ETV Bharat / city

Mumbai Meri Jaan : मुंबईत बच्चे कंपनी, पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणजे 'राणी बाग'

author img

By

Published : Mar 6, 2022, 6:03 AM IST

ब्रिटीशकाळात इंग्लंडची राणी क्वीन व्हिक्टोरिया ( Queen Victoria ) यांच्यासाठी भायखळा येथे उद्यान आणि प्राणी संग्रहालय ( Jijamata Udyan Byculla Zoo ) उभारण्यात आले. ही बाग ५३ एकर परिसरात पसरलेली आहे. मुंबईमधील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे. या बागेचे मूळचे नाव क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स ( Queen Victoria Garden ) होते. नंतर या बागेचे नाव वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय ( Jijamata Udyan Byculla Zoo ) असे करण्यात आले.

मुंबई राणी बाग प्राणी
मुंबई राणी बाग प्राणी

मुंबई - ब्रिटीशकाळात इंग्लंडची राणी क्वीन व्हिक्टोरिया ( Queen Victoria ) यांच्यासाठी भायखळा येथे उद्यान आणि प्राणी संग्रहालय ( Jijamata Udyan Byculla Zoo ) उभारण्यात आले. १९ नोव्हेंबर १८६२ रोजी लेडी कॅथरीन फ्रेअर यांनी या बागेचे उद्घाटन केले. ही बाग ५३ एकर परिसरात पसरलेली आहे. मुंबईमधील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे. या बागेचे मूळचे नाव क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स ( Queen Victoria Garden ) होते. नंतर या बागेचे नाव वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय ( Jijamata Udyan Byculla Zoo ) असे करण्यात आले. या बागेत २८६ प्रजातींची ३,२१३ वृक्ष आणि ८५३ वनस्पती आहेत. याशिवाय अनेक सस्तन प्राणी, पक्षी आणि कीटक यांचे वास्तव्य या उद्यानात आहे. राणीबाग हे पर्यटकांचे तसेच विशेष करून बच्चे कंपनीचे आवडीचे ठिकाण आहे.

राणी बाग

आंतरराष्ट्रीय दर्जाची राणीबाग -

मध्य रेल्वेच्या भायखळा स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर राणीबाग आहे. या राणीबागेत काही प्राण्यांचा मृत्यू झाल्यावर प्राणी मित्र आणि पर्यावरण प्रेमी संघटनांकडून टीका केल्यावर राणीबाग आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेले काही वर्षे राणीबागेत नूतनीकरणाचे काम सुरु आहे. राणी बागेच्या बाजूला असलेला मफतलाल कंपनीचा भूखंड मिळाल्याने राणीबागेच्या नूतनीकरणाच्या कामाला वेग आला आहे. प्राण्यांना आपण नैसर्गिक अधिवासात आहोत याची जाणीव व्हावी यासाठी पिंजरे बनवण्यात आले आहेत. पिंजऱ्यात जंगलामधील वातावरण, झरे, पाण्याचे तलाव बनवण्यात आले आहेत. यामुळे प्राण्यांना जंगलातच आहोत, याची जाणीव होत आहे. पिंजऱ्याना काचा लावण्यात आल्या आहेत. यामुळे पर्यटक आणि लहान मुलांना प्राणी काय करत आहेत, याचा आनंद घेता येत आहे.

मुंबई राणी बाग प्राणी
मुंबई राणी बाग प्राणी

राणीबागेत हे प्राणी पक्षी -

राणीबागेत भारतीय वंशाचे ३०० हून अधिक प्राणी आणि पक्षी आहेत. मार्च २०१७ मध्ये पेंग्विन आणल्यावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. बारासिंगा (स्वॅम्प डीअर), हिंस्त्र प्राणी म्हणून ओळखले जाणारे पट्टेरी तरस, कोल्हे, अस्वल, गेंडा, पाणघोडा, बिबट्या, औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातून पट्टेदार वाघाची जोडी आदी प्राणी राणीबागेत सध्या पाहायला मिळतात. गुजरात प्राणीसंग्रहालायाला राणीबागेतील दोन झेब्रा देऊन तेथून सिंहाची जोडी राणी आणण्यात येणार आहे. परदेशातून कांगारू, झेब्रा, जिराफ आदी प्राणी आणले जाणार आहेत. लवकरच जगात महाकाय म्हणून ओळखला जाणारा अ‍ॅनाकोंडा आणला जाणार आहे. या शिवाय विविध २१ प्रकारचे सापही आणले जातील. यामध्ये नाग, अजगर, तस्कर, मण्यार, धामण, घोणस, मांडूळ, पाणसर्प, फुरसे, हरणटोळ असे देशी तर अ‍ॅनाकोंडा, मॉनिटर लिझार्डसारखे विदेशी सापही आणले जाणार आहेत.

मुंबई राणी बाग प्राणी
मुंबई राणी बाग प्राणी

वन्यजीवांसाठी प्रदर्शनीय बांधकाम -

नवी दिल्लीच्या केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने १३ फेब्रुवारी २०१९ मध्ये मंजूर केलेल्या आराखड्यानुसार राणी बागेत विविध आधुनिकीकरण प्रकल्पाचे कामे टप्प्यात केली जात आहेत. त्यासाठी पालिकेच्या २०२०-२१ अर्थसंकल्पात दुसऱ्या टप्प्यातील विकास कामांसाठी ४३ कोटी रुपये खर्च झाला असून २०२२-२३ च्या पालिका अर्थसंकल्पात ११५.४६ कोटी रुपये इतकी तरतूद केली आहे. राणी बागेच्या आधुनिकीकरण प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यात पाणमांजर, सांबर, कांकर, नीलगाय, चौशिंगा या वन्यजीवांसाठीचे प्रदर्शनीय बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे नवीन संकल्पासह उद्यान विकसित करण्यात आले आहे. प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात प्राणीसंग्रहालयलगतच्या सुमारे १० एकर इतक्या दोन भूखंडावर विस्तार केला जाणार आहे. त्यात, जिराफ, झेब्रा, सफेद सिंह, जॅग्वार आदी प्राण्यांसाठी प्रदर्शनी तयार करण्यात येत आहेत. त्यातील निविदा प्रक्रिया काम अंतिम टप्प्यात आहे. राणीबागेत प्राण्यांसाठी रुग्णालय तयार केले जाते आहे. पाच हजार चौरस फुटाचे रुग्णालय बांधले जात आहे. सध्या या रुग्णालयाचे काम सुरु असून यात प्राण्यासाठी सर्व आवश्‍यक सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. या रुग्णालयात प्राण्यांसाठी आयसीयू सारखीही सुविधा यात असणार आहे.

मुंबई राणी बाग प्राणी
मुंबई राणी बाग प्राणी

राणीबागेत २ पेंग्विन, एका वाघाचा जन्म -

राणीबागेत प्राण्यांचे मृत्यू होत असल्याने टीका होत होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाची राणीबाग करण्याचे काम सुरू झाले. गेले कित्तेक वर्षे राणीबागेत नूतनीकरण करण्याचे काम सुरु आहे. राणीबागेत २०१७ मध्ये ८ हंबोल्ड पेंग्विन आणण्यात आले. त्यापैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाला. त्यानंतर पेंग्विनच्या जोड्या जमल्यावर एका पिलाला जन्म दिला. मात्र त्या पिलांचा जन्मजात आजारामुळे मृत्यू झाला. त्यानंतर १ मे २०२१ ला म्हणजेच महाराष्ट्र आणि कामगार दिनी एका पिलाला जन्म दिला. त्याचे नाव ओरियो असे ठेवण्यात आले होते. त्यानंतर मोल्ड नावाचा नर आणि फ्लिपर नावाच्या मादी पेंग्विनने १८ ऑगस्ट २०२१ रोजी एका नर पिल्लाला जन्म दिला आहे. त्याचे नाव ऑस्कर ठेवण्यात आले आहे. यामुळे आता पेंग्विनची संख्या ९ झाली आहे. राणीबागेत १५ वर्षानंतर १२ फेब्रुवारी २०२१ ला बंगाल टायगरची जोडी आणण्यात आली. त्यामधील नर वाघाचे नाव शक्ती तर मादी वाघाचे नाव करिश्मा असे आहे. या वाघांच्या जोडीने १४ नोव्हेंबर २०२१ रोजी म्हणजेच बाल दिनी एका नर मादीला जन्म दिला आहे. या मादीचे नाव विरा असे ठेवण्यात आले आहे. राणीबागेत आता ३ वाघ झाले आहेत.

राणी बाग ब्रिडींग सेंटर -

राणीबागेचे नूतनीकरण केले जात आहे. शिवसेना युवा नेते आणि सध्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी राणीबागेत ब्रिडींग सेंटर सुरु करावे अशी सूचना केली होती. गेल्या वर्षभरात परदेशी पेंग्विनने दोन पिल्लाना तर बंगाल टायगरने एका मादी बछडीला जन्म दिला आहे. येत्या काळात भारतीय वंशाच्या प्राण्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने ब्रिडींग केले जाणार आहे. ब्रिडींग द्वारे प्राण्यांची संख्या वाढवून इतर प्राणि संग्रहालयाला प्राणी देऊन इतर प्राणी राणीबागेत आणले जातील अशी माहिती संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

हेही वाचा - Mumbai Meri Jaan : मुंबई मेरी जान; गॉथिक शिल्पकलेचा नमुना मुंबई महापालिका मुख्यालय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.