ETV Bharat / state

पुण्यातील ड्रग्ज प्रकरण; वीरेंद्र सिंग बरोरियाला बजावली लुक आऊट नोटीस

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2024, 4:05 PM IST

Pune Drug Case : पुण्यातील ड्रग्ज प्रकरणातील वीरेंद्र सिंग बरोरियाला पकडण्यासाठी पुणे पोलिसांकडून लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. तो नेपाळमार्गे इतर देशात पळून गेला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तो कुरकुंभ एमआयडीसीत बनलेलं ड्रग्ज दिल्ली मार्गे विविध देशांमध्ये पुरवत होता.

Look out notice issued
ड्र्ग्ज

पुणे Pune Drug Case : पुणे ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यात तयार होत असलेलं ड्रग्ज लंडनसह इतर देशांमध्ये पुरवणारा संदीप दुनियाचा मुख्य साथीदार वीरेंद्र सिंग बरोरिया याच्या विरोधात पुणे पोलिसांनी लुक आऊट नोटीस बजावली आहे. आरोपी वीरेंद्र सिंग हा मूळचा दिल्लीचा रहिवासी असून तो कुरकुंभ एमआयडीसीत बनलेलं ड्रग्ज दिल्ली मार्गे विविध देशांमध्ये पुरवत होता, असा त्याच्यावर आरोप आहे.

वीरेंद्र सिंग नेपाळमार्गे पळाला : पुणे पोलिसांनी दिल्लीत केलेल्या छापेमारीत आरोपी वीरेंद्र सिंग हा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. तो नेपाळ मार्गे इतर राष्ट्रात पळून गेल्या असल्याची माहिती समोर येत आहे. आरोपी वीरेंद्र सिंग याच्या विरोधात दिल्लीसह देशभरात विविध ठिकाणी एनडीपीएसचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांना 25 लाखांचं बक्षीस : पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसीमध्ये तब्बल 4000 कोटीचं ड्रग्ज रॅकेट उघडकीस आलं होतं. कालच पुणे पोलिसांचं कौतुकसुद्धा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी करुन त्यांना 25 लाखाचं बक्षीस जाहीर केलं आहे. परंतु, याचे धागेदोरे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. यापूर्वी आठ जणांना यात अटक करण्यात आली होती. त्यामुळे विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात ड्रग्ज रॅकेट उघडकीस आलं आहे.

पोलिसांची एक टीम दिल्लीला रवाना : यासंदर्भात पुणे पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, ड्रग्जचा पुरवठा दिल्लीत केला जायचा. यामध्ये वीरेंद्र सिंग आणि संदीप दुनिया यांचा संबंध आढळून आला होता. त्यानंतर दिल्लीत एक टीम गेली होती. त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. त्यानंतर आता ही लूक आउट नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे.

पोलीस आयुक्तांनी दिली माहिती : पुणे ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावरही असल्याची माहिती 21 फेब्रुवारी रोजी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली होती. तसंच या प्रकरणात पुणे पोलिसांनी दिल्लीत देखील कारवाई केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

देशातील विविध शहरांमध्ये कारवाई : पुणे पोलिसांची दहा पथकं एनसीबीसह देशातील विविध शहरांमध्ये कारवाई करत आहेत. पुणे पोलिसांचे पथक दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांसह अनेक गोदामांमध्ये ड्रग्जचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी विकी माने, हैदर शेख, अनिल साबळे, अजय करोसिया, युवराज भुजबळ या पाच जणांना अटक केली. तसंच ड्रग्ज बनवणाऱ्या अभियंत्याला अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

सूत्रधाराचे आंतरराष्ट्रीय संबंध? : पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुणे पोलीस 'सॅम ब्राऊन' या नावानं फिरणाऱ्या परदेशी नागरिकाचा शोध घेत आहेत. सॅम नावाच्या या सूत्रधाराचे आंतरराष्ट्रीय संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. पुणे ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना 3 महिन्यांत 2000 किलो एमडी बनवण्याचे टार्गेट देण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

हेही वाचा:

  1. मिठाच्या पिशव्यातून ड्रग्जची तस्करी; सांगलीत 300 कोटींचा एमडी ड्रग्जसाठा जप्त
  2. पुणे ड्रग्स प्रकरणाचं आढळलं आंतरराष्ट्रीय कनेक्शन, कुरिअर कंपनीद्वारे 'या' शहरात जाणार होते अंमली पदार्थ
  3. पुणे पोलिसांचा नादच खुळा; दिल्लीत कारवाई करत तब्बल 1200 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.