ETV Bharat / entertainment

मोठ्या पडद्यावर गरजणार पँथरची डरकाळी, नामदेव ढसाळांच्या जन्मदिनी चरित्रपटाची घोषणा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2024, 1:01 PM IST

Namdev Dhasal
नामदेव ढसाळ चरित्रपट

महान विद्रोही कवि नामदेव ढसाळ यांना दलित पँथर चळवळीचे संस्थापक म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनणार आहे. आज 15 फेब्रुवारी रोजी त्यांचा जन्मदिन आहे. यानिमित्ताने 'ढसाळ' या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई - महान बंडखोर कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ हा चित्रपट बनणार आहे. निर्मात्यांनी या चरित्रपट निर्मितीचे अधिकार त्यांच्या कुटुंबाकडून अधिकृतपणे घेतले आहेत. दोन वर्षांच्या अत्यंत सखोल संशोधन व अभ्यासानंतर हा चित्रपट ढसाळ यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी जीवनाचा वेध घेण्यासाठी तयार होत आहे. आज नामदेव ढसाळ 76 वा जन्मदिन आहे. या निमित्तानं 'ढसाळ' या चित्रपटाच्या पोस्टरचं लॉन्चिंग करण्यात आलंय.

संजय पांडे निर्मित, वरुणा राणा लिखित आणि दिग्दर्शित प्रताप गंगावणे यांच्या संवादांसह, या चरित्रपटात अन्याय आणि शोषणाविरुद्धच्या संघर्षाचे वास्तववादी चित्रण करण्यात येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू होऊन २०२५ मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या निर्मितीबद्दल निर्माता संजय पांडे म्हणाले की, "पद्मश्री नामदेव ढसाळ म्हणजे वादळ. सोशीत आणि अन्यायाने पीडलेल्या दलित समाजाला नवसंजीवनी देणारा, शब्दात विद्रोहाची आग असलेला पॅंथर, महाराष्ट्राच्या साहित्याला ग्लोबल करणारा पहिला कवी. त्यांचं जीवन चरित्र म्हणजे एक ज्वलंत मशाल आहे. महाराष्ट्रच काय संपूर्ण देशात दलित पॅंथरने एक राजकीय व सामाजिक वादळ तयार केलं होतं. त्यांच्या जीवनावर चित्रपट करणे हे एक निर्माता म्हणून माझं सौभाग्य आहे आणि आव्हान ही आहे. पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या सर्व देश विदेशातील चाहत्यांसाठी, विद्यार्थी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी ही एक पर्वणी असेल.’’

लेखक आणि दिग्दर्शिका वरुणा राणा यांनी चित्रपटाचे महत्त्व सांगितं. त्या म्हणाल्या, "काही गोष्टी सांगायलाच पाहिजे कारण त्या आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. ढसाळ यांचे जीवन ही अशीच एक कथा आहे. खेडेगावातील महारवाड्यात जन्मलेल्या, मुंबईतील कामाठीपुरा येथे बालपण गेलेल्या ढसाळांनी जागतिक पातळीवर आपल्या कवितेचा ठसा उमटवला. त्यांच्या कट्टर दलित पँथर चळवळ आणि त्यांच्या बंडखोर कवितेतून त्यांनी दलित आणि गरिबांच्या हक्कांसाठी अथक लढा दिला. ढसाळ हे व्यक्तीपेक्षा एक जास्त शक्तिशाली, प्रक्षोभक विचार होता आणि हा विचार मला आव्हानात्मक वाटला म्हणून तो तमाम लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून माझे त्याला प्राधान्य राहील. जातीच्या फिल्टर शिवाय त्यांचे विचार हे सर्व समाजाच्या अंतःकरणाला थेट भिडू शकतात कारण हे विचार कालातीत आहेत.’’

नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांनी ही यावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "आज १५ फेब्रुवारी नामदेवचा जन्मदिवस..दहा वर्षे झाली नामदेव ढसाळ नावाचा झंझावात शांत झाल्याला. नामदेवच समग्र कलंदरपण, विचारीपण, कविमन आणि माणसांप्रती असलेला प्रचंड जिव्हाळा या साऱ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या ढसाळ चित्रपटातून दिसून येईल. या चित्रपटात नामदेवच नाही तर त्याच्या समग्र जीवनाबरोबरच त्यावेळची क्रांतिकारक परिस्थिती, त्यावेळचं राजकारण, पूर्ण दलित पँथर ची दहशत असलेली चळवळ असं सर्वांगीण समाजाचाच लेखाजोगा उभा राहील. त्याची बायोपिक हे फक्त वरुणाजींचं स्वप्नच नाही तर हा एक महत्वाचा ऐतिहासिक 'बखरनामाच'आहे. एका महान लोकनायकाच्या जीवनावर चित्रपट बनविण्याच्या वरुणाजींच्या या महत्वाकांक्षेला माझ्या खूप शुभेच्छा आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण कष्टांना व तळमळीला कडक सॅल्युट!

हेही वाचा -

  1. "चित्रपट चांगला बनला नाही तर अगदी पंतप्रधान मोदींचा बायोपिकही चालत नाही": बहिष्कार संस्कृतीवर प्रकाश झा
  2. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा 'शिवरायांचा छावा' १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात
  3. शाहरुख खाननं नेटफ्लिक्सवर व्हॅलेंटाईन्स डेनिमित्त दिलं चाहत्यांना सरप्राईज
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.