ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : विश्वचषकात धुमाकूळ घालणाऱ्या रचिन रवींद्रला आवडतात दक्षिण भारतीय पदार्थ, आजोबांनी शेअर केले किस्से

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 10:13 PM IST

Cricket World Cup 2023 : न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रला डोसासह दक्षिण भारतीय पदार्थ खूप आवडतात. त्याचे आजोबा बालकृष्ण यांनी 'ईटीव्ही भारत'च्या कुमारा सुब्रमण्य एस यांच्याशी एका खास संभाषणात रचिन रवींद्रबद्दल काही मनोरंजक तथ्यं शेअर केलेत.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023

बेंगळुरू Cricket World Cup 2023 : न्यूझीलंडचा युवा डावखुरा फलंदाज रचिन रवींद्र भारतात सुरू असलेल्या विश्वचषकात चमकदार कामगिरी करत आहे. विशेष बाब म्हणजे, रचिनचं नाव त्याच्या वडिलांनी भारताचे माजी दिग्गज खेळाडू, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या नावावर ठेवलंय. विश्वचषकात रचिन जबरदस्त फार्मात असून त्यानं आतापर्यंत ३ शतकं ठोकली आहेत.

रचिन मूळचा कर्नाटकचा आहे : रचिनच्या मामाचं घर कर्नाटकात असून त्याचे आजी-आजोबा बेंगळुरूमध्ये राहतात. त्याचे आजोबा टीए बालकृष्ण यांना रचिन रवींद्रला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबर रोजी भारताविरुद्ध अंतिम सामन्यात खेळताना आणि चांगली कामगिरी करताना पाहायचं आहे. बालकृष्ण म्हणाले, 'टीम इंडियानं वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केली आहे. संघानं आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले. मला न्यूझीलंड आणि भारताचा अंतिम सामना पाहायला आवडेल. रचिननं सामन्यात चांगलं खेळावं, मात्र टीम इंडियानं विश्वचषक जिंकावा', असं ते म्हणाले.

वडील होते पहिले शिक्षक : १९९७ मध्ये रचिनचे आई-वडील कामानिमित्त न्यूझीलंडला गेले आणि त्यांना तेथील नागरिकत्व मिळालं. रचिनचा जन्म १९९९ मध्ये तिथेच झाला. त्याचे वडील रवी कृष्णमूर्ती हे त्याचे पहिले शिक्षक होते. रवी कृष्णमूर्ती यांना क्लब क्रिकेट खेळण्याचा अनुभव होता. क्रिकेटवरील प्रेमापायीच रचिनच्या आई-वडिलांनी त्याचं नाव सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या नावावर ठेवलं.

राहुल द्रविडनं कौतुक केलं : या युवा खेळाडूनं ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध शतक झळकावून मोठ्या मंचावर आपली घोषणा केली. यानंतर राहुल द्रविडनं रचिन रवींद्रचं कौतुक केलं होतं. बालकृष्ण म्हणाले, 'न्यूझीलंडमध्ये रचिन आणि (केन) विल्यमसन देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकाच संघाकडून खेळतात. त्यामुळे केनला रवींद्रची खेळण्याची क्षमता चांगलीच ठाऊक आहे. मला आशा आहे की त्याला आणखी संधी मिळतील. भारताचे वरिष्ठ खेळाडू त्याच्या खेळाचं मनापासून कौतुक करतात हे ऐकून बरं वाटलं', असं ते म्हणाले.

रचिनला खायला काय आवडतं : दरम्यान, बालकृष्णन यांना जेव्हा रचिनच्या खाद्यपदार्थांच्या आवडीनिवडीबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, 'तो (रचिन) खेळासाठी अधिक समर्पित आहे. तो आहारावर बरंच लक्ष देतो. पण त्याला दक्षिण भारतीय पदार्थ खूप आवडतात. विशेषतः डोसा आणि इडली. त्याला घरचं जेवण आवडतं. जेव्हा तो बेंगळुरूला येतो तेव्हा तो हे पदार्थ चाखतो.

आजोबा नातवाला भेटू शकले नाहीत : येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात, रचिननं या विश्वचषकातील तिसरं एकदिवसीय शतक झळकावलं. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये जाऊन पाकिस्तानविरुद्धचा सामना पाहिल्याचं बालकृष्ण यांनी सांगितलं. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमांमुळे ते विश्वचषकादरम्यान आपल्या नातवाला भेटू शकले नाहीत. बालकृष्ण म्हणाले, 'मी सामन्यानंतर त्याला भेटण्याचा प्रयत्न केला. पण, आयसीसी प्रोटोकॉलनुसार मला परवानगी नव्हती. विश्वचषकादरम्यान त्याला भेटू शकलो नाही. स्पर्धेनंतर तो थेट न्यूझीलंडला जाणार आहे. गेल्या वर्षी (२०२२), त्याने त्याच्या सुट्ट्या आमच्यासोबत बेंगळुरूमध्ये घालवल्या होत्या.'

न्यूझीलंडचा उगवता तारा : बालकृष्ण म्हणाले की, विश्वचषकानंतर ते न्यूझीलंडला जाणार आहेत. ते शेवटी म्हणाले की, रचिन न्यूझीलंडसाठी खेळत होता आणि त्याच वेळी अभ्यासही करत होता. रचिन रवींद्रनं २० एकदिवसीय सामन्यांच्या १६ डावांमध्ये १०८.५४ च्या स्ट्राइक रेटनं आणि ४७.४७ च्या सरासरीनं ७१२ धावा केल्या आहेत. १२३ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. एक उगवता किवी तारा खऱ्या अर्थानं त्याच्या मूळ देशात चमकत आहे!

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : टीम इंडियाच्या विश्वचषकातील दमदार कामगिरीमागचं रहस्य काय?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.