ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : टीम इंडियाच्या विश्वचषकातील दमदार कामगिरीमागचं रहस्य काय?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 6:00 AM IST

Cricket World Cup 2023 : माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी सदस्य संजय जगदाळे यांनी भारतीय संघाच्या विश्वचषकातील कामगिरीबाबत 'ईटीव्ही भारत'शी खास बातचित केली. यावेळी बोलताना त्यांनी टीम इंडियाच्या दमदार कामगिरीमागचं रहस्य सांगितलं. तसेच गतविजेत्या इंग्लंडची या विश्वचषकातील कामगिरी एवढी सुमार का राहिली, यावरही त्यांनी प्रकाश टाकला. वाचा ही स्पेशल स्टोरी..

Sanjay Jagdale
Sanjay Jagdale

हैदराबाद Cricket World Cup 2023 : चालू विश्वचषकात टीम इंडियानं दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं. भारतानं ८ पैकी ८ सामने जिंकून परफेक्ट रेकॉर्ड राखलाय. भारताच्या या कामगिरीवर माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी सदस्य संजय जगदाळे यांनी समाधान व्यक्त केलं. टीम इंडियाच्या आतापर्यतच्या परफॉरमन्सवर त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत केली.

उत्तम कामगिरीचं श्रेय टीमच्या संतुलनाला : संजय जगदाळे यांनी भारताच्या उत्तम कामगिरीचं श्रेय टीमच्या संतुलनाला दिलं. टीम इंडियाची गोलंदाजी सर्व परिस्थितीसाठी उत्तम आहे, असं ते म्हणाले. 'हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीमुळे टीमचं बॅलन्स थोड्याफार प्रमाणात बिघडलं. हार्दिकच्या रुपात भारताचा सहावा गोलंदाजी पर्याय आणि एक आक्रमक फलंदाज बाहेर पडला, मात्र त्यानंतरही टीमनं चांगली कामगिरी केली. संघातील प्रत्येक खेळाडू त्याला दिलेली भूमिका उत्तमपणे निभावत आहे, त्यामुळे हे शक्य झालं', असं ते म्हणाले.

रोहित शर्मा उदाहरण सेट करतोय : कर्णधार रोहित शर्मा या विश्वचषकात आपल्या आक्रमक फलंदाजीनं एक उदाहरण सेट करत आहे, असं संजय जगदाळे म्हणाले. 'रोहितचा विश्वचषकातील रेकॉर्ड उत्तम आहे. याशिवाय तो कर्णधार म्हणूनही चांगली कमगिरी करत आहे. तो आपल्या फलंदाजीनं टेम्पो सेट करतो, ज्यामुळे मध्यक्रमातील फलंदाजांवर दडपण येत नाही. त्यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे चेंडू सॉफ्ट बनतो ज्यामुळे नंतरच्या फलंदाजांना धावा बनवणं सोपं होतं', असं मत जगदाळे यांनी व्यक्त केलं.

जडेजा संघासाठी विशेष आहे : संजय जगदाळे यांनी अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाच्या कामगिरीचंही कौतूक केलं. त्याचासारखा खेळाडू प्रत्येक टीमसाठी विशेष असतो, असं ते म्हणाले. 'जडेजा प्रत्येक सामन्यात काहीतरी योगदान देतो. फलंदाजी असो, गोलंदाजी असो किवा फिल्डिंग, तो प्रत्येक क्षेत्रात अद्भूत आहे. तो संघाला उत्तम संतुलन प्रदान करतो. तो नेहमी संघासाठी उपलब्ध असतो', असं जगदाळे म्हणाले.

१० ओव्हर्समध्येच सामना आपल्याकडे खेचला होता : रविवारी झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा २४३ धावांनी दणदणीत पराभव केला. आतापर्यंत प्रत्येक सामन्यात धावांचा डोंगर रचणारी आफ्रिकेची टीम या सामन्यात मात्र अवघ्या ८३ धावांवर ऑलआऊट झाली. हा सामना भारतानं सुरुवातीच्या १० ओव्हर्समध्येच आपल्याकडे खेचला होता, असं संजय जगदाळे म्हणाले. 'दक्षिण आफ्रिकेची टीम धावांचा पाठलाग करताना नेहमीच अडखळते. कालच्या सामन्यात भारतानं ३०० प्लस स्कोर केला. ही विकेट अशी नव्हती ज्यावर आरामात फलंदाजी करता येईल. मात्र गिल आणि रोहितनं सुरुवातीच्या षटकांमध्येच आक्रमक फटकेबाजी करत सामना भारताकडे वळवला होता', असं ते म्हणाले.

इंग्लंडची टीम भारतात सेटल होऊ शकली नाही : या विश्वचषकात गतविजेत्या इंग्लंडची कामगिरी अत्यंत सुमार राहिली. यामागे काय कारण असू शकतं यावर संजय जगदाळे यांनी आपलं मत व्यक्त केलं. 'इंग्लंडची टीम कागदावर अत्यंत संतुलित वाटत होती. त्यांच्या टीममधील जोस बटलर, बेन स्टोक्स यांना भारतात खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. मात्र या विश्वचषकात इंग्लंडची टीम तुटलेली दिसत होती. ते योग्य वेळी फॉर्ममध्ये येऊ शकले नाही. तसेच ते भारतात सेटलही होऊ शकले नाहीत', असं निरीक्षण संजय जगदाळे यांनी नोंदवलं.

हेही वाचा :

  1. Prasidh Krishna : प्रसिद्ध कृष्णा लहानपणापासूनचं आहे प्रतिभावान गोलंदाज, विश्वचषकात निवड होणं अभिमानास्पद
  2. Cricket World Cup 2023 : टीम इंडियानं केला आफ्रिकेचा करेक्ट कार्यक्रम, अवघ्या ८३ धावांत गुंडाळलं!
  3. Virat Kohli : शतकांच्या विक्रमाची बरोबरी करताच सचिनच्या विराटला अनोख्या शब्दात शुभेच्छा!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.