आमदार, खासदारांनी वारंवार राजकीय पक्षांतरे करू नयेत - व्यंकय्या नायडू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2024, 9:17 PM IST

Venkaiah Naidu

Venkaiah Naidu : भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३ व्या भारतीय छात्र संसदेचं उद्घाटन व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी व्यंकय्या नायडू यांनी आमदार खासदारांच्या पक्षांतर करण्यावर भाष्य केलंय.

पुणे Venkaiah Naidu : राज्यात एकीकडं गेल्या दीड वर्षापासून सत्तांतर तसंच आमदार अपात्र आणि त्यांनतर पुन्हा पक्ष फुटीच्या घटना घडत आहेत. अशातच आज पुण्यात देशाचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आमदार खासदारांच्या पक्षांतर करण्यावर भाष्य केलं आहे. राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आमदार-खासदारांनी सतत पक्षांतरे करू नयेत. लोकशाही समाजव्यवस्थेत विरोधक जरूर असावे, पण एकमेकांशी शत्रुत्व नसावे. सत्ताधारी आणि विरोधक यांनी व्यापक दृष्टीकोन ठेवत संसदेचं कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी योगदान द्यावं, असं व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.


राजकीय पक्षांशी एकनिष्ठ असावे : यावेळी नायडू म्हणाले की, आज जे राजकीय कारकीर्द घडवू इच्छिणारे युवा विद्यार्थी आहेत, त्यांच्यासमोर पक्षबदलाचं, गोंधळाचं, घोषणाबाजीचे आदर्श न ठेवता एकमेकांना योग्य सन्मान करण्याची उदाहरणे समोर ठेवावीत. तसंच राजकीय क्षेत्रातील मंडळींनी आपापल्या राजकीय पक्षांशी एकनिष्ठ असावं. विचारधारा भिन्न असतील, दृष्टीकोन वेगळे असतील, पण संसदेच्या सभागृहात सर्वांनी देशहिताचा विचार सर्वोच्च ठेवला पहिजे. एक विचारानेच आपण नव्या युगातील भारत घडवू शकणार आहोत. राजकीय कार्यकर्ते, नेते यांनी सतत पक्षबदल केले की, सर्वसामान्य जनतेचा त्यांच्या कामातील रस संपतो. जनतेचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास उडणे हे धोक्याचं आहे, असं यावेळी नायडू म्हणाले.एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनू नये : सत्ताधारी गटाच्या चुकीच्या, अयोग्य धोरणांना, कृतींना विरोधकांनी अवश्य विरोध करावा, लोकशाहीने ती ताकद प्रत्येकाला दिली आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की, विरोधकांनी गदारोळ, घोषणाबाजी करून संसदेच्या कामकाजात सतत अडथळे निर्माण करावेत. त्यांनी विरोधक असावे, एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनू नये. कोणत्याही परिस्थितीत संसदेचं कामकाज सुरळीत चालू ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असं यावेळी नायडू म्हणाले.

हेही वाचा -

  1. संविधानाप्रमाणे निर्णय झाल्यास 40 आमदार अपात्र होतील - आदित्य ठाकरे
  2. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा घटनाक्रम, जाणून घ्या सविस्तर माहिती...
  3. आमदार अपात्रतेचा निकाल कसा असेल? खुद्द विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी 'ही' दिली माहिती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.