ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये शेतात काम करत होता शेतकरी, आकाशातून पडला सोनेरी रंगाचा दगड

author img

By

Published : Sep 25, 2021, 2:56 PM IST

Updated : Sep 25, 2021, 3:23 PM IST

वाशी तालुक्यात एका शेतामध्ये आकाशातून सोनेरी दगड पडल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी एक शेतकरी आपल्या शेतामध्ये काम करत असतानाच अचानक आकाशातून एक दगड खाली पडला.

golden stone
आकाशातून पडला सोनेरी दगड

उस्मानाबाद - जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यात एका शेतामध्ये आकाशातून सोनेरी दगड पडल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी एक शेतकरी आपल्या शेतामध्ये काम करत असतानाच अचानक आकाशातून एक दगड खाली पडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आकाशातून उल्कापात पडल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. याबाबतचे संशोधन भूवैज्ञानिक विभाग करत आहेत.

हेही वाचा - हवामान खात्याचा इशारा : रविवारपासून राज्यभरात मुसळधार पावसासह चक्रीवादळाची शक्यता

  • वाऱ्यासारखा आवाज आला आणि दगड पडला -

प्रभू निवृत्ती माळी नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात हा दगड पडला आहे. माळी यांनी आपल्या शेतात भाजीपाल्याचं पीक घेतलं आहे. पण गुरुवारी रात्री उस्मानाबाद परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे शेतातील वाफ्यात पाणी साचलं आहे का? हे पाहण्यासाठी माळी आपल्या शेतात गेले होते. दरम्यान, शुक्रवारी साडेसहाच्या सुमारास वाफ्याची पाहणी करताना अचानक वाऱ्यासारखा आवाज झाला. काही कळायच्या आतच माळी उभे असलेल्या ठिकाणापासून सात-आठ फूट अंतरावर आकाशातून दोन किलो 38 ग्रॅम वजनाचा सोनेरी दगड पडला.

golden stone
आकाशातून पडला सोनेरी दगड
  • तपासणीसाठी दगड भूवैज्ञानिक विभागाकडे पाठवला -

अचानक घडलेल्या या घटनेमुळे माळी भयभीत झाले होते. यानंतर त्यांनी त्वरित याची माहिती तहसीलदार नरसिंग जाधव यांना दिली. तहसील कार्यालयाकडून या दगडाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर हा दगड उस्मानाबाद येथील भारतीय भूवैज्ञानिक विभागाकडे पाठवण्यात आला होता. हा दगड उल्कापात असल्याची शक्यता भूवैज्ञानिकांनी वर्तवली आहे. हा दगड सध्या तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे.

  • उल्कापात पडल्याची जोरदार चर्चा -

हा दगड सोनेरी आणि गव्हाळ रंगाचा असून, त्यामध्ये विविध थर आहेत. 2 किलो 38 ग्रॅम वजन असणाऱ्या या दगडाची लांबी 7 इंच इतकी आहे, तर रुंदी 6 इंच आहे. या दगडाची जाडी साडेतीन इंचापेक्षा अधिक असल्याची माहिती भूवैज्ञानिक विभागाकडून देण्यात आली आहे. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यात आकाशातून उल्कापात पडल्याची जोरदार चर्चा आहे. तरी याबाबतचे संशोधन भूवैज्ञानिक विभाग करीत आहेत.

हेही वाचा - ज्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले त्यांचा निर्णय जनतेच्या कोर्टात होईल; मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

Last Updated : Sep 25, 2021, 3:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.