ETV Bharat / state

Mountaineer Gruhita Vichare : छोटी हिरकणी निघाली अफ्रिकेला, स्वातंत्र्यदिनी किलिमांजारो सर करण्याचा निर्धार

author img

By

Published : Aug 12, 2023, 7:46 PM IST

गृहिता विचारे ही चिमुकली अफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखरावर आपले नाव कोरण्यासाठी सज्ज झाली आहे. येणाऱ्या स्वातंत्र्यदिनी तिने किलिमांजारो पर्वतशिखर सर करण्याचा निर्णय घेतला आहे. या शिखराच्या बेस कॅम्प ट्रेकला गवसणी घातल्यानंतर आता ८ वर्षीय गृहिता विचारे शिखरावर जाण्याच्या तयारीत आहे.

Mountaineer Gruhita Vichare
छोटी हिरकणी

गृहिताच्या किलिमांजारो अभियानाविषयी सांगताना मकरंद अनासपुरे

ठाणे : कोरोना काळात संपूर्ण जग चार भिंतींमध्ये कैद असतानाच गृहिता विचारे ही एक आठ वर्षांची चिमुकली मात्र जग जिंकण्यासाठी आपल्या पंखांमध्ये बळ एकवटत होती. आजोबा नरेश भोसले आणि वडील सचिन विचारे यांच्याकडून तिला गिर्यारोहणाचे बाळकडू मिळाल्यानंतर तिने उंच भरारी घेत थेट माऊंट एव्हरेस्टच्या पायथ्यालाच गवसणी घातली. एकूण 15 दिवसांचा हा ट्रेक अत्यंत खडतर आणि तिच्या इच्छाशक्तीची परीक्षा घेणारा ठरला. उणे तापमान, थंड बोचणारे वारे आणि ऑक्सिजनची घसरत जाणारी पातळी या सर्व आव्हानांना सामोरे जात तिने 13 दिवसात माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत धडक मारली. एकूण 148 किलोमीटरचा हा ट्रेक तिला तब्बल 5,364 मीटर एवढ्या उंच एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत घेऊन गेला. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे आणि स्वतःच्या जिद्दीमुळे तिने हे यश संपादन केले.

गृहिता आणि हरिताचे यश : आता गृहिताने थेट साऊथ अफ्रिकेच्या माउंट किलिमंजारो, या आफ्रिका खंडातील सर्वांत उंच शिखराला गवसणी घालण्याचा निर्धार केला आहे. ती 10 ऑगस्ट रोजी दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी बेस कॅम्पवर भारतीय ध्वज फडकवून भारताचा नावलौकिक सातासमुद्रापार नेण्याचा निर्धार तिने व्यक्त केला. गृहिता व तिची बहीण हरिता या दोघीही गिर्यारोहण करत असून त्यांनी आतापर्यंत 16 लहान-मोठे ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. या दोन्ही बहिणींनी आतापर्यंत 2596 फुटाचे मलंगडपासून महाराष्ट्राचे सर्वांत उंच 5400 फुटाचे कळसुबाई शिखरापर्यंतचे अनेक गड किल्ले यशस्वीरीत्या सर केले.

गृहिताची मुख्यमंत्र्यांशी भेट : गृहिताला छोटी हिरकणी हा किताब प्रेमाने दिला गेला आहे. चिमुकली गृहिता हिने नऊवारी साडी नेसून 'जीवधन सुळका' पार करण्याचा पराक्रमदेखील करून दाखवला होता. तिचे मामा आणि मराठी चित्रपट सृष्टीचे सुप्रसिद्ध सिने कलाकार मकरंद अनासपुरे यांनी तिला घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी चिमुकल्या गृहिताचे अभिनंदन करत तिला पुढच्या मोहिमांसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील दिले.

'ती' सवय आजही कायम : कोरोनाच्या काळादरम्यान काय करायचं ही अडचण सर्वच जगासमोर असताना या चिमुरडीला लागलेली ट्रॅकिंगची सवय ही आजही कायम आहे. आतापर्यंत भल्या भल्यांना न जमणारे १६ ट्रेक तिने पूर्ण केलेले आहे. आता तर तिने विक्रम करण्याची मानसिक तयारी केलेली आहे आणि त्यामुळे स्वातंत्र्य दिनी नवीन रेकॉर्ड बनवण्यासाठी ती प्रयत्न करणार आहे.

हेही वाचा:

  1. Asian Champions Trophy: भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला चारली पराभवाची धूळ, जय शाह यांनी केले अभिनंदन
  2. World Archery Championships : शाळा-कॉलेजच्या वयात सातारची आदिती स्वामी तिरंदाजीत बनली वर्ल्ड चॅम्पियन, जाणून घ्या तिचा सुवर्णमय प्रवास...
  3. India Vs Pakistan : मोठी बातमी! विश्वचषकात रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार, सरकारकडून ग्रीन सिग्नल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.