ETV Bharat / international

पाकिस्तान निवडणूक; नवाज शरीफ आपल्या जागेवरून विजयी, इम्रान खान समर्थित अपक्ष देतायत कडवी टक्कर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 9, 2024, 2:15 PM IST

Pakistan Election
Pakistan Election

Pakistan Election : पाकिस्तानधील सार्वत्रिक निवडणुकीत माजी पंतप्रधान नवाज शरीफ, बंधू शाहबाज शरीफ आणि मुलगी मरियम शरीफ यांनी आपपल्या जागेवर विजय मिळवला आहे. तर माजी पंतप्रधान इम्रान खान समर्थित अपक्ष त्यांना कडवी टक्कर देत आहेत.

इस्लामाबाद Pakistan Election : पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीनंतर मतमोजणी सुरू आहे. पंतप्रधान होण्याच्या तयारीत असलेले नवाज शरीफ, त्यांचे बंधू शाहबाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम शरीफ यांनी आपापल्या जागेवरून निवडणूक जिंकली आहे.

कोणी किती जागांवर विजय मिळवला? : आतापर्यंत 53 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाठिंबा असलेल्या अपक्ष उमेदवारांनी 18 जागा जिंकल्या. त्याचबरोबर नवाझ शरीफ यांच्या पक्ष पीएमएलएननं 17 जागा जिंकल्या आहेत. बिलावल भुट्टो यांच्या पीपीपीनं 15 जागांवर, पीएमएलनं एका जागेवर, बीएनपीने 1 जागेवर आणि एमक्यूएमनं एका जागेवर विजय मिळवला आहे.

266 जागांवर निवडणुकीद्वारे उमेदवार निवडणार : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या एकूण 336 जागांसाठी निवडणुका झाल्या. मात्र, यापैकी 266 जागांवरच निवडणुकीद्वारे उमेदवार निवडले जाणार आहेत. प्रत्यक्षात विधानसभेच्या 70 जागा राखीव आहेत. त्यापैकी 60 महिलांसाठी राखीव आहेत, तर 10 बिगर मुस्लिमांसाठी राखीव आहेत. निवडणूक जिंकणाऱ्या पक्षांच्या प्रमाणात या जागांचं वाटप केलं जाईल.

मतदानाची आकडेवारी आली नाही : पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत 12 कोटींहून अधिक मतदार मतदान करणार होते. मात्र, किती मतदान झालं याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. 2018 च्या निवडणुकीत 51.7 टक्के मतदान झालं होते. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी नॅशनल असेंब्लीच्या शर्यतीत एकूण 5,121 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 4,807 पुरुष, 312 महिला आणि 2 ट्रान्सजेंडर उमेदवार होते. सार्वत्रिक निवडणुकांसोबतच चार प्रांतांमध्येही निवडणुका झाल्या, ज्यामध्ये एकूण 12,695 उमेदवार उभे होते. यामध्ये 12,123 पुरुष, 570 महिला आणि दोन ट्रान्सजेंडर उमेदवारांचा समावेश आहे.

2018 ची स्थिती : 2018 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये इम्रान यांचा पक्ष पीटीआयनं 149 जागा जिंकल्या होत्या. नवाज शरीफ यांच्या पक्ष पीएमएलएननं 82 तर बिलावल यांचा पक्ष पीपीपीनं 54 जागा जिंकल्या होत्या. तर 47 जागा इतर पक्ष किंवा अपक्ष उमेदवारांच्या खात्यात गेल्या. प्रांतवार पाहिलं तर, पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयचं वर्चस्व आहे. त्याचबरोबर बिलावल भुट्टो यांच्या पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) सिंध प्रांतात वर्चस्व आहे. त्याचवेळी, बलुचिस्तानमधील निकाल आतापर्यंत संमिश्र आहेत.

हे वाचलंत का :

  1. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि पत्नी बुशरा यांना 7 वर्षांची शिक्षा; वाचा काय आहे प्रकरण?
  2. ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांना कर्करोगाचं निदान, सार्वजनिक कामापासून दूर राहण्याच्या सूचना
  3. अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यावर भीषण हल्ला, चार जणांनी पाठलाग करुन मारलं
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.