ETV Bharat / state

Death Threat To Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांच्या जीवाला खरंच धोका आहे का? 2021 पासून आजतागायत किती वेळा आल्या धमक्या?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 7:00 PM IST

Death Threat To Mukesh Ambani : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना 2021 पासून आजपर्यंत आठ वेळा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्यात. गेल्या शनिवारी मुकेश अंबानी यांना लागोपाठ सहावेळा धमकीचे मेल करणाऱ्या दोघांना तेलंगणा आणि गुजरातमधून जेरबंद केलंय.

Death Threat To Mukesh Ambani
मुकेश अंबानी

मुकेश अंबानींना आलेल्या धमक्या प्रकरणी सायबर तज्ज्ञ अ‍ॅड. प्रशांत माळी यांची प्रतिक्रिया

मुंबई Death Threat To Mukesh Ambani: कोणत्याही व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी आल्यास मुंबई पोलीस आरोपीचा शोध घेण्यास सक्षम आहेत. त्याचप्रमाणे उद्योगपती मुकेश अंबानी यांना आलेल्या मेलद्वारे धमकीचा शोध घेतला असून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई पोलीस नेहमीच तत्पर असून नागरिकांनी देखील सतर्क राहण्याचं आवाहन पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी केलंय. 24 फेब्रुवारी 2021 रोजी पहिल्यांदा खळबळ उडाली ती म्हणजे मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटीलियाबाहेर (Antilia) आढळलेल्या स्कॉर्पिओ कारमुळे. या कारमध्ये वीस जिलेटीनच्या कांड्या आणि अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र सापडलं होतं. (Mumbai Crime) याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला होता. या घटनेच्या दरम्यानच 5 मार्चला ठाण्यात मनसुख हिरेन नावाच्या व्यक्तीचा मृतदेह ठाण्यातील मुंब्रा खाडीत सापडला.


स्कॉर्पिओ हरवल्याची विक्रोळी पोलिसात तक्रार : दुसरीकडे मनसुख हिरेन यांनी 17 फेब्रुवारी 2021 ला ठाण्याहून मुंबईला येत असताना स्कॉर्पिओ कारमध्ये बिघाड झाल्यानं ती ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून नाहुर उड्डाणपुलाजवळ थांबवली होती. 18 फेब्रुवारीला गाडी थांबवलेल्या ठिकाणी मेकॅनिकसह मनसुख पोहोचले असता त्यांना तिथे स्कॉर्पिओ गाडी आढळून आली नाही. त्यामुळे हरवलेल्या या गाडीची मनसुख हिरेन यांनी विक्रोळी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली होती. नंतर तपासात हीच हरवलेली स्कॉर्पिओ गाडी जी मनसुख हिरेन यांच्या मालकीची आहे ती अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडली होती. त्याचप्रमाणे या स्कॉर्पिओ कारचा पाठलाग करणाऱ्या इनोव्हा गाडीत सचिन वाझे बसून पाठलाग करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील उघडकीस आलं होतं. विक्रोळी पोलीस ठाणे, मुंब्रा आणि गावदेवी पोलीस ठाण्यात दाखल असलेले तीनही गुन्हे महाराष्ट्र पोलिसांकडून राष्ट्रीय तपास यंत्रणा असलेल्या एनआयएकडे सुपूर्द करण्यात आले.

कोणकोणते अधिकारी अडकले : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ वाहनात स्फोटके सापडल्याप्रकरणी आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येतील संशयास्पद भूमिका याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रियाजुद्दीन काझीला आणि वाझे यांच्यासह माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, माजी पोलीस कर्मचारी विनायक शिंदे आणि सुनील माने यांचा देखील आरोपींमध्ये समावेश करत सर्वांना अटक केली होती. या प्रकरणाला राजकीय वळण देखील लागले होते. निलंबित सचिन वाझे याला उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना पुन्हा पोलीस दलात कार्यरत करण्यात आले असल्याचा आरोप तत्कालीन विरोधी पक्षाकडून करण्यात आला.


नुकतेच आले होते धमकीचे मेल : ऑक्टोबर महिन्यात सतत पाच दिवसांपासून वारंवार मेलद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या मुकेश अंबानी यांना आल्या होत्या. प्रत्येकवेळी मेल पाठवणारी व्यक्ती त्याच्या खंडणीच्या रकमेत वाढ करत होती. गावदेवी पोलिसांशिवाय खंडणी विरोधी पथक आणि सायबर सेलही या प्रकरणाचा तपास करत होतं. 400 कोटींच्या खंडणीची मागणी करत 29 ऑक्टोबरला आलेल्या तिसऱ्या मेल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अंबानींच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यानंतर सीबीआयच्या इंटरपोल मार्फत बेल्जियमच्या मेल फेन्स या कंपनीला पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, अशा कॉर्पोरेट कंपनीच्या ई-मेल आयडी डोमेनचा बेकायदेशीर वापर केला जाऊ शकतो का? याविषयी सायबर तज्ज्ञ वकील प्रशांत माळी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना अधिक माहिती दिली.

ईमेलद्वारे 200 कोटींची मागणी : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, shadabkhan@mailfence.com वरून मेल आले आहेत. आरोपीने तिसऱ्या मेलमध्ये म्हटले आहे की, आता आम्ही आमची मागणी 400 कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे. पोलीस मला शोधू शकत नाहीत, ते मला अटकही करू शकत नाहीत. याप्रकरणी रिलायन्स कंपनीच्या सुरक्षा प्रभारींनी गावदेवीमध्ये तक्रार दाखल केली. पहिला मेल 27 ऑक्टोबरला आला होता. ज्यामध्ये 20 कोटी रुपये मागितले गेले होते. 28 ऑक्टोबरला दुसरा मेल आला होता. ज्यामध्ये 20 कोटी रुपये मागितले गेले होते. 28 ऑक्टोबरला दुसऱ्या मेलमध्ये ही रक्कम 200 कोटी रुपये करण्यात आली होती. 30 ऑक्टोबरला ही रक्कम दुप्पट करून 400 कोटी रुपयांची थेट मागणी करण्यात आली. माझा माग पोलीस काढू शकत नाहीत. तसंच ते मला अटकसुद्धा करू शकत नाहीत. त्यामुळे आम्हाला तुम्हाला मारण्यास कुणीच काही करु शकत नाही. तुमची कितीही चांगली सुरक्षा असली तरीही आमचा एक शूटर आहे जो तुम्हाला मारू शकतो, असं ईमेलमध्ये नमूद केलं होतं.

ईमेलमधून अंबानी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी : या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी तेलंगणा मधून गणेश वानपारधी या 19 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याचप्रमाणे 31 ऑक्टोबर आणि एक नोव्हेंबरला पुन्हा अंबानी यांना मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र, या मेलमध्ये खंडणीची मागणी करण्यात आली नव्हती. वारंवार सांगूनही लक्षात येत नाही याचा परिणाम वाईट होईल असं या मेलमध्ये म्हटलं होतं. याप्रकरणी देखील गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गुजरात येथील गांधीनगर मधून राजवीर जगतसिंह खंत (वय 20) या आरोपीला अटक केली आहे. गावदेवी पोलिसांनी गणेश वानपारधी याला गुन्हे शाखेच्या ताब्यात दिलं आहे. या दोघांनाही न्यायालयात हजर केलं असता आठ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.




सायबर तज्ज्ञ वकील काय म्हणाले - एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या ई-मेलचा डोमेन वापरून बेकायदेशीर मेल पाठवला जाऊ शकतो का? असं असल्यास हा एक प्रकारचा सायबर क्राईम आहे. अंबानींना देखील एका बेल्जियन कंपनीच्या ईमेल आयडी वरून जीवे मारण्याच्या धमकीचा आणि खंडणीचा तीन दिवस तीन वेळा मेल आलेला आहे. हा देखील अशा प्रकारे बेल्जियन कंपनीचा डोमेन वापरून बेकायदेशीर रित्या मेल पाठवलेला असू शकतो. या आरोपीला आरोप सिद्ध झाल्यास आणि आरोपी दोषी आढळल्यास तीन वर्षांची शिक्षा आणि पाच लाखांचा दंड आकारला जाऊ शकतो, अशी माहिती सायबर तज्ज्ञ वकील प्रशांत माळी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे. गेल्या वर्षी २९ सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्रालयाने मुकेश अंबानी यांची सुरक्षा झेड श्रेणीवरून झेड+ केली होती. z+ सुरक्षेसाठी अंबानी सरकारला 40 लाखांपेक्षा जास्त पैसे देतात.

हेही वाचा:

  1. Mukesh Ambani Threat Case: मुकेश अंबानींना मेलवरुन वारंवार धमकी; आणखी एक आरोपी गुजरातमधून अटक
  2. Mukesh Ambani Threat Case : मुकेश अंबानींना धमकी देणाऱ्या आरोपीला तेलंगाणातून अटक; आठ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
  3. Death Threat to Mukesh Ambani : 400 कोटी द्या नाहीतर...; उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची तिसऱ्यांदा धमकी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.