ETV Bharat / state

देशभरात न्यू ईयरची धूम; मुंबईत उत्साहात स्वागत, रोषणाईनं नटली मायानगरी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 31, 2023, 11:04 PM IST

New Year 2024 : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील प्रमुख इमारती रोषणाईनं उजळून निघाल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेची इमारत तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आकर्षक रोषणाई करण्यात आली.

New Year 2024
New Year 2024

पाहा व्हिडिओ

मुंबई New Year 2024 : ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार नवीन वर्ष १ जानेवारी रोजी साजरे केलं जातं. याची प्रथा १५८२ पासून सुरू झाली. हे कॅलेंडर पोप ग्रेगरी आठवा यानं तयार केलं होतं. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये लीप वर्षाचीही तरतूद आहे. मुख्यतः ख्रिश्चन धर्माशी संबंधित लोक ग्रेगोरियन कॅलेंडरचं पालन करतात. हे कॅलेंडर भारतातील सरकारी विभागांमध्ये वापरात आहे. ग्रेगोरियन कॅलेंडर १ जानेवारीपासून सुरू होतं आणि ३१ डिसेंबर रोजी संपतं. ३१ डिसेंबरच्या रात्री उशिरापासून देशभरात आणि जगभरात नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा उत्सव सुरू होतो.

मुंबईकर सज्ज : सरत्या वर्षाला निरोप देऊन २०२४ च्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. नवीन वर्षानिमित्त मुंबईतील प्रमुख इमारती रोषणाईनं उजळून निघाल्या. मुंबई महानगरपालिकेची इमारत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर नववर्षानिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. गेट वे ऑफ इंडिया हे मुंबईचे प्रवेशद्वार मानले जातं. आज थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे. रविवार आणि आज सुट्टी असल्यामुळे मुंबईकरांनी गेट वे ऑफ इंडिया येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र आहे.

राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी देशवासियांना नववर्षाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा देत समृद्ध समाज आणि राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प घेण्याचं आवाहन केलं. नववर्षाचं आगमन म्हणजे नवीन संकल्प आणि ध्येयं घेऊन पुढे जाण्याची संधी असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. "२०२४ हे वर्ष सर्वांसाठी सुख, शांती आणि समृद्धीचे जावो. आपण आपल्या देशाच्या प्रगतीत योगदान देत राहू या. नववर्षाचे स्वागत करून समृद्ध समाज व राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करूया", असं मुर्मू म्हणाल्या.

या देशात सर्वप्रथम नववर्ष साजरं : ३१ डिसेंबरची मध्यरात्र जसजशी जवळ येते तसतसं संपूर्ण जग नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज होतं. मात्र असं असलं तरी सर्व देश एकाच वेळी नवीन वर्ष साजरं करत नाहीत. काही देश इतर देशांपेक्षा जवळपास एक दिवस उशिराने नवीन वर्षाचे स्वागत करतात. ओशनियामधील मध्य प्रशांत महासागरात आंतरराष्ट्रीय तारीख रेषेच्या पूर्वेला असलेला किरिबाती हा बेट देश प्रथम नवीन वर्षाचे स्वागत करतो.

ऑस्ट्रेलियातही सेलिब्रेशन : ऑस्ट्रेलियात घड्याळात १२ वाजताच फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. सिडनी हार्बर ब्रिजवर फटाक्यांची आतषबाजी आणि लाईट शो आयोजित करण्यात आला होता. जगभरातील अंदाजे ४२५ दशलक्ष लोक दरवर्षी हे पाहतात. हाँगकाँगमध्ये नवीन वर्षाच्या निमित्तानं कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होते. हाँगकाँगच्या प्रसिद्ध स्कायलाईनच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते. तसेच हाँगकाँग कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर (HKCEC) सजवण्यात आलं होतं.

या देशांमध्ये बंदी : अनेक देशांतील अनेक ठिकाणी ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला साजरे करण्यास बंदी घातली आहे. गाझामधील पॅलेस्टिनींबद्दल सहानुभूती दाखवण्यासाठी यावर्षी पाकिस्तान सरकारनं नवीन वर्षाच्या उत्सवावर बंदी घातली आहे. २८ डिसेंबर २०२३ रोजी रात्री उशिरा सरकारनं जारी केलेल्या घोषणेनुसार, नवीन वर्ष साजरे करताना साधेपणाचं पालन करण्याचं आदेश जारी करण्यात आले आहेत. तर संयुक्त अरब अमिराती आणि काही अरब देशांनी गाझामधील लोकांशी एकता दर्शविण्यासाठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला फटाके फोडण्यास बंदी घातली आहे.

हे वाचलंत का :

  1. न्यूझीलंडमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीसह नववर्षाचं सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ
  2. न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी मुंबईकरांचा उत्साह; मरीन ड्राईव्हवर फटाके फोडण्यास मनाई, तगडा पोलीस बंदोबस्त तैनात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.