ETV Bharat / state

...तर 21 फेब्रुवारीला आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 12:42 PM IST

Updated : Feb 18, 2024, 12:54 PM IST

Manoj Jarange Patil Hunger Strike : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज (18 फेब्रुवारी) नववा दिवस आहे. रविवारी जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत 21 तारखेपर्यंत 'सगेसोयरे' अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचा इशारा दिलाय.

Manoj Jarange Patil Hunger Strike
Manoj Jarange Patil Hunger Strike

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा नववा दिवस

जालना Manoj Jarange Patil Hunger Strike : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा नववा दिवस आहे. डॉक्टरांच्या पथकानं सकाळीच जरांगे यांची आरोग्य तपासणी केलीय. यावेळी पथकानं त्यांचं बीपी, शूगर आणि इतर तपासण्या केल्या. जरांगेंनी आरोग्य पथकाला तपासणीसाठी सहकार्य केलं असून त्यांची प्रकृती आता सुधारत असल्याचं यावेळी डॉक्टरांनी सांगितलं. यानंतर मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत 20 किंवा 21 फेब्रुवारीपर्यंत 'सगेसोयरे' अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचा इशारा दिलाय.

काय म्हणाले जरांगे पाटील? : पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, "19 तारखेला होणारी शिवजयंती ही आदर्श साजरी करावी, आपल्या आंदोलनामुळं विद्यार्थ्यांना त्रास झाला नाही पाहिजे. ज्यांची नोंद मिळाली, त्यांना त्या नोंदी आधारे आरक्षण द्यावं, 'सगेसोयरे' अधिसूचनेची सरकारनं अंमलबजावणी करावी. 21 तारखेला सगेसोयऱ्याचा निर्णय झाला नाही तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं कारण मराठे ओबीसीमध्येच आहेत."

विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या : "मोठ्या उत्सवात व आनंदी वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यात साजरी करावी. तसंच सध्या परीक्षेचे दिवस सुरू झाले असून, दहावी व बारावी विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली आहे. त्यामुळं आंदोलनादरम्यान कुठल्याही विद्यार्थ्यांचे पेपर हुकणार नाही किंवा ते पेपरपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेत आंदोलन करावं," असं आवाहनसुद्धा या पत्रकार परिषदेदरम्यान जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा समाज बांधवांना केलंय.

मराठा समाज आक्रमक : राज्यभरात मराठा आंदोलक आता आक्रमक होताना दिसत असून, ठिकठिकाणी रास्तारोको करण्यात येत आहे. मराठा समाजातील महिलाही आता जास्त आक्रमक होताना दिसत आहेत. सर्वत्र आंदोलक आक्रमक होत असताना दोन दिवसांपूर्वीच जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना शांततेत आंदोलन करण्याची विनंती केली होती. याचवेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु होणार असून, विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांना परीक्षा केंद्रावर नेऊन सोडावं, असं आवाहनही जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील तरुणांना केलंय. तसंच आंदोलनाच्या वेळी विद्यार्थ्यांना वाट मोकळी करण्यासही जरांगे पाटलांनी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. "मुंबईला जाऊन फसवणूक झाली, पण...." ; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, राणेंनाही भरला दम
  2. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत राज्य सरकारला चिंता, वैद्यकीय तपासणी करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
  3. जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस; मराठा समाजाच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील उपचारासाठी राजी
Last Updated : Feb 18, 2024, 12:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.