ETV Bharat / state

कल्याण रेल्वे स्थानकात आढळली स्फोटोक, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 7:54 PM IST

Updated : Feb 21, 2024, 8:25 PM IST

Explosives Found at Kalyan Railway Station
आरोपींचा शोध सुरू

ठाणे जिल्ह्यातील कल्याण रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1 वर आज (21 फेब्रुवारी) स्फोटके आढळून आली आहेत. याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सापडलेल्या स्फोटकांविषयी माहिती देताना मध्य रेल्वेचे पोलीस उपायुक्त

ठाणे : कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर आज (21 फेब्रुवारी) सकाळी साडेअकरा वाजता दोन खोक्यांमध्ये भरलेली एकूण ५४ स्फोटके (डिटोनेटर्स) कल्याण लोहमार्ग पोलिसांनी जप्त केली आहेत. रेल्वे स्थानकात स्फोटके सापडल्यानं खळबळ उडाली आहे. पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.

स्फोटकांची खोकी ताब्यात: कल्याण पश्चिम फलाट क्रमांक एकवर दोन खोके आहेत. त्यात स्फोटक सदृश्य ज्वलनशील पदार्थ असल्याची माहिती रेल्वे स्थानकातील एका सफाई कामगारानं कल्याण लोहमार्ग पोलिसांना दिली. यानंतर कल्याण लोहमार्ग विभागाचे उपायुक्त मनोज पाटील, कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी तातडीने रेल्वे स्थानकात सहकाऱ्यांसह येऊन खोक्यांची तपासणी केली. पुढे ते दोन्ही खोके पोलिसांनी ताब्यात घेतले.

श्वान पथक घटनास्थळी दाखल: यानंतर तातडीने पोलिसांच्या श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाच्या साहाय्यानं या खोक्यांची तपासणी करण्यात आली. ही स्फोटके रेल्वे स्थानकात कोणत्या कारणासाठी आणली होती? ती कोणी आणून ठेवली? स्फोटके रेल्वे स्थानकात आणून ठेवण्याचा उद्देश काय होता? अशा विविध अंगांनी पोलिसांच्या विशेष पथकानं तपास सुरू केला आहे.

ही स्फोटके दगड खाणीच्या खदानींमध्ये सुरूंग स्फोटासाठी, विहिरी खोदण्यासाठी वापरली जातात, अशा क्षमतेची आहेत. या स्फोटकांचा तातडीने स्फोट होत नाही. ती डिटोनेटर्स आणि जिलेटीन कांड्यांसारखी असतात. त्यांना वात असते. ती स्फोटकांशिवाय स्फोट करत नाहीत. तरीही ही स्फोटके रेल्वे स्थानकात कोणी आणली याचा तपास सुरू आहे- लोहमार्ग पोलीस ठाण्याचे उपायुक्त मनोज पाटील

पोलिसांनी लावलाय हा तर्क: ही स्फोटके खरेदी करून एखादा व्यावसायिक कल्याण रेल्वे स्थानकात येऊन लोकलनं प्रवास करण्याच्या विचारात असावा. त्यावेळी पोलीस किंवा अन्य हालचालींमुळे त्याने स्फोटकांचे खोके तेथेच ठेऊन पळ काढला असावा, असा पोलिसांकडून तर्क काढला जात आहे.

हेही वाचा:

  1. Gelatin stalks in Bhogavati river : पेणमध्ये सापडलेल्या जिलेटिनच्या 'त्या' नळकांड्या निघाल्या 'डमी बॉम्ब'
  2. नागपूर रेल्वे स्थानक परिसरात बॅगमध्ये आढळली जिवंत स्फोटके
Last Updated :Feb 21, 2024, 8:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.