ETV Bharat / state

Aaditya Thackeray Vs CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातून आदित्य ठाकरे थेट निवडणुकीच्या रिंगणात?

author img

By

Published : Apr 7, 2023, 4:51 PM IST

Updated : Apr 7, 2023, 5:47 PM IST

शिवसेना युवानेते, माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केल्याने ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार यावर अजूनतरी प्रश्नचिन्ह आहे? आदित्य ठाकरे ठाण्यातून निवडणुकीच्या मैदानात उतरलेच तर त्यांना कोणता मतदारसंघ सोयीस्कर राहील याची चाचपणी सुद्धा केली जात आहे.

Aditya Thackeray
Aditya Thackeray

मुंबई : ठाण्यामध्ये सध्या ठाणे शहर, ओवळा-माजीवडा, कोपरी-पाचपाखडी असे ३ विधानसभा मतदार संघ असून यापैकी सध्याच्या घडीला शिंदे गट (बाळासाहेबांची शिवसेना) यांच्याकडे २ तर भाजपकडे १ मतदार संघ आहे. सध्याच्या घडीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे इथे एकही आमदार नसल्याने आदित्य ठाकरे यांच्यासाठी कुठला मतदार संघ निवडला जाईल, हे आताच सांगणे कठीण आहे. अशात भाजपकडे असलेल्या ठाणे शहर मतदार संघाची निवड आदित्य ठाकरे यांच्यासाठी केली जाऊ शकते? एक नजर टाकूया ठाण्यातील ३ मतदार संघावर

ठाणे शहर : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास या मतदारसंघावर अनेक वर्षांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता राहिली आहे. सध्या भाजपचे संजय केळकर हे या मतदार संघाचे आमदार असून २०१४ - २०१९ असं सलग दोन वेळा ते येथून निवडून आले आहेत. १९९०पासून २००४ पर्यंत शिवसेनेचे मोरेश्वर जोशी हे येथील आमदार होते. तर २००४ ला आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदा इथूनच आमदार झाले होते. परंतु २००९ ला या मतदारसंघाची पुनरर्चना झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कोपरी-पाचपाखडी येथून निवडणूक लढवली तर इथून राजन विचारे आमदार झाले. २०१४ साली निवडणुकीपूर्वी जागा वाटपाच्या मुद्द्यावर सेना भाजपची युती तुटली. येथून राजन विचारे खासदार झाले, तर आमदारकीसाठी शिवसेनेने येथून रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिली. परंतु भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी रवींद्र फाटक यांचा पराभव करुन हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आणला. त्यानंतर २०१९ मध्ये सेना-भाजपची युती झाली. हा मतदार संघ पुन्हा भाजपकडे राहिला. तेव्हा संजय केळकर यांनी मनसेचे अविनाश जाधव यांचा १९ हजार २२४ मतांनी पराभव केला. या मतदारसंघात सेना-भाजपने एकत्र निवडणूक लढवूनही त्यांचे मताधिक्य वाढले नव्हते. परंतु २०१९ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना या मतदारसंघातून ८३ हजार मतांची आघाडी भेटली होती, हे विशेष. म्हणून आदित्य ठाकरे यांच्यासाठी या मतदारसंघाची निवड केली जाण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.

ओवळा-माजिवडा : २००९ निवडणुकीच्या पूर्वी ठाणे, बेलापूर हे दोन विधानसभा मतदारसंघ होते. परंतु २००९ ला या दोन्ही मतदारसंघाचे विभाजन झाले, पुनर्रचनेत ओवळा-माजिवडा मतदारसंघ तयार झाला. त्यापूर्वी २००८ ला प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना येथून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर २००९ पासून प्रताप सरनाईक शिवसेनेकडून (आता शिंदे गट) सातत्याने इथून निवडून आले आहेत. त्यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. मात्र, या मतदारसंघात काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांचीही भूमिका महत्त्वाची ठरली आहे. मागील तिन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला २० ते २५ टक्के मत मिळाली आहेत. २००९ साली प्रताप सरनाईक हे ९ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. २०१४ साली शिवसेना- भाजपने वेगवेगळी निवडणूक लढवली होती. तेव्हा भाजपचे उमेदवार संजय पांडे यांचा १० हजारांपेक्षा जास्त मताधिक्क्याने प्रताप सरनाईक यांनी पराभव केला होता. २०१९ साली सेना-भाजपने एकत्र निवडणूक लढल्याने प्रताप सरनाईक तब्बल ८४ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले होते. या मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यताही नाकारली जात नाही.

कोपरी-पाचपाखडी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी-पाचपाखडी हा विधानसभा मतदार संघ आहे. २००९ पासून एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघावर पकड बनवली आहे. ते ३ वेळा या मतदार संघातून आमदार झाले असून त्यांचे मताधिक्य सतत वाढत गेले आहे. २००९ मध्ये एकनाथ शिंदें यांना ३२ हजारांचं मताधिक्य २०१४ साली भाजप-शिवसेना वेगळे लढूनही शिंदे यांना तेव्हा ५२ हजारांचं मताधिक्य घेत भाजपच्या संदीप लेले यांचा पराभव केला होता. २०१९ मध्ये तर शिंदे यांना १ लाख १३ हजार मत मिळाली होती. त्यांनी काँग्रेसचे संजय घाडीगावकर यांचा ८९ हजार मतांनी पराभव केला होता. वास्तविक कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय विरोधकच शिल्लक ठेवला नाही आहे असे सांगितले जात आहे. तसेच त्यांच्या तोडीचा कुठल्याही पक्षाचा एखादा स्थानिक नेताही इथे दिसत नाही. अशात आदित्य ठाकरे या मतदारसंघाची निवड करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे असल्याने ते येथून निवडणूक लढण्याची शक्यता धूसर आहे.

हेही वाचा - Congress Leader Joins BJP: काँग्रेसला मोठा झटका, माजी मुख्यमंत्र्याने केला भाजपमध्ये प्रवेश.. समीकरणे बदलणार

Last Updated : Apr 7, 2023, 5:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.