ETV Bharat / state

एफआरपी आंदोलनाचा भडका; जयंत पाटलांच्या राजारामबापू कारखान्याचे कार्यालय पेटवले

author img

By

Published : Jan 11, 2021, 11:54 AM IST

Fire
आग

सांगलीतील एक रकमी एफआरपीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेतकरी संघटना सतत आंदोलन करत आहेत. या दरम्यान, जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्याचे मिरज तालुक्यातील सावळवाडी येथील ऊस नोंदणी कार्यालय पेटवून दिल्याची घटना घडली.

सांगली - एक रकमी एफआरपीसाठी(हमी भाव) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगलीत आंदोलन केले आहे. सांगली जिल्ह्यातील या आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्याचे मिरज तालुक्यातील सावळवाडी येथील ऊस नोंदणी कार्यालय पेटवून देण्यात आले आहे. मात्र, अद्याप कोणत्याही शेतकरी संघटनेने याची अधिकृत जबाबदारी स्वीकारलेली नाही.

जयंत पाटलांच्या राजारामबापू कारखान्याचे कार्यालय पेटवले

एफआरपीचा प्रश्न अजून कायम -

सांगली जिल्ह्यातील ऊसाचा हंगामा सुरू होऊन दोन महिने झाले. तरीही एक रकमी एफआरपीचा प्रश्न अजून सुटलेला नाही. गाळप हंगामाच्या सुरुवातीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा मिळाल्यानंतर साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये संयुक्तिक बैठक पार पडली होती. कोल्हापूरच्या धर्तीवर एक रकमी एफआरपी देण्याची स्वाभिमानीची मागणी जिल्ह्यातील कारखानादारांनी मान्यही केली होती.

काही कारखान्यांनी पाळला नाही शब्द -

सांगली जिल्ह्यातील 16 पैकी केवळ 4 साखर कारखान्यांनी एक रकमी एफआरपी दिली आहे. इतर साखर कारखान्यांनी एक रकमी एफआरपी देण्यास आता असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक रकमी एफआरपीसाठी पुन्हा आंदोलन छेडले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण लाड यांच्या क्रांती साखर कारखान्याचे पलूस तालुक्यातील घोगाव येथील ऊस कार्यालय संतप्त शेतकऱ्यांनी पेटवून दिले होते. सांगलीच्या दत्त इंडिया संचलित वसंतदादा पाटील साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धडक देत कारखान्याच्या गव्हाणी मध्ये उड्या टाकण्याचा प्रयत्न केला होता.

राजरामबापूचे ऊस कार्यालय पेटवले -

आज (सोमवारी) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्याचे मिरज तालुक्यातील सावळवाडी येथील ऊस नोंदणी कार्यालय पेटवून देण्याची घटना घडली आहे. या आगीत कार्यालयातील साहित्य कागदपत्रे आणि टेबल, खुर्च्या जळून खाक झाल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.