ETV Bharat / state

रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी घेतले जातात अधिक पैसे.. जिल्हाधिकाऱ्यांकडून खासगी रुग्णालयावर कारवाई

author img

By

Published : Sep 27, 2020, 3:11 PM IST

Sahyadri Hospital
सह्याद्री मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटल

रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी शासनाने खासगी रुग्णालयांना दर ठरवून दिले आहेत. असे असतानाही काही रुग्णालये रुग्णांची लूट करत आहेत. उस्मानाबादमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी सह्याद्री हॉस्पिटलवर दंडात्मक कारवाई केली.

उस्मानाबाद - कोरोना विषाणूची लागण झाली की, नाही या तपासणीसाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जाते. या तपासणीसाठी शासनाने खासगी रुग्णालयांना रक्कम ठरवून दिली आहे. मात्र, तरीही काही रुग्णालये या चाचणीसाठी रुग्णांकडून अधिकची रक्कम घेत आहेत. याप्रकरणी उस्मानाबादमधील डॉ. दिग्गज दापके यांच्या सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी या हॉस्पिटलला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आतापर्यंत रुग्णाकडून उकळण्यात आलेली रक्कमही त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. हॉस्पीटलने ८२ रुग्णांकडून अतिरिक्त रक्कम घेतली आहे.

सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडून रुग्णांची लूट केली जात असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे आली होती. रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी शासन नियमानुसार ६०० रुपये लागतात. मात्र, सह्याद्रीमध्ये दोन हजार रुपये व त्यापेक्षा अधिकचे शुल्क आकारले जात होते. जिल्हाधिकाऱयांनी तक्रारीची दखल घेवून हॉस्पिटल प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. चोवीस तासात याचा खुलासा करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशाराही त्यांनी दिला होता. हॉस्पिटलकडून समाधानकारक खुलासा करण्यात न आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.