ETV Bharat / state

Kalammawadi Dam Water : कोल्हापूरकरांना दिवाळी गिफ्ट! थेट पाईपलाईनच्या पाण्यानं होणार दिवाळीचं 'अभ्यंगस्नान'

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2023, 11:21 AM IST

Updated : Nov 11, 2023, 12:34 PM IST

Kalammawadi Dam Water
जलपूजन करताना पदाधिकारी

Kalammawadi Dam Water : ऐन दिवाळीत कोल्हापूरकरांना गिफ्ट मिळालंय. कोल्हापूरकरांचा बहुप्रतिक्षित थेट पाइपलाइन योजना अखेर पूर्णत्वाकडं गेलीय. काळम्मावाडी धरणातून तब्बल 52 किलोमीटर थेट पाइपलाइनद्वारे पाणी पुईखडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्रावर दाखल झालंय.

कोल्हापूर Kalammawadi Dam Water : कोल्हापूरकरांचा बहुप्रतिक्षित महत्वाकांक्षी प्रकल्प काळम्मावाडी धरणातून थेट पाइपलाइन योजना अखेर पूर्णत्वाकडं गेली आहे. काळम्मावाडी धरणातून तब्बल 52 किलोमीटर थेट पाइपलाइनद्वारे पाणी पुईखडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्रावर शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास पोहोचलंय. यामुळं कोल्हापूरकरांचं दिवाळीचं अभ्यंगस्नान आता थेट पाईपलाईनच्या पाण्यानं होणार आहे. काळम्मावाडी धरणातील पाणी कोल्हापुरात पोहोचल्यानंतर आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. आमदारांसह कार्यकर्ते गुलालात नाहून निघाले. तसंच यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील यांना दिवाळीआधीच 'अभ्यंगस्नान' घातलं.

2013 मध्ये योजनेला मंजुरी : कोल्हापूरकरांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळावं, यासाठी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना डिसेंबर 2013 मध्ये थेट पाइपलाइन योजना आखण्यात आली. तत्कालीन केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या शिफारशीनंतर या योजनेसाठी सुमारे 483 कोटीचा निधी मंजूर केला. त्यानंतर ऑगस्ट 2014 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. गेली नऊ वर्ष या योजनेचं काम सुरू होतं. यामध्ये अनेक सरकारं बदलली आणि त्यामध्ये अनेक अडथळे येत गेले आणि योजना रखडत गेली. जॅकवेलच्या कामात वनविभागानं गुन्हे दाखल केल्यानं अडथळा देखील निर्माण झाला होता. यामुळं कोल्हापूरकरांना थेट पाईपलाईनमधून पाणी कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित होत होता. गेली दोन-तीन वर्षे तर यावर्षी दिवाळीची अंघोळ काळम्मावाडी योजनेच्या पाण्यानं होणार, असं सांगितलं जात होतं.

आमदार सतेज पाटलांची महत्वाकांक्षी योजना : आमदार सतेज पाटील यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्यानं महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी याकडं पाठपुरावा करत कामाला गती आणली. जुलै महिन्यात जॅकवेलचं काम पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं पाणी जॅकवेलमध्ये आलं आणि पहिला टप्पा पूर्ण झाला. त्यामुळं काही दिवसांपूर्वी हे पाणी पुईखडी इथं येणार होतं. मात्र कोणीतरी अज्ञातानं पाणी उपसा करणाऱ्या पम्पिंग स्टेशन इथल्या मोटारची वायर कापून टाकल्यानं पाणी येण्यास अडथळा निर्माण झाला होता. सोलापूरहून टेक्निकल टीम बोलवून घेत मोटरची वायर नीट करुन घेण्यात आली आणि रात्री 11 च्या सुमारास पाणी पुईखडी इथं पोहोचलं. यामुळं दिवाळीचं अभ्यंगस्नान थेट पाइपलाइनच्या पाण्यानं होणार आहे.

पाणी दाखल होताच जल्लोष : हे पाणी पुईखडी इथं दाखल होताच आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्यासह काँग्रेस नगरसेवक आणि पदाधिकारी जलपूजनासाठी पुईखडी इथं दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत हलगीच्या ठेक्यावर आनंदोत्सव साजरा केला. तर सतेज पाटील यांना पुईखडी इथं अभ्यंगस्नान घालण्यात आलं. तसंच थेट पाईपलाईनचं पाणी घेऊन करवीर निवासिनी अंबाबाईला नेऊन अर्पण करण्यात आलं.

हेही वाचा :

  1. Mild Earthquake In Koyna Dam : कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला; सुदैवाने कोणतीही हानी नाही
  2. Koyna Dam Earthquake: कोयना धरणाचा परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्यानं हादरला, कोणतीही हानी नाही
  3. Balasaheb Thorat on Drought : सरकारला दुष्काळाचं गांभीर्य नाही; बाळासाहेब थोरातांची राज्य सरकारवर टीका
Last Updated :Nov 11, 2023, 12:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.