचे राजकारण सुरू आहे. असे असताना अमरावतीत आम्ही 500-600 कोटी रुपये संपत्ती असणाऱ्यांसोबत लढा देत आहोत. आमची ही लढाई सोपी नाही. सत्ताधारी कदाचित उद्या आम्हाला जेलची पायरी चढायला लावतील, असं प्रहारचे प्रमुख आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

जनतेच्या न्यायालयात धडा शिकवू : नवनीत राणा यांचे जातीचे प्रमाणपत्र खोटे आहे हे उच्च न्यायालयात स्पष्ट झालं आहे. असं असताना आज दुर्दैवाने सत्ताधारी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रकार अतिशय धोकादायक आहे. न्यायालय जरी खोट्यांच्या बाजूने असले तरी जनतेच्या न्यायालयात मात्र या खोट्या लोकांचा योग्य न्याय केला जाईल, असं आमदार बच्चू कडू जाहीर सभेत म्हणाले.


रस्त्यावर आम्ही सारे भारतीयच : संपूर्ण भारताला खऱ्या अर्थाने हिंदुत्व काय आहे याची शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. असं असताना नवनीत राणा आणि रवी राणा यांनी थेट बाळासाहेबांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करण्याचा दुर्दैवी हट्ट धरला. त्यांचं हे कृत्य शोभणारं नाही. खरंतर आम्हीसुद्धा हनुमान चालीसा पठण करतो. आम्ही देखील धार्मिक आहोत; मात्र आपला धर्म हा घरात पाहण्यासाठी आहे. आम्ही ज्यावेळी घराच्या बाहेर पडतो तेव्हा आम्ही हिंदू ,मुस्लिम, शीख किंवा बौद्ध नसून रस्त्यावर सारे भारतीय असतो याचं भान सर्वांनी राखण्याची गरज असल्याचं देखील बच्चू कडू म्हणाले.

भाजपावाल्यांनी फक्त सतरंज्या टाकायच्या : भाजपाचे कार्यालय फोडणाऱ्यांना भाजपा उमेदवारी देते हा विचित्रपणा आहे. अमरावतीत भाजपामध्ये असणारे अनिल बोंडे हे पक्षाच्या बाहेरून आलेत. प्रवीण पोटे देखील भाजपामध्ये बाहेरूनच आले. जे लोक पक्षात बाहेरून येतात त्यांना भाजपा उमेदवारी देत असून पक्षासोबत एकनिष्ठ असणाऱ्या खऱ्या भाजपावाल्यांनी आता फक्त सतरंज्याच टाकायच्या, असा टोला देखील आमदार बच्चू कडू यांनी लगावला.

शहरात काढली भव्य मिरवणूक : प्रहारचे अधिकृत उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारासाठी नेहरू मैदान येथे जाहीर सभा घेतल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी अमरावती शहरातून भव्य मिरवणूक काढली. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्यासह मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे बच्चू कडू यांच्यासह खुल्या जीपमध्ये स्वार होते. पाच ते सहा हजार लोकांची गर्दी या मिरवणुकीत होती.

हेही वाचा :

  1. उबाठा गटाकडून लोकसभेच्या चार जागा जाहीर; उन्मेश पाटलांनी हाती बांधलं 'शिवबंधन' - Lok Sabha Election 2024
  2. उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश, भाजपावर टीका करताना म्हणाले,... - Unmesh Patil news
  3. हरियाणातून 530 तरुणांचा पहिला गट इस्रायलमध्ये नोकरीसाठी रवाना; मुंख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा - Haryana Workers Leave For Israel
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.