ETV Bharat / state

थर्टी फर्स्टच्या रात्री वाहतूक पोलिसांनी केली 283 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 1, 2024, 10:18 PM IST

Mumbai Police Action
283 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई

Mumbai Police Action : थर्टी फर्स्टच्या पूर्व संधेपासून ते नववर्षाच्या पहाटेपर्यंत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आणि वाहतूक पोलिसांनी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली होती. या कालावधीत तळीरामांवर वचक ठेवत वाहतूक पोलिसांनी 283 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली असल्याची माहिती, वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी दिलीय.

मुंबई Mumbai Police Action : नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला ते एक जानेवारीच्या पहाटे सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषाने स्वागत (New Year Celebration) करण्यासाठी मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुंबई शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये चोख बंदोबस्त नेमण्यात आला होता. शहरातील जवळपास 13 हजार २२ पोलीस थर्टी फर्स्टच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. २२ पोलीस उपायुक्त, ४५ सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ४५० पोलीस निरीक्षक, १६०१ इतर अधिकारी आणि ११५०० पोलीस अंमलदार यांनी एकत्रित मुंबई शहरात नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला चोख बंदोबस्त करुन कुठलाही अनुचित प्रकार होवू दिला नाही.


'या' वाहन चालकांवर केली कारवाई : या बंदोबस्त दरम्यान मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ११२ ठिकाणी विशेष नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकुण ९ हजार २५ दुचाकी आणि तीनचाकी, चारचाकी आणि इतर वाहानांची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान विनाहेल्मेट वाहन चालवणाऱ्या एकूण २ हजार ४१०, विरुध्द दिशेने वाहन चालवणाऱ्या एकूण ३२० आणि बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या (Rash Driving) एकूण ८० वाहन चालकांवर मोटार वाहन कायदयान्वये कारवाई करण्यात आली. तसेच मद्यधुंद अवस्थेत (Drunk & Drive) वाहन चालवणाऱ्या एकूण 283 मद्यपी वाहन चालकांवर कलम १८५ मोटार वाहन कायदाअन्वये कारवाई करण्यात आल्या. तसेच प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने संवेदनशील ठिकाणे अशा एकूण ६१८ ठिकाणी तपासणी करण्यात आली. तसेच सार्वजनिक ठिकाणे, गर्दीचे ठिकाणे, समुद्र किनारे आणि विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


वाहतूकीचे केले होते नियमन : ३१ डिसेंबर, २०२३ च्या रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी मोठया प्रमाणात जनसमुदाय आपआपल्या वाहनासह समुद्र किनारी, पर्यटन ठिकाणे, उद्याने, शॉपिंग मॉल, उपहारगृहे आणि आस्थापना तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी एकत्र जमा झाले होते. त्याचप्रमाणे मोठा जनसमुदाय धार्मिक स्थळी देवदर्शनाकरीता आला होता. वाहतूकीची कोंडी होवू नये म्हणून मुंबई शहरातील वाहतूक गतीमान, सुनियोजीत आणि शिस्तबध्द पध्दतीने करण्याकरीता मुंबई वाहतूक विभागामार्फत जवळपास १५० पोलीस अधिकारी, १२०० पोलीस अंमलदार यांनी वाहतूकीचे नियमन केले असल्याची माहिती, वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी दिलीय.


वाहतूकीच्या नियमांचे नियमित पालन : ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यप्राशन करून वाहन चालविणारे एकूण २८३ वाहन चालकांवर कलम १८५ मोटार वाहन कायदयाप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विनाहेल्मेट १०९०, संकेतक ओलांडणे (सिग्नल जंपिंग) ३१०, विना सिटबेल्ट २९९, भाडे नाकारणारे ऑटो/टॅक्सी चालक २७१, ट्रिपलसीट वाहन चालविणारे १०७, इतर वाहनांना धोका, अडथळा, गैरसोय होईल अशाप्रकारे वाहन उभे करून ठेवणारे १११९ वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा आणि अधिनियमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे सर्व मोटार वाहन चालकांना आवाहन करण्यात आले आहे की, वाहतूक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि गतीमान करण्याकरीता वाहतूकीच्या नियमांचे नियमित पालन करावे.

हेही वाचा -

  1. देशभरात न्यू ईयरची धूम; मुंबईत उत्साहात स्वागत, रोषणाईनं नटली मायानगरी
  2. 'कायद्याच्या चौकटीत राहून नववर्षाचं स्वागत करा'; 'थर्टी फर्स्ट'साठी मुंबई पोलिसांची फौज तैनात, हुल्लडबाजांना दिला दम
  3. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज; 'या' ठिकाणी एन्जॉय करा थर्टी फर्स्ट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.