ETV Bharat / state

Jaggery Chocolate Kolhapur : गुळाचे चॉकलेट बनवणारा कोल्हापूरातील 'कँडी मॅन'

author img

By

Published : Mar 6, 2022, 10:24 AM IST

Jaggery Chocolate Kolhapur
Jaggery Chocolate Kolhapur

कोल्हापूरातील गुराळघरांची संख्या कमी होत चालली आहे. मात्र, करवीर मधील एका गुऱ्हाळचालकाने हा व्यवसाय बंद न करता तंत्र विकसित केले आहे. त्यामुळे गुळाला आता किलोला 40 रुपये ऐवजी 200 रुपये भाव मिळत ( Jaggery Chocolate Kolhapur ) आहे.

कोल्हापूर : एकेकाळी जिल्ह्यात हजाराच्या घरात गुऱ्हाळघरे पाहायला मिळायची. मात्र, उत्पादन खर्च आणि मिळणारा दर समाधानकारक नसल्याने अनेक गुऱ्हाळघरे आता बंद होत चालली आहेत. तर अनेक जण या व्यवसायात काहीही राहीले नाही, म्हणत वर्षांनुवर्षे चालत आलेला व्यवसाय बंद करायच्या विचारात आहेत. पण, असे विचार करणाऱ्या सर्वच चालकांसाठी कोल्हापूरातील एका गुऱ्हाळघर चालकाने तंत्र विकसित केले आहे. ज्याने त्यांच्या या पारंपरिक व्यवसायाला एक वेगळी दिशा तर मिळेलच शिवाय दुप्पट नफा कसा मिळू शकतो याचे उदाहरण दाखवून दिले आहे. कोण आहेत हे गुऱ्हाळघर मालक आणि त्यांनी असे काय केले आहे. ज्यामुळे त्यांच्या गुळाला 40 रुपये किलोवरून तब्बल 200 रुपये किलो इतका दर मिळणार ( Jaggery Chocolate Kolhapur ) आहे.

पारंपरिक गुळाच्या ढेप न बनवता बनवल्या 'चॉकलेट कँडी'

कोल्हापूरातल्या करवीर तालुक्यातील शिंदेवाडी या छोट्याशा गावात राहणारे शेतकरी राजेंद्र वडगावकर हे आपल्या वडीलांच्या काळापासूनच सुरू असलेले गुऱ्हाळघर चालवतात. ते स्वतः या व्यवसायात 15 ते 20 वर्षांपासून आहेत. यामध्ये त्यांना म्हणावा तसा नफा मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या बंधूने मिळून आपला पारंपरिक व्यवसाय बंद करण्याचा विचार न करता या व्यवसायात काहीतरी वेगळं करून उत्पन्न दुप्पट करण्याबाबत काम सुरु केले. याचदरम्यान लहान मुलांसाठी सेंद्रिय गुळापासून बनवलेले चॉकलेट देऊ शकतो असा विचार त्यांच्या डोक्यात आला. तब्बल 2 वर्षांपासून त्यांनी यामध्ये विविध प्रयोग सुरू ठेवले होते. त्यानुसार त्यांनी अस्सल कोल्हापुरी सेंद्रिय गुळापासून चॉकलेट बनवले. या चॉकलेटला त्यांनी 'जॅगफायटर' असे नाव दिले आहे. त्यांच्या या चॉकलेट मुळे त्यांचे उत्पन्न तर दुप्पट झालेच आहे, शिवाय मागणी सुद्धा वाढली आहे. ज्यामुळे गूळ उत्पादन व्यवसाय बंद करण्याचा विचार तर लांबच शिवाय आता अधिक उत्पादन घेण्यासाठी काय करता येईल याचा प्रयत्न करत आहेत.

गुळाचे चॉकलेट बनवणाऱ्या गुऱहाळाचा प्रतिनिधीने घेतलेला आढावा

40 रुपये किलोला 200 रुपये इतका दर कसा मिळाला?

दरम्यान, त्यांनी बनवलेल्या या चॉकलेटचे वजन 7 ग्रॅम इतके आहे. त्याची ग्राहकांसाठी त्यांनी दोन रुपये इतकी किंमत ठरवली आहे. त्यानुसार त्यांनी 100 चॉकलेट नगासाठी प्लॅस्टिक बरण्या बनवून घेतल्या असून, त्याची किंमत जवळपास 130 च्या आसपास ठेवली आहे. त्यामुळे 1 किलो गुळाला बाजारात 40 रुपये किलो इतका दर मिळतो. मात्र, या चॉकलेटच्या रुपात विक्री केल्याने त्याच गुळाला 200 रुपये किलो इतका दर मिळाला आहे.

चॉकलेट बनवणारे मशीन आणि इतर साहित्य घेतले बनवून; आला 'इतका' खर्च

या चॉकलेट निर्मितीसाठी वडगावकर यांनी स्टीलचे वाफे, सिलिकॉलचे साचे तसेच पॅकेजिंगसाठी गोकुळ शिरगाव येथून विशिष्ट मशीन बनवली आहे. काहिलीमध्ये तयार झालेला गूळ स्टीलच्या वाफ्यात थंड करून तो सिलिकॉनच्या साचामध्ये भरला जातो. सिलिकॉनचे साचे सुद्धा त्यांनी गुजरात वरून बनवून घेतले आहेत. साचामधील गूळ थंड झाल्यावर त्यामधून तो काढला जातो. त्यानंतर पुढे तो चॉकलेट रुपात पॅकेजिंगसाठी बनवून घेतलेल्या मशीन मध्ये ठेवला जातो. प्रत्येक सेकंदाला एक ते दोन या पद्धतीने दिवसभरात मोठ्या प्रमाणात या मशीनद्वारे चॉकलेट बनवू शकतो. त्यानुसार त्यांच्याकडे दिवसभरात 200 ते 300 किलोचे आता उत्पादन सुरू आहे. विशेष म्हणजे अन्न व औषध विभागाचे परवाने काढूनच त्यांनी हा व्यवसाय सुरू केल्याचे म्हटले आहे. ही सर्व यंत्र सामग्री आणि परवाने यासाठी त्यांना तब्बल 10 ते 15 लाख इतका खर्च आला असून, भविष्यात यापेक्षाही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याचा त्यांचा विचार आहे.

Jaggery Chocolate
Jaggery Chocolate

'जॅगफायटर' जॅगरी कॅन्डीचे (चॉकलेटचे) 'हे' आहेत औषधी गुणधर्म

गूळ : रक्तामधील हिमोग्लोबिन आणि लोहाचे प्रमाण वाढते. पचन शक्ती सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. साधारण सर्दी-खोकल्यावर गुणकारी. विशेष म्हणजे कोणत्याही पद्धतीने या गुळामध्ये केमिकल वापरण्यात आले नसून पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने बनविण्यात आला आहे.

सुंठ, लवंग, बडीशेप, वेलदोडे : पोटदुखी, अपचन, अजीर्ण, मळमळ यावर गुणकारी, तसेच सर्दी खोकल्यासाठी सुद्धा उपयुक्त. रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत. कर्करोग विरोधी गुणधर्म. पोटातील अल्सरवर उपाय. भूक वाढते. बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर होते. माऊथ फ्रेशनर.

हेही वाचा - Mumbai Meri Jaan : मुंबईत बच्चे कंपनी, पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणजे 'राणी बाग'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.