ETV Bharat / state

कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात 'डोंगरची काळी मैना' बहरली... लवकरच लोकांना मिळणार रानमेवा - Dongarachi Kali Maina

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 18, 2024, 6:08 PM IST

Dongarachi Kali Maina : अकोले तालुक्यातील कळसूबाई हरिश्चंद्रगडाच्या (Kalsubai Harishchandragad) अभयारण्यात उन्हाळ्यातील जंगली रानमेवा म्हणून प्रसिद्ध असणारी 'डोंगरची काळी मैना' (Conkerberry Fruit) सर्वदूर फळांनी बहरली असून लवकरच भंडारदरा बाजारपेठेमध्ये विक्रीस येणार आहे.

Dongarachi Kali Maina
डोंगरची काळी मैना (Shirdi Reporter)

शिर्डी Dongarachi Kali Maina : अकोले तालुक्यात सह्याद्रीची पर्वतरांग पसरलेली असून या पर्वतरांगेत उन्हाळ्याची चाहूल लागली की, विविध प्रकारचा रानमेवा चाखावयास मिळतो. त्यामध्ये सुरुवात होते ती आंबळं या रानमेव्यापासून आंबळं संपल्यानंतर तोरणं जंगलात पिकायला लागतात. तोरणं संपत नाहीत तोच 'डोंगरच्या काळ्या मैने'ची (Conkerberry Fruit) चाहूल लागते. कळसूबाईची पर्वतरांग, कळसूबाई हरिश्चंद्रगड (Kalsubai Harishchandragad) अभयारण्य डोंगरची 'काळी मैना' उर्फ 'करवंदे' पूर्ण क्षमतेनं पिकण्यास सुरुवात झाली असून बाल गोपाळांची पावले आपसुकच जंगलाच्या दिशेने वळू लागली आहेत.

मनाला गारवा देणारी 'डोंगरांची काळी मैना' : अकोले तालुक्यातील भंडारदऱ्याच्या कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात असणाऱ्या जंगलामध्ये करवंदाच्या काळ्या भोर जाळ्या लगडताना दिसून येत आहेत. या जंगलच्या रानमेव्याची चवच न्यारी असते. चैत्र महिना सुरू झाल्यानंतर प्रथम दर्शन होते, ते आंबट गोड चवीच्या करवंदाचे. डोंगराच्या कुशीत याच्या काटेरी जाळ्या पसरलेल्या असतात. या झाडाला पांढऱ्या रंगाची फुले येतात. फुलांची गळती झाल्यावर हिरव्या रंगाची करवंद बहरतात. पूर्णपणे पिकल्यावर या फळांचा रंग काळा होतो. आदिवासी बांधव पहाटे लवकर उठून करवंदे तोडण्यासाठी रानात पायपीट करतात आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यात आणि शहरी भागात विक्रीसाठी नेतात. 'डोंगरांची काळी मैना' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवंदांचा गोडवा वाढत्या तापमानात मनाला गारवा देणारा आहे. डोंगररांगेत मोठ्या प्रमाणात करवंदाच्या जाळ्या पाहायला मिळतात. थंडगार असलेली करवंद खायला मस्त असून ती खाल्ल्यानंतर मनाला गारवा मिळतो.

'करवंदे घ्या करवंदे' अशी साद : करवंदं पिकायला लागली की, भंडारदऱ्याच्या बाजारपेठेत करवंदं विकणाऱ्या मुलांच्या टोळ्या दिसून यायच्या. या करवंदाच्या विक्रीतून उपलब्ध होणाऱ्या पैशावर शाळकरी मुले आपल्या वह्या-पुस्तकांची गरज भागवत होती. पंरतु, दोन ते तीन वर्षापासून या मुलांना मोबाईलचं वेड मोठ्या प्रमाणात लागल्यानं या मुलांच्या टोळ्याच गायब झाल्या आहेत. त्यामुळं शंभरात एखादा शाळकरी मुलगा कुठेतरी रोडच्या कडेला 'करवंदे घ्या करवंदे' अशी साद घालताना नजरेस पडतो. घाटघर, साम्रद, रतनवाडी, उडदावणे, या भागामध्ये काही व्यापारी करवंदे खरेदी करण्यासाठी येतात. परंतु करवंदे खरेदी करताना व्यापारी अगदी कवडीमोल भाव या आदिवासी बांधवांच्या करवंदाला देतात.

रानमेवा झाडांचं संवर्धन होणं गरजेचं : चांगल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त करवंदं हे बेरी वर्गीय फळ असून त्याचा आरोग्यासाठी चांगल उपयोग होतो. यामधील अनेक घटक रोग प्रतिकारशक्तीचं काम करतात. करवंद हे नाशवंत फळ असल्यानं जास्त काळ टिकत नाही. मात्र, कच्च्या करवंदाचं लोणचं आणि पिकलेल्या करवंदांचा मुरब्बा केला तर जास्त काळ टिकतो. करवंदांच्या झाडांना प्रंचड प्रमाणात काटे असतात. अशामध्ये कष्टपूर्वक काढलेल्या करवंदांना कमी भाव बाजारात मिळतो. शहरात आणि ग्रामीण भागात उन्हाळी रानमेवा व्यतिरिक्त करवंदाची चव काही औरच असते. परंतु, आता आदिवासी भागात झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यानं या रानमेवाच्या झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्यानं, याही झाडांचं संवर्धन होणं गरजेचं आहे.

हेही वाचा -

  1. Low Calorie Foods : वजन कमी करण्यास 'हे' पाच कमी कॅलरी असलेल पदार्थ खा, तुम्हाला नेहमी पोट भरले असल्याची जाणीव होईल
  2. रखरखत्या उन्हात काटेसावर झाडावर बहरली शाल्मली; फुलांमध्ये आहेत औषधी गुणधर्म
  3. मेळघाटात कोलकास हत्ती सफारी; कोलकासला पर्यटकांची पसंती, इंदिरा गांधींनाही घातली होती भुरळ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.