ETV Bharat / politics

शरद पवार आणि उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर...; प्रकाश आंबेडकरांचा सर्वात मोठा दावा - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 12, 2024, 8:12 PM IST

Updated : May 12, 2024, 9:03 PM IST

Prakash Ambedkar : तपास यंत्रणांचा भाजपा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधक सातत्यानं करत आहेत. त्यातच आता 'वंचित'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केलाय. वाचा, काय म्हणाले प्रकाश आंबेडकर....

नरेंद्र मोदी
फाईल फोटो (ETV Bharat Maharashtra Desk)

प्रकाश आंबेडकर यांचं भाषण (ETV Bharat Reporter)

पालघर Prakash Ambedkar : भाजपा आपल्या ताब्यातील यंत्रणाचा गैरवापर करत असल्यामुळं त्याला घाबरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपाबरोबर जाण्याची शक्यता आहे, असा खळबळजनक दावा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. याआधीही शरद पवार आणि राजनाथ सिंह यांच्यातील चर्चेबाबत प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केले होते. आता या नव्या दाव्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? : देशातील यावेळची लोकसभा निवडणूक मतदार विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी होत आहे. लोक भाजपाला विटले आहेत. त्यांच्यापुढं वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पर्याय आहे. भारतीय जनता पक्ष आपल्या ताब्यातील यंत्रणाचा गैरवापर करत असल्यामुळं त्याला घाबरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपाबरोबर जाण्याची शक्यता आहे, असा खळबळजनक दावा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. पालघर लोकसभा मतदारसंघातील बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. तेव्हा ते बोलत होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की लोकसभेची ही निवडणूक आता भाजपाविरुद्ध मतदार अशी झाली असून मतदारांनीच या निवडणुकीत निर्णय कौल देण्याचं ठरवलंय. मतदारांनी पसंती कोणाला दिली हे चार तारखेला कळणार असलं, तरी बहुजन वंचित आघाडी या वेळेला चांगल्या स्थितीत असेल, असा दावा त्यांनी केलाय.

राज ठाकरे भाजपात गेल्यानं बरे झाले : मनसे प्रमुख राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षासोबत गेल्यानं चांगले झाले असं सांगताना ॲड. आंबेडकर यांनी त्याची कारणं ही दिली. ते म्हणाले की, राज ठाकरे भाजपासोबत गेल्यानं उत्तर प्रदेश, बिहार राजस्थान तसंच दक्षिण भारतातील मतदारही आता भाजपापासून निश्चित दुरावतील. त्याचा फायदा वंचित बहुजन आघाडीसह अन्य पक्षांना होईल. तसंच शेतकरी आणि मुस्लिम हे वंचित बहुजन आघाडीसोबत आहेत. भाजपाविषयी मतदारांच्या मनात घृणा आहे. ते कोणत्याही परिस्थितीत भाजपाला मतदान करणार नाहीत. मुस्लिम इंटलेक्युच्युअल फोरमच्या बैठकीत सर्वपक्षीयांना निमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी वगळता कोणीही या बैठकीला आलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील उमेदवाराचा प्रश्न संपलाय. त्यामुळं खऱ्या अर्थानं फक्त आम्हीच या बैठकीला उपस्थित होतो. काँग्रेस व ठाकरे यांना त्यामुळं आता मुस्लिम ज‍वळ करणार नाहीत, हे स्पष्ट असल्याचं आंबेडकर म्हणाले. मुस्लिम समाजानं आणि शेतकरी दलितांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागं ठामपणे उभं राहण्याचं ठरवलंय. भाजपाच्या विरोधात सर्वपक्षांनी एकत्र येण्याचं आणि भाजपाला नामोहरम करण्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सांगत असले, तरी आता तुरुंगात गेल्यानंतर त्यांना जाग आलीय असं म्हणत त्यांनी केजरीवालांवर निशाणा साधलाय.

कोकणात रासायनिक प्रकल्पामुळं कर्करोगाचं प्रमाण जादा : वाढवण बंदराविषयी बोलताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, तीस किलोमीटरच्या आत बंदर करायचं असेल, तर ते आवश्यक आहे का, याची खातरजमा करावी लागते. याशिवाय बंदराचा खरंच किती फायदा आहे आणि ते खासगी कंपनीसाठी बांधलं जातंय का, हे पाहावं लागतं. न्हावाशेवा बंदराचं उदाहरण त्यासाठी पुरेस आहे. कोकणात चिपळूण परिसरात रासायनिक प्रकल्प आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. तीच परिस्थिती पालघर जिल्ह्यातील आहे. पालघर जिल्ह्यात रासायनिक प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नसल्यानं इथं कर्करोगाचं प्रमाण वाढलंय. त्यामुळं रासायनिक प्रकल्पाबाबतही फेरविचार करायला हवा. पालघर जिल्ह्यात आदिवासींचे रोजगार अभावी स्थलांतर होत असून, ते थांबवण्याबाबत विचार करायला हवा, असं त्यांनी म्हटलंय.

भाजपाला उन्माद : भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत आला तर त्यांना सत्तेचा उन्माद चढेल. त्यासाठी आता जनताच त्यांना धडा शिकवण्याच्या मानसिकतेत आहे. परंतु, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपासोबत जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आर्थिक धोरण एखाद्या मद्यपीसारखेच असल्याची टीका त्यांनी केली. मोदी यांना मॅजिक फिगर गाठता येणार नाही. त्यामुळं त्यांनी पवार आणि ठाकरे यांना सोबत आलं नाही, तर पाहतो, अशा स्वरुपाची धमकी दिलीय. देशातील अनेक राज्यांची सत्ता असूनही विरोधक कारभार करु देत नाहीत, असा कांगावा ते करतात, अशी टीका ॲड. आंबेडकर यांनी केली.

हेही वाचा :

  1. "हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी...", चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हानं - Chandrashekhar Bawankule
  2. मुख्यमंत्र्यांचा गड राखण्यासाठी भाजपाचे केंद्रीय नेते ठाणे मोहिमेवर; पंतप्रधान मोदींची होणार सभा - Lok Sabha Election
Last Updated : May 12, 2024, 9:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.