ETV Bharat / state

Gruhita Vichare : आफ्रिकेतील माऊंट किलीमांजारो शिखरावर ठाण्याच्या चिमुकलीने फडकवला तिरंगा

author img

By

Published : Aug 19, 2023, 9:52 PM IST

Updated : Aug 19, 2023, 10:56 PM IST

Gruhita Vichare Raised Tricolor
गृहिता विचारे

ठाण्यातील चिमुकली गिर्यारोहक म्हणून ओळख कमावणाऱ्या गृहिता विचारे हिने अफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखरावर आपले नाव कोरले आहे. यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी तिने किलीमांजारो पर्वतशिखर सर करून त्यावर तिरंगा फडकविला आहे. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे आणि स्वतःच्या जिद्दीमुळे तिने हे यश संपादन केले.

चिमुकली गिर्यारोहक गृहिता विचारे हिचे मत

ठाणे: भारताच्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला ठाण्यातील नऊ वर्षीय चिमुकलीने जगातील उंच शिखरावर तिरंगा ध्वज फडकवून एक मानाचा तुरा रोवला आहे. गृहिता सचिन विचारे असे त्या धाडसी चिमुकलीचे नाव असून तिने मातृभूमीपासून दूर आफ्रिकेतील माऊंट किलीमांजरो या समुद्र सपाटीपासून ५८९५ मीटर उंच शिखराला गवसणी घातली आहे. या मोहिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी तिच्या हाती तिरंगा सुपूर्द करून शुभेच्छा व आशिर्वाद दिले होते.

वडिलांपासून घेतली प्रेरणा: ठाण्यात राहणारी गृहिता विचारे घोडबंदर रोडवरील सरस्वती शाळेत चौथ्या इयत्तेत शिकते. कोरोना काळात सर्व जग ठप्प असताना तिला धाडसी मोहिमांविषयी कुतुहुल वाटले. तिचे वडील सचिन विचारे हे ट्रेकर असल्याने तीसुद्धा वेगवेगळया गडकिल्ल्यांवर तसेच पठारांवर ट्रेकिंगसाठी वडिलांसोबत जात असायची. याच मोहिमेतून तिने जगातील एका उंच शिखरावर कुच करण्याचे ठरवून यंदाच्या स्वातंत्र्यदिनी हे स्वप्न सत्यात उतरवले.


कोरोना काळातच मोहिमेची तयारी: कोरोना काळात संपूर्ण जग चार भिंतींमध्ये कैद असतानाच गृहिता विचारे ही एक आठ वर्षांची चिमुकली मात्र जग जिंकण्यासाठी आपल्या पंखांमध्ये बळ एकवटत होती. आजोबा नरेश भोसले आणि वडील सचिन विचारे यांच्याकडून तिला गिर्यारोहणाचे बाळकडू मिळाल्यानंतर तिने उंच भरारी घेत थेट माऊंट एव्हरेस्टच्या पायथ्यालाच गवसणी घातली. एकूण 15 दिवसांचा हा ट्रेक अत्यंत खडतर आणि तिच्या इच्छाशक्तीची परीक्षा घेणारा ठरला. उणे तापमान, थंड बोचणारे वारे आणि ऑक्सिजनची घसरत जाणारी पातळी या सर्व आव्हानांना सामोरे जात तिने 13 दिवसात माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत धडक मारली. एकूण 148 किलोमीटरचा हा ट्रेक तिला तब्बल 5,364 मीटर एवढ्या उंच एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत घेऊन गेला. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे आणि स्वतःच्या जिद्दीमुळे तिने हे यश संपादन केले.


दोघीही बहिणी गिर्यारोहक: गृहिता व तिची बहीण हरिता या दोघीही गिर्यारोहण करत असून त्यांनी आतापर्यंत 16 लहान-मोठे ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. या दोन्ही बहिणींनी आतापर्यंत 2596 फुटाचा मलंगड पासून महाराष्ट्राचे सर्वांत उंच 5400 फुटाचे कळसुबाई शिखरापर्यंत अनेक गडकिल्ले यशस्वीरीत्या सर केले. यामुळेच गृहिताला छोटी हिरकणी हा किताब प्रेमाने दिला गेला आहे. चिमुकल्या गृहिताने यापूर्वी नऊवारी साडी नेसून पर्वत शिखरावर चढण्याचा पराक्रम देखील करून दाखवला होता.

हेही वाचा:

  1. Mountaineer Sisters : चिमुकल्या गिर्यारोहक बहिणींचा पराक्रम; मेहनतीने गाठला एव्हरेस्ट बेस केंम्प
  2. Mountaineer Gruhita Vichare : छोटी हिरकणी निघाली अफ्रिकेला, स्वातंत्र्यदिनी किलिमांजारो सर करण्याचा निर्धार
Last Updated :Aug 19, 2023, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.